कितीही मोठं संकट आलं तरी वेळ ही कोणासाठी थांबत नसते. शो मस्ट गो ऑन…अभिनेता शंतनू मोघेसोबत (Shantanu Moghe) असंच काहीस घडले आहे. शंतनू हा धुळ्यामध्ये एका महानाट्यात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत होता. या नाटकाच्या तालमीत शंतनूच्या पायाला दुखापत झाली. यावेळी त्याचा पाय फॅक्चर झाला. पण फॅक्चर असताना देखील त्याने या महानाट्याचे दोन प्रयोग पूर्ण केले आणि तो मुंबईत घरी परतला. त्यानंतर मुंबईत त्याचा ‘सफरचंद’ या नाटकाचा प्रयोग होता. तिकीटांची विक्री आधीच झालेली असल्यामुळे शो रद्द झाल्यास सगळ्यांचेच नुकसान होणार होते. हे लक्षात घेता रंगभूमीवरील निष्ठेपोटी आणि रसिकांसाठी असलेल्या आदरापोटी शंतनूने हा शो करण्याचे ठरवले आणि वॉकरच्या मदतीने तो स्टेजवर उतरला. नाटकात फक्त छोटेसे दोन बदल करण्यात आले होते. नाटक झाल्यावर जेव्हा शंतनूची स्टेजवर एंट्री झाली तेव्हा प्रेक्षकांनी उभं राहून टाळ्यांच्या कडकडाटात शंतनूला दाद दिली. कदाचित यालाच हाडाचा कलाकार म्हणत असावेत.
नाटकाच्या प्रयोगानंतर शंतनू मोघेची पत्नी अभिनेत्री प्रिया मराठेने (Priya Marathe) शंतनूसाठी एक खास पोस्ट शेअर केली. पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने म्हटले आहे की, ”हे तूच करू जाणे.. तुला आणि तुझ्यातल्या कलाकाराला सलाम! ज्यांना कल्पना नाही त्यांना सांगू इच्छिते. पाय fracture झालेला असताना, वॉकर घेऊन, ठरलेला प्रयोग अतिशय उत्तम प्रकारे करून शांतनू नी खरंच अभूतपूर्व उदाहरण आपल्या समोर ठेवलं आहे. कमाल!आता तुला हडाचा कलाकार म्हणता येईल.”
नक्की वाचा- ‘सासू-सूने’ची जोडी नाही तर ‘सासरे-सूनबाई’ची जोडी ठरतेय हीट
या पोस्टनंतर शंतनूच्या चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. दादा काळजी घे, तूला सलाम, तूझा अभिमान वाटतो, लवकर बरा हो, अशा शब्दांमध्ये चाहत्यांनी काळजी व्यक्त करत शंतनूबद्दलचा अभिमान व्यक्त केला आहे.