शेखर कपूर बॉलिवूडमधील असे दिग्दर्शक, ज्यांनी त्यांच्या अतिशय उत्तम आणि लोकप्रिय चित्रपटांनी बॉलिवूडचा नावलौकिक वाढवला आणि ओळख तयार केली. अतिशय उत्कृष्ट आणि पठडीबाहेरील चित्रपटांनी शेखर यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. शेखर कपूर यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील मोठी ओळख प्राप्त आहे. शेखर कपूर यांनी त्यांच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच त्यांच्या खासगी आयुष्यामुळे देखील मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली. त्यांचे वैयक्तिक जीवन देखील कमालीचे मीडियामध्ये गाजले. अजूनही शेखर कपूर यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेकदा बोलले जाते. आता पुन्हा एकदा शेखर हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेच चर्चेत आले आहे.
लवकरच शेखर कपूर यांची मुलगी कावेरी ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. बॉलिवूडमध्ये करियर करण्यासाठी कावेरी आता पूर्णतः तयार असल्याचे सांगितले जात आहे. शेखर कपूर आणि अभिनेत्री लेखिका सुचित्रा कृष्णमूर्ती यांची लेक असलेली कावेरी आता त्या स्टार्स किड्सच्या यादीत सामील झाली आहे, जे लवकरच अभिनयात पदार्पण करणार आहे. मात्र अजून याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसून, यावर सध्या चर्चा चालू असल्याचे सांगितले जात आहे. कावेरीने आता एक गायिका आणि गीतकार म्हणून स्वतःची एक नवीन ओळख निर्माण केली आहे. या दोन ओळख निर्माण केल्यानंतर आता अभिनयाच्या क्षेत्रात ती पदार्पण करणार आहे.
कावेरी कपूरबद्दल आणि तिच्या डेब्यूबद्दल सध्या अफवा अतिशय मोठ्या प्रमाणावर येत आहेत. सध्या कावेरी एका मोठ्या प्रोडक्शन हाऊससोबत चर्चा करत असून, लवकरच ती तिच्या आईवडिलांचा अभिनयाचा वारसा पुढे नेण्यासाठी उत्सुक आहे. ती वेगवेगळ्या अभिनयाच्या वर्कशॉपमध्ये देखील सहभाग घेत आहे. येणाऱ्या काळात लवकरच तिच्या संबंधित एखादी मोठी घोषणा होऊ शकते अशा देखील शक्यता वर्तवल्या जात आहे.
दरम्यान कावेरी कपूर ही शेखर कपूर आणि सुचित्रा कृष्णमूर्ती यांची मुलगी असून, त्यांचे लग्न १९९७ साली झाले होते. मात्र लग्नानंतर १० वर्षातच ते विभक्त झाले. पुढे २००७ साली त्यांनी घटस्फोट घेतला.