टीव्ही जगतातील सर्वाधिक लोकप्रिय आणि घराघरात पोहोचलेली मालिका म्हणजेच ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’. 2000 ते 2008 पर्यंत तब्बल आठ वर्ष टीव्हीवर अधिराज्य गाजवलेली ही मालिका आजही प्रेक्षकांच्या मनात ताजी आहे. आजही यामधील काही प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, आणि त्या आठवणींना उजाळा दिला जातो.
आता या मालिकेचा दुसरा सीझन येतोय आणि त्यासोबतच जुने आठवणींनी भरलेले क्षणही. विशेष म्हणजे, या नव्या सीझनमध्ये देखील स्मृती इराणी पुन्हा एकदा ‘तुलसी’च्या भूमिकेत दिसणार आहेत आणि अमर उपाध्याय पुन्हा ‘मिहिर’च्या रूपात झळकणार आहेत.
या नव्या पर्वाचं शूटिंग सध्या सुरू असून, सेटवरून स्मृती इराणीचा नव्याने सजलेला ‘तुलसी’ लूक इंटरनेटवर लीक झाला आहे. पारंपरिक वेशात, जांभळ्या बॉर्डर असलेल्या साडीत, कपाळावर लाल बिंदी आणि सिंदूर, हलका मेकअप, चांदी-काळ्या रंगाचे पारंपरिक दागिने आणि साइड-पार्टेड केसांचा बन – असं हे तुलसीचं नवसाजरं रूप पाहून चाहते मंत्रमुग्ध झाले आहेत.
सोशल मीडियावर चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतोय. “माझ्या बालपणीची आठवण”, “आता पुन्हा तुलसी घरी परततेय”, अशा भावना व्यक्त करत लोकांनी या लूकवर भरभरून प्रेम केलं आहे.
पहिला सीझन तब्बल 1833 एपिसोड्सपर्यंत पोहोचला होता. त्यातील तुलसी आणि मिहिर ही पात्रं तर टीव्हीच्या इतिहासात अजरामर झाली होती. आणि आता, १६ वर्षांनी हे दोघं पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतणार आहेत हे पाहून प्रेक्षकांचा उत्साह थेट शिगेला पोहोचला आहे.
अमर उपाध्यायनेही या मालिकेविषयी भावना व्यक्त करत सांगितलं,
“पहिल्या दिवशी जेव्हा सेटवर पाऊल ठेवलं, तेव्हा खूप जुन्या आठवणींनी मन भरून आलं. अनेक गोष्टी आता टीव्ही जगतात बदलल्या आहेत, पण तरीही तीच भावना, तोच आत्मा या मालिकेत टिकून राहील, आणि प्रेक्षक पुन्हा एकदा तुलसीला मनापासून स्वीकारतील, याची मला खात्री आहे.”