प्राचीन काळापासून भारतीय इतिहासामध्ये रोचक प्रेमकथा प्रचलित आहेत. परंतु, अशी एक प्रेमकथा आहे जी अतिप्राचीन काळाशी संबंधित असून तिचा उल्लेख आणि त्यातील कथानक आपल्याला कमीअधिक फरकाने आजही विविधांगी कलाकृतीत दिसते. ही कथा म्हणजे; शकुंतला आणि राजा दुष्यंत यांच्या प्रेमाची आहे. महाकवी कालिदासाने रचलेल्या मूळ नाट्यकलाकृतीत शकुंतला आणि दुष्यंत एक अशा प्रेमी युगुलाच्या रुपात प्रस्तुत झाले आहेत की, यांचे सुरुवातीला मिलन नंतर विभक्त आणि शेवटी पुन्हा एकत्रित येणं; हे सर्वतोपरी रंजनाचा पट आहे. महाकवी कालिदास यांचे हे विश्वविख्यात नाटक ‘अभिज्ञान शाकुन्तलम्’ यावरच हा गुणशेखर दिग्दर्शित ‘शाकुन्तलम‘ सिनेमा बेतलेला आहे. ज्यात शकुंतलेच्या शीर्षक भूमिकेत सामंथा रुथ प्रभु आहे.
महाभारतात, मूळ कौरव-पांडवांच्या वैरकथेच्या जोडीला इतर अनेक लहान-मोठी उपकथानके आहेत. यांतील काही कथानके स्वतंत्र महाकाव्ये शोभावीत एवढी विस्तृत आहेत. शकुंतला दुष्यंत यांची कथा ही; अशीच एक प्रमुख उपकथा आहे. या कथेतील काव्यगुणांनी महाकवींना भुलवले व महाकाव्ये व नाटके लिहिण्यास प्रवृत्त केले. कालिदासाच्या शाकुंतल नाटकाने जगातील थोरथोर रसिकांकडून मानाचे मुजरे मिळवले व जर्मन महाकवी गटे ते डोक्यावर घेऊन नाचला हे सर्वश्रुत आहे. विविध भाषांमध्ये या नाटकावर आधारित विविधांगी कलाकृती गेल्या कित्तेक वर्षात निर्मिल्या गेल्या आहेत. पण, मूळ आद्य चित्रकलाकृती म्हणून सिनेनिर्माते, दिग्दर्शक व्हि. शांताराम यांच्या ‘शाकुंतल’ या सिनेमाकडे पाहिले जाते.
या सिनेमात शकुंतलेची व्यक्तिरेखा जयश्री यांनी साकारली होती. विशेष म्हणजे १९४३ अर्थात ऐंशी वर्षांपूर्वी निर्मितीलेली ही कलाकृती आजही कालातीत आहे. मुळात महाकवी कालिदास यांचे हे ‘अभिज्ञान शाकुन्तलम्’ नाटकच चिरंतर आहे. याच चिरंतर नाट्यकाव्यावर बनवलेल्या दिग्दर्शक गुणशेखरचा ‘शाकुन्तलम’ सिनेमा आपल्या अत्याधुनिक नजररेतून ही गोष्ट दाखवतो. पटकथा लेखक-दिग्दर्शकाने ‘शकुंतला’च्या मूळ नाट्यकृतीच्या कथेची इकडे मुळीच प्रतारणा केलेली नाही. पण, तीच कालातीत गोष्ट त्याने चकचकीत आणि आखीव-रेखीव, सादरीकरणातील तांत्रिक बाबी उंचावून प्रेक्षकांसमोर सादर केली आहे. (Shaakuntalam Movie Review)
शकुंतला-दुष्यंत-भरत याची कथा आपणाला बरीचशी परिचित आहे. शकुंतला ही मेनका व विश्वामित्र यांची कन्या हे आपणास ठाऊक आहे. मेनका ही अप्सरा व विश्वामित्र हा क्षत्रिय राजा व मागाहून ऋषिपदाला पोचलेला व्यक्ती असतो. विश्वामित्र मेनकेच्या मोहात पडल्यावर तो व मेनका दीर्घकाळ सुखोपभोगात रममाण होतात. इंद्रानेच विश्वामित्राचा तपोभंग करण्यासाठी मेनकेला पाठवले असते. मेनका आणि विश्वामित्रची कन्या असलेल्या शकुंतलाचा कण्व महर्षी (सचिन खेडेकर) सांभाळ करतात. पुढे शकुंतला मोठी झाल्यावर; एके दिवशी, राजा दुष्यंत (देव मोहन) मोहिमेवर असताना त्याची शकुंतलाशी भेट होते. दुष्यंत शकुंतलाला पाहताच तिच्या प्रेमात पडला. त्यांचा गांधर्व विवाह झाला.
आपली आठवण आणि विवाहाची खूण म्हणून दुष्यंतने स्वतःची अंगठी शकुंतलेला दिलेली असते. मग दुष्यंतला परत जावे लागले. त्याने शकुंतलेला सांगितले की तो जाऊन आपल्या राज्यात सर्व काही सुरळीत झाल्यावर परत येईल. महिने लोटले पण, दुष्यंत माघारी आला नाही. शकुंतला सतत स्वप्नांमध्ये रमलेली मध्ये आणि दुष्यंतची वाट असे. अशात एके दिवशी ऋषी दुर्वासा (मोहन बाबू) कण्व मुनीच्या आश्रमात येतात. रागीट स्वभावाचे दुर्वासा ऋषी शकुंतलेला उद्देशून काही प्रश्न विचारतात. पण, स्वप्नमग्न असलेली शकुंतला त्यांना प्रतिउत्तर देत नाही. ऋषींना अपमान झाल्यासारखे वाटते आणि ते शकुंतलाला शाप देतात. हा शाप कोणता? त्यामुळे पुढे तिच्या आयुष्यात काय घडते? दुष्यंत राजा परत येतो का? शकुंतला आणि दुष्यंत पुन्हा एकत्र येतात का? गर्भवती असलेली शकुंतला पुढे काय करते? हा सर्व कथाप्रपंच सिनेमात आहे.
सिनेमा दिसायला आणि डोळ्यांना अनुभवायला एकदम चकचकीत आहे. मल्याळम अभिनेता देव मोहनने दुष्यंतची भूमिका खुबीने साकारली आहे. मोहन बाबू, प्रकाश राज, मधुबाला आणि गौतमी यांची कामं देखील चांगली झाली आहेत. परंतु, सर्वाधिक लक्ष वेधून घेते ती शकुंतलेच्या भूमिकेत असलेली सामंथा. तिचा अभिनिवेश अनेक प्रसंगांमध्ये कौतुकास्पद आहे. हा सिनेमा तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे बहुभाषिक प्रेक्षकांसमोर ही कथा पोहोचली आहे. जी नक्कीच पाहण्याजोगी आहे. दिग्दर्शक गुणशेखर याने याआधीच जाहीर केले होतं की, ही नवीन लिहिलेली कथा नाही, तर हा चित्रपट कवी कालिदासाने लिहिलेल्या ‘अभिज्ञान शाकुंतलम’ या महाकाव्यावर आधारित आहे. ‘अभिज्ञान शाकुंतलम’मध्ये दुष्यंत आणि शकुंतला या दोघांचा दृष्टिकोन वाचायला मिळत असला, तरी गुणशेखरची ही सिनेमाच्या कथेत प्रामुख्याने केवळ शकुंतलेचाच दृष्टिकोन मांडला आहे. (Shaakuntalam Movie Review In Marathi)
दिग्दर्शक गुणशेखर याने आजच्या प्रेक्षकांच्या पसंतीनुसार ही कथा मांडली आणि सादर केली आहे. त्यामुळेच कण्व महर्षी आश्रम असो की मोठ्या पडद्यावर दिसणारा राजवाडा, हिमालयासारखे ठिकाण असो की स्वर्ग, या सर्व गोष्टी अतिशय सुंदरपणे व्हीएफएक्सच्या सहाय्याने पडद्यावर उभ्या केल्या आहेत. चित्रपटात काही संवाद हे नव्याने मुद्दाम अलंकारिक केलेलं जाणवतात. पण, कथा तशीच ठेवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. आजच्या पिढीला अशा कथेशी जुळवून घेणं थोडं अवघड आहे. कारण, पटकथा शब्दबंबाळ आणि अनेक ठिकाणी तर्कविन आहे. चित्रपटातील संवाद आपल्याला पौराणिक मालिका किंवा जुन्या चित्रपटाची अनुभूती देतात.
=====
हे देखील वाचा: Gumraah Movie Review: भरकटवणारा ‘गुमराह’
=====
थ्रीडी इफेक्टमुळे हा चित्रपट पाहण्याचा अनुभव अधिक मजेशीर आहे. मात्र, शकुंतला आणि दुष्यंतचा रोमान्स असूनही मध्यंतरापूर्वी चित्रपट कंटाळवाणा होऊ लागतो. पण दुसऱ्या भागात अनेक नाट्यमय वळणं घेऊन कथा पुढे जाते. या कथेच्या मध्यभागी, देव आणि दानवांचे युद्ध अतिशय नेत्रदीपक पद्धतीने चित्रित केले गेले आहे, परंतु प्रेक्षकांना लगेच समजेल की हा सर्व ग्राफिक्सचा खेळ आहे. चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाबद्दल सांगायचे तर, समंथाने शकुंतलाची व्यक्तिरेखा पूर्णपणे जगली आहे. डबिंग आणि संवाद अधिक प्रभावी होऊ शकले असते. देव मोहनही दुष्यंतच्या भूमिकेला न्याय देत आहेत. चित्रपटाच्या तांत्रिक बाबीबद्दल सांगायचे तर, दिग्दर्शक म्हणून गुणशेखर यांनी पॅन इंडियाची निवड लक्षात घेऊन स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपट पाहता असे म्हणता येईल की दिग्दर्शक यात बहुतांशी यशस्वी झाला आहे. गुणशेखर कुठेही कथेपासून दूर जाताना दिसला नाही. चित्रपटाचे संवाद फारसे प्रभावी नसले तरी ही कथा मोठ्या पडद्यावर पाहणे हा एक सुखद अनुभव आहे. सुंदर व्हिज्युअल हे चित्रपटाचे प्रमुख आकर्षण तसेच चित्रपटाचे बलस्थान आहे.
सिनेमा : शाकुन्तलम (Shaakuntalam)
निर्मिती : नीलिमा गुणा
दिग्दर्शक, पटकथा : गुणशेखर
संवाद : साई माधव बुर्रा
कलाकार : सामंथा रुथ प्रभु, देव मोहन, सचिन खेडेकर, प्रकाश राज, गौतमी, कबीर बेदी
छायांकन : शेखर व्ही. जोसेफ
संकलन : प्रवीण पुडी
दर्जा : तीन स्टार