देशातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या आणि बारकाईने पाहिल्या जाणाऱ्या संघटनांपैकी एक असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी वर्षानिमित्त ‘शतक : संघ के १०० वर्ष’ या चित्रपटाच्या ट्रेलरचे मुंबईत भव्य सोहळ्यात अनावरण करण्यात आले. हा ट्रेलर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाचे सदस्य आणि ज्येष्ठ पदाधिकारी डॉ. मनमोहन वैद्य यांच्या हस्ते, अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदर्शित करण्यात आला.
२०२५ हे वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. कारण याच वर्षी संघाने आपल्या कार्याचा शताब्दी टप्पा पूर्ण केला. गेल्या शंभर वर्षांत संघाने भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक जीवनावर खोलवर प्रभाव टाकला आहे. मात्र, या दीर्घ प्रवासात संघ हा नेहमीच चर्चेचा, वादाचा आणि अनेकदा गैरसमजांचा विषय राहिला आहे. ‘शतक’ हा चित्रपट याच पार्श्वभूमीवर उभा राहतो. तो केवळ धारणा आणि आरोपांपुरता न थांबता, इतिहास, विचारधारा आणि संघटनेच्या प्रवासाकडे अधिक सूक्ष्म आणि समतोल दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करतो.
‘शतक : संघ के १०० वर्ष’ हा चित्रपट संघाच्या गुंतागुंतीच्या आणि बहुआयामी प्रवासाचा सिनेमॅटिक वेध घेणारा आहे. ट्रेलरमधून संघाची स्थापना १९२५ मध्ये डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी कशी केली, तसेच एम. एस. गोळवलकर (गुरुजी) यांच्या नेतृत्वाखाली संघटनात्मक मजबुती कशी आकाराला आली, याचा मागोवा घेतला जात असल्याचे स्पष्ट होते. संघाची शिस्त, मूल्ये आणि दीर्घकालीन दृष्टी यांवर आधारित त्याचा शतकी प्रवास संघाच्या स्वतःच्या आवाजातून मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे.
महत्त्वाचे म्हणजे, ट्रेलरमधून चित्रपटाने संघासंदर्भात अनेक वर्षांपासून प्रचलित असलेल्या गैरसमजांनाही छेद देण्याचा संकेत दिला आहे. विविध काळात संघावर आलेल्या बंदी, स्वातंत्र्यलढ्यातील संघाची भूमिका, आणीबाणीचा काळ अशा अनेक संवेदनशील आणि अनेकदा दुर्लक्षित राहिलेल्या ऐतिहासिक टप्प्यांवर चित्रपट प्रकाश टाकतो. त्यामुळे प्रेक्षकांना संघाच्या इतिहासाकडे अधिक सखोल आणि संदर्भासहित पाहण्याची संधी मिळणार आहे.
डॉ. मनमोहन वैद्य यांची उपस्थिती या ट्रेलर लाँचला विशेष वजन देणारी ठरली. संघाच्या वैचारिक आणि बौद्धिक मंथनाशी दीर्घकाळ जोडले गेलेले डॉ. वैद्य हे संघाच्या तत्त्वज्ञान, सामाजिक भूमिका आणि राष्ट्रीय दृष्टिकोनाबाबत स्पष्ट विचार मांडणारे अभ्यासक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या उपस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रामाणिकतेवर आणि गांभीर्यावर अधिक शिक्कामोर्तब झाले.
विर कपूर निर्मित, आशिष तिवारी सहनिर्मित आणि एडीए ३६० डिग्री एलएलपी यांच्या सहयोगाने साकारलेला ‘शतक’ हा चित्रपट संघाच्या इतिहासातील अनेक अल्पज्ञात आणि आजवर न मांडलेले पैलू समोर आणण्याचा प्रयत्न करतो. ट्रेलरमध्ये इतिहास, स्मृती आणि सातत्य यांचा सुरेख संगम पाहायला मिळतो, जो प्रेक्षकांना नेहमीच्या मथळ्यांपलीकडे पाहण्याचे आमंत्रण देतो.
डॉ. मनमोहन वैद्य यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “‘शतक’ या चित्रपटाच्या माध्यमातून संघाची कथा समाजापर्यंत पोहोचणार आहे, ही अत्यंत प्रशंसनीय बाब आहे. चित्रपट हे एक सशक्त माध्यम असून त्यातून मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचता येते. त्यामुळे या चित्रपटामुळे संघाची गोष्ट अधिक लोकांपर्यंत पोहोचेल, त्याबद्दलची उत्सुकता वाढेल आणि ही अभिमानाची गोष्ट आहे.” त्यांनी दिग्दर्शक व निर्मात्यांनी हा चित्रपट अतिशय सर्जनशीलतेने साकारल्याचेही नमूद केले.
आपला अनुभव सांगताना दिग्दर्शक आशिष मल्ल म्हणाले, “ही कथा मी निवडली असे नाही, तर या कथेनेच माझी निवड केली आहे. चित्रपट बनवताना अनेक गोष्टी नव्याने समजल्या. वीर कपूर यांनी सुचवलेला शेवट असा असावा की, प्रेक्षकांना प्रश्न पडावा आणि उत्तर शोधण्याचा निर्णय त्यांनीच घ्यावा. यासाठी आमच्या संपूर्ण टीमने सखोल संशोधन केले. संघाबाबत पसरलेल्या अफवा आणि गैरसमज समोर आले, ज्यांचे निराकरण होणे आवश्यक आहे. आम्ही आमच्या बाजूने प्रामाणिक प्रयत्न केले आहेत.”
चित्रपटाबाबत निर्माता विर कपूर म्हणाले, “‘शतक’ ही केवळ एका आकड्याची गोष्ट नाही, तर शंभर वर्षांच्या संस्कारांची, सेवाभावाची आणि नि:स्वार्थ समर्पणाची कहाणी आहे. कोणत्याही प्रचाराशिवाय आणि सत्तेच्या आधाराविना, केवळ अनुशासन आणि राष्ट्रभक्तीच्या बळावर संघाने लोकांच्या मनात स्थान निर्माण केले. हा चित्रपट कोणाच्याही विरोधात नसून, तो सत्याच्या बाजूने उभा आहे.”
अनिल डी. अग्रवाल यांची संकल्पना, आशिष मल्ल दिग्दर्शित, विर कपूर निर्मित आणि आशिष तिवारी सह-सहनिर्मित ‘शतक’ हा चित्रपट १९ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. शंभर वर्षांच्या एका विचारप्रवाहाचा सखोल वेध घेण्याची भूमिका हा ट्रेलर ठळकपणे मांडतो.