सध्या प्रेक्षकांमध्ये आणि सोशल मीडियावर फक्त आणि फक्त एकाच सिनेमाची जोरदार चर्चा आहे. तो सिनेमा म्हणजे सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांच्या ‘टायगर 3’ची. मागील अनेक महिन्यांपासून या सिनेमाने चांगलीच हवा तयार केली आहे. मागील दोन टायगर सिरीजच्या सिनेमांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. आता याच सिरीजचा तिसरा आणि शेवटचा भाग दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. ‘टायगर’ सिरीजच्या मागील दोन्ही चित्रपटांमध्ये सलमान खानच्या एन्ट्री सीनने कमालीची लोकप्रियता मिळवली होती. त्यामुळे आता या तिसऱ्या सिनेमात सलमानची एन्ट्री कशी असणार याबाबत माहिती समोर आली आहे.
सलमान खानची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटांमध्ये किंवा त्याची छोटी भूमिका असलेल्या कोणत्याही चित्रपटांमध्ये त्याच्या एन्ट्रीला चित्रपटगृह टाळ्या आणि शिट्यांचा आवाजाने दणाणून जाते. आता ‘टायगर 3’मध्ये सलमान खानच्या एन्ट्रीबद्दल सिनेमाचे दिग्दर्शक असलेल्या मनीष शर्मा यांनी काही माहिती सर्वांना दिली आहे.
सलमान खानच्या टायगर ३ सिनेमाने प्रदर्शनाआधीच विविध रेकॉर्ड सेट केले आहेत. टायगर ३ सिनेमाच्या ऍडव्हान्स बुकिंगने देखील मोठा रेकॉर्ड तयार केला आहे. या सिनेमात एकूण १२ ऍक्शन सिक्वेन्स असणार आहे. आतापर्यंत एवढे ऍक्शन सिक्वेन्स कोणत्याही सिनेमात पाहिले गेले नाही. तर सलमान खानची सिनेमातील एन्ट्री अधिक खास बनवण्यासाठी त्यांच्या एन्ट्रीचा सिक्वेन्स तब्बल १० मिनिटांचा असणार आहे.
दिग्दर्शक मनीष शर्मा यांनी सलमानच्या एन्ट्रीबद्दल सांगितले, “सलमान खानने आतापर्यंत आपल्याला अनेक अविस्मरणीय इंट्रो सिक्वेन्स दिले आहेत. या सिनेमातील त्याचा एन्ट्री सीन त्याच्या फॅन्सचं आणि सिनेप्रेमींचा मोठा दुष्काळ संपवेल. टायगरच्या मागील दोन्ही सिनेमांमध्ये त्याने चिकार लोकप्रियता मिळवली. त्यामुळे आता देखील त्याला सूट होईल आणि लक्षात राहील अशी सलमानची एन्ट्री सिनेमात होणे आवश्यक होते.”
पुढे मनीष म्हणाले, “आम्ही अनेक हुशार आणि प्रतिभाशाली लोकांना सोबत घेत सलमानच्या एन्ट्रीचा १० मिनिटांचा सीन तयार केला आहे. हा सीन सिनेमाचे मुख्य आकर्षण असेल. १२ नोव्हेंबरला सलमानच्या एन्ट्री सीनवरील प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मी किंबहुना आम्ही सर्वच खूप उत्सुक आहोत.”
दरम्यान सलमान खानच्या ‘टायगर 3’ सिनेमांचे ऍडव्हान्स बुकिंग अनेक ठिकाणी फुल झाले आहेत. आतापर्यंत सिनेमाची १ लाख ऍडव्हान्स तिकिटं विकल्या गेली आहेत. ‘टायगर 3’ १२ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. हा सिनेमा हिंदीसोबतच तामिळ आणि तेलगूमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे. एक था टाइगर, टाइगर जिंदा है, वॉर आणि पठाणनंतर वाईआरएफ स्पाई यूनिवर्सचा पाचवा सिनेमा असणार आहे.