आज सर्वत्र मतमोजणीचीच चर्चा पाहायला मिळत आहे. अतिशय महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहे. अनेक जागांचे निकाल हाती आले असून, काही ठिकाणी अजून मतमोजणी सुरूच आहे. नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी ही अतिशय प्रतिष्ठेची लढाई होत आहे. नरेंद्र मोदी यावर्षी ही निवडणूक जिंकणार की राहुल गांधी पहिल्यांदा पंतप्रधान होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
यावर्षी मोदी सरकारने संपूर्ण भारतीयांचे स्वप्न असणाऱ्या अयोध्येतील राम मंदिरामध्ये राम लल्लाची स्थापना करत अनेक वर्षांची सर्वांची इच्छा पूर्ण केली. या अयोध्येचे संपूर्ण रूपच सरकारने बदलवून टाकले. उत्तरप्रदेशमधील अयोध्या येथे योगी आणि मोदी सरकार यांनी मोठे विकास केले. त्यामुळेच अयोध्येतील राम मंदिर झाल्यानंतर भाजपने तिथे त्यांचा विजयच निश्चित केला असे म्हटले जात आहे. मात्र आज निकाल लागल्यानंतर वेगळेच चित्र समोर आले आहे.
अयोध्येमध्ये भाजपाला विजय मिळवता आला नाही. हा पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे यावर आता वेगवेगळ्या स्तरातून प्रतिक्रिया आणि मतं येत आहेत. अशातच बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय असणाऱ्या गायक सोनू निगमने देखील यावर प्रतिक्रिया देत आश्चर्य आणि संताप व्यक्त केला आहे.
सोनू निगमने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याचे मत व्यक्त केले. सोनुने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “ज्या सरकारने संपूर्ण अयोध्येचे रुपडे बदलवत विकास केला, नवीन विमानतळ तयार केला. रेल्वे स्थानक अद्यावत केले, ५०० वर्षांनंतर राम मंदिर उभारले, एका मंदिराच्या जोरावर संपूर्ण अर्थव्यवस्था उभारून दिली, त्याच पक्षाला अयोध्येच्या मतदारसंघात संघर्षाचा सामना करावा लागत आहे. अयोध्यावासियांनो ही लाजिरवाणी बाब आहे.”
दरम्यान उत्तरप्रदेश हा देशातील सर्वात मोठा मतदार संघ आहे. निकालाआधी भाजपने ८० पैकी ७० जागा जिंकू असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र ते केवळ ३३ ठिकाणीच आघाडी मिळवू शकले आहेत. त्यामुळे सर्वानाच याचे नवल वाटत आहे. तत्पूर्वी सोनुने केलेल्या या पोस्टनंतर अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे, तर अनेकांनी त्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले आहे. त्याची ही पोस्ट कमालीची चर्चेत आली आहे.