Sachin Pilgaonkar On Amjad Khan’s Sholay Dialogue:‘कितने आदमी थे…’ हा ‘शोले’मधील गब्बर सिंहचा अजरामर डायलॉग आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. पण हा डायलॉग जितका सहज आणि भारदस्त वाटतो, तितकं त्यामागचं वास्तव वेगळं आहे. नुकत्याच एका मुलाखतीत महागुरु सचिन पिळगांवकरांनी यामागचा एक अप्रकाशित किस्सा उघड केला आहे.
सचिन पिळगांवकर, जे बालकलाकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत झळकले आणि नंतर मराठीत एक अष्टपैलू कलाकार म्हणून नावारूपाला आले, यांनी अनेक गाजलेले चित्रपट केले – ‘बालिका वधू’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘अशी ही बनवा बनवी’ हे त्यापैकी काही.
सचिन यांनी सांगितलं की, ‘शोले’मध्ये अमजद खान जेव्हा ‘कितने आदमी थे’ हा डायलॉग बोलत होते, तेव्हा त्यांचा आवाज अपेक्षेइतका दमदार वाटत नव्हता. “तो पातळ, थोडा बेसहिन आवाजात ऐकू येत होता. त्या डायलॉगला एका दमदार, अंगावर काटा आणणाऱ्या टोनची गरज होती,” असं सचिन म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितलं की, “मी अमजदला स्टुडिओत घेऊन गेलो. त्यावेळी सूद नावाचे रेकॉर्डिस्ट होते. मी त्यांना सांगितलं, ट्रेबल पूर्ण बंद करा आणि बेस वाढवा. मग अमजदला मी सांगितलं – माईकच्या जवळ उभा राहा आणि वरच्या पट्टीत नाही, खालच्या पट्टीत बोल.”
संगीताचा अनुभव असल्यामुळे सचिन यांना हे समजत होतं की आवाजातील पट्टीचा प्रभाव किती मोठा असतो. “Because I am a singer also, मला ऑक्टेव्स समजतात… मी त्याला सांगितलं, वर ओरडू नकोस – खालीच्या सूरात बोल ‘कितने आदमी थे…’ आणि बस, त्याच क्षणाला तो डायलॉग जिवंत झाला,” असं सांगताना सचिन यांनी तो क्षण पुन्हा आठवला.
अमजद खान यांचा गब्बरचा डायलॉग आज चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक माइलस्टोन मानला जातो. पण त्या मागे सचिन पिळगांवकरांचं सूक्ष्म आणि महत्त्वाचं योगदान आहे, हे फार कमी लोकांना ठाऊक होतं – आणि आता, त्यांच्या या आठवणीमुळे हा किस्सा अजूनच संस्मरणीय ठरतोय.