कोण समजावून सांगणार? समजावून सांगायला आजच्या पोक्त पिढीला किंवा त्यांच्या मागील पिढीला तरी शिवाजी महाराज सर्वार्थाने समजले होते असा दावा करता येईल का? आणि कोणाचा अभ्यास ग्राह्य धरणार? शिवाय आता महाराजांना थेट देव्हाऱ्यात बसवले गेले आहे त्यामुळे एकदा का देवत्व बहाल केले की तिथे चिकित्सा संपली जी इतिहासात करावीच लागते. मग इतिहासात काहीही जरी घुसडले गेले तरी मूळ स्त्रोतापर्यंत कोण आणि कितीजण जाणार आहेत? (Subhedar Movie Review)
आपल्याकडे आचारविचारांचा आदर्श फार क्वचित् अनुसरला जातो. व्यक्तीला देवत्वपदी तत्परतेने बसवण्याची आपल्याला खूप घाई असते कारण एकदा तिला देवत्व बहाल केले की तिची पूजाअर्चा, उत्सव आदि सांकेतिक गोष्टी करुन तिच्या नांवाखाली आपले खुजेपण, नालायकी लपवायला आपण मोकळे व्यक्तीला देव बनवले की तिच्यात व आपल्यात महान अंतर पडते व तिचे गुण ग्रहण करणे अशक्यच होते आपल्यासाठी! तेवढी सबब आपल्याला पुरते त्यांचा आदर्श न ठेवण्यासाठी कारण ते कुठे व आपण कुठे! आपल्याला देवत्व गाठणे अशक्यच ना? ही न गाठता येणारी ‘देवत्व’ संकल्पना मोडत काढण्याचे काम ‘सुभेदार’ हा सिनेमा करतो. आता तुम्ही विचारलाय असं का? सुभेदार.. ही गोष्ट तर सुभेदार तान्हाजी मालुसरे यांची गोष्ट आहे.. मग? पण, शिवाजी महाराजांच्या शूर मावळ्यांना समजून घायचं असेल तर प्रारंभी आपल्याला शिवाजी राजे उमजून घेणं क्रम प्राप्त आहे.
महाराजांच्या शौर्याला, नेतृत्वगुणांना, धूर्तपणाला, सर्वांना संभाळत प्रेरित करत आपले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकारण्याला… स्वराज्यात शेतकरी, गड-कोट-किल्ले बांधणी, घाट-रस्ते बांधणी, रयतेचा सुरक्षिततेचा विचार, धार्मिक स्थळांच्या विचार करणारा राजा म्हणजे शिवराय. ही ओळख करुन देणारा ‘सुभेदार’ सिनेमा लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि टीमनं घडवला आहे.
बहिर्जी नाईक (दिग्पाल लांजेकर); महाराजांच्या हेर खात्यातील प्रमुख.. आणि नरवीर सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या नजरेतून शिवकालीन इति उलगडण्याचा प्रयत्न ‘सुभेदार’ सिनेमात करण्यात आला आहे. एकाने महाराजांचे डोळे बनवून अवघा स्वराज्य पिंजून काढला आणि दुसऱ्यांन महाराजांचा हात होऊन गनिमाला कापत कोंढाणा सर केला. या दुहेरी दिशांमधून महाराजन समजून घेण्यासाठी ‘सुभेदार’ आपल्याला मदत करतो. बरं.. अनेकदा तुम्ही शिवगर्जना ऐकली असेल. स्वतः दिली देखील असेल…
काय ती गर्जना..
‘आस्ते कदम…….
महाराज
गडपती
गजपती
भूपती
सुवर्णरत्नश्रीपती
अष्टावधानजाग्रृत
अष्टप्रधानवेष्टीत
न्यायालंकारमण्डीत
राजनितीधुरंदर
प्रौढप्रताप पुरंदर
क्षत्रियकुलावतंस
सुवर्णसिंहासनाधीश्वर
महाराजाधीराज
श्रीमंत
श्री….श्री….
श्री…. राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा.. की जय!’
यातील काही निवडक अलंकारिक शब्दाभूषणा अर्थ आपल्याला ‘सुभेदार… गड आला पण…’ मधून समजून घेता येतो. सुभेदार म्हंटल्यावर केवळ कोंढाणा लढाई.. हा चौकटी विचार बाजूला सारुन बहुअंगीपणे सुभेदार हे पात्र पडद्यावर चितारण्यात आले आहे. परिणामी शिवकालीन इतिहासात नेण्याचा यशस्वी पर्यंत ‘सुभेदार’ करतो. ‘सुभेदार’ हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यदलातील शूरवीर योद्धे सुभेदार तान्हाजीराव मालुसरे यांच्या जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यांवर प्रकाशझोत टाकणारा आहे. या चित्रपटाचा विषय केवळ किल्ले कोंढाण्यापुरता मर्यादित नसून, सुभेदार मालुसरेंच्या भावनिक रूपाचं यथार्थ दर्शन घडवणारा आहे.
सुभेदारांचे छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आऊसाहेब, पत्नी, मुलगा, भाऊ, मामा यांच्याशी असलेलं नातं अधोरेखित करणारा आहे. त्या संदर्भातील अत्यंत भावनिक करणारे प्रसंग सिनेमात प्रभावीपणे मांडण्यात आपले आहे. सोळाशेच्या काळातील आजूबाजूची सामाजिक परिस्थितीवर प्रकाश टाकणारे अनेक प्रसंग ‘सुभेदार’मध्ये आहेत. उदाहरणार्थ जना गराडीणचा प्रसंग… (अलका कुबल) यांनी ती भूमिका सुरेखरीत्या साकारली आहे. एका भाबड्या स्त्रीच्या बोलण्यातून छत्रपती शिवाजी महाराज कसे त्यांच्या गड-किल्ल्यांविषयी महत्त्वाची भूमिका घेतात हे दाखवण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आग्य्राहून परतल्यानंतर आऊसाहेब आणि त्यांची अत्यंत भावनिक व हृद्य भेट दर्शवणारा प्रसंग महाराजांची वेगळी आणि अगदी भावनिक बाजू पडद्यावर उभी करतो.
सिनेमातील सर्वच कलाकारांनी कुशलतेने काम केलं आहे. आऊसाहेब (मृणाल कुलकर्णी), शिवाजी महाराज (चिन्मय मांडलेकर), सोयराबाई (नूपुर दैठणकर), तान्हाजी मालुसरे (अजय पूरकर), शेलार मामा (समीर धर्माधिकारी), सूर्याजी (अभिजीत श्वेतचंद्र), सावित्री (स्मिता शेवाळे), पार्वतीबाई (उमा सरदेश्मुख), रायबा (अर्णव पेंढरकर), यशोदा (शिवानी रांगोळे), येसाजी कंक (भूषण शिवतरे), मोरोपंत (श्रीकांत प्रभाकर), बाजी जेधे (बिपीन सुर्वे), जनागराडीण (अलका कुबल), शेलार (मा.राजदत्त), शेलार मुलगी (ऐश्वर्या शिधये), हिरोजी इंदुलकर (सौमित्र पोटे), पीलाजी नीळकंठ (संकेत ओक), बाजीपासलकर (सुनील जाधव), जानोजी (मंदार परळीकर), जीवा (विराजस कुलकर्णी), रंभाजी (अजिंक्य ननावरे), उदयभान (दिग्विजय रोहिदास), कुबादखान (रीषी सस्केना), अचलसिंह (ज्ञानेश वाडेकर), केसर (मृण्मयी देशपांडे), बहिर्जी (दिग्पाल लांजेकर), विश्वास (आस्ताद काळे), नवलाजी (पूर्णानंद वाडेकर) आदी सर्व त्यांच्या-त्यांच्या व्यक्तिरेखेत शोभून दिसतात. सिनेमातील गाणी मनाला भिडतात. सिनेमात असे अनेक प्रसंग आहेत ज्यामुळे तुमच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
कोंढाणा जिंकण्यासाठी आखलेली मोहीम या सिनेमातून दाखवण्यात आली आहे; जिथे संवांदातून चहू बाजूंनी विविध ऐतिहासिक दाखले देण्यात आले; जे समजून घेण्यासाठी महत्वपूर्ण आहे. जिजाऊंची महाराजांना असलेली खंबीर साथ याचंही चित्रण समर्पकरित्या यावेळी करण्यात आले आहे. कोंढाणा जिंकण्याची घटना ही सर्वांत मोठी असली तरी त्यामागे असलेलं युद्धकौशल्य, रणनिती पटकथेतून आपल्या नजरेत पडते. लेखकाने बारकाईनं अधिकाधिक गोष्टी पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
‘आधी लगीन कोंढाण्याचं मग आमच्या रायबाचं’ असं म्हणत कोंढाण्याची मोहीम हाती घेत बेलभंडारा उचलणारे सुभेदार.. पासून गडावर धारातीर्थी पडणारे नरवीर सुभेदार हा प्रवास चित्तथरारक आहे. ‘सुभेदार’साठी दिग्पाल लांजेकर याने ऐतिहासिक दस्तऐवजांच्या आधारे केलेले अभ्यासपूर्ण लेखन आणि दिग्दर्शन रसिकांना शिवकाळात नेणारे.. आणि कौतुकास्पद आहे. अजय पूरकर यांनी तान्हाजी मालुसरेंची शीर्षक भूमिका सशक्तपणे आणि प्रभावीपणे साकारली आहे. जिजाऊंच्या भूमिकेतील मृणाल कुलकर्णी यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील चिन्मय मांडलेकर नेहमीच उठावदार दिसतात.. भासतात.
सुभेदार तांत्रिक बाजूने भक्कम असा झाला आहे. प्रतीक रेडिजचं कलादिग्दर्शन, सागर-विनय शिंदे यांचं संकलन, प्रियांका मयेकर या नवोदित महिला सिनेमॅटोग्राफरचं छायांकन आणि देवदत्त बाजीचं संगीत उठावदार आहे. यापूर्वी शिवराज अष्टकमधील प्रदर्शित झालेल्या चार चित्रपटांच्या तुलनेने ‘सुभेदार’ सिनेमा तांत्रिक दृष्ट्या अधिक उजवा आहे. रोमांचक आणि हेलावून टाकणारा ‘सुभेदार’ नक्कीच पाहण्याजोगा आणि समजून घेण्याजोगा झाला आहे.
सिनेमा : सुभेदार
निर्मिती: राजवारसा प्रोडक्शन्स, मुळाक्षर प्रोडक्शन्स प्रा.लि, पृथ्वीराज प्रोडक्शन, राजाऊ प्रोडक्शन, परंपरा प्रोडक्शन्स
लेखक-दिग्दर्शक : दिग्पाल लांजेकर
संगीतकार : देवदत्त मनीषा बाजी
कलाकार : मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, समीर धर्माधिकारी, अभिजीत श्वेतचंद्र, स्मिता शेवाळे, दिग्विजय रोहिदास, रीषी सस्केना, आस्ताद काळे
दर्जा : तीन स्टार