‘रुबाब’च्या निमित्ताने शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात दमदार पदार्पण!

मराठी चित्रपटसृष्टीत नवनवीन विषयांसोबतच ताकदीचे दिग्दर्शक आपली ओळख निर्माण करत आहेत आणि आता या यादीत शेखर बापू रणखांबे यांचे नाव आवर्जून घेतले जात आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या चित्रपटाची पहिली झलक काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. धडाकेबाज टीझर प्रदर्शित होताच चित्रपटाबद्दलची चर्चा जोर धरू लागली आहे. दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे ‘रुबाब’च्या माध्यमातून एक रुबाबदार आणि वेगळ्या ढंगाची लव्हस्टोरी प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहेत. हा त्यांचा पहिलाच चित्रपट असून, टीझरलाच मिळालेला भरभरून प्रतिसाद त्यांच्या दिग्दर्शनाविषयी उत्सुकता वाढवणारा ठरतो आहे.

मुंबईत संघर्षाची वाट चालत शेखर बापू रणखांबे यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात प्लंबिंगसारखी कामे करत त्यांनी आपल्या स्वप्नांना धरून ठेवले. पुढे रंगभूमीशी त्यांचे नाते जुळले आणि नाटकांच्या बॅकस्टेजवर काम करताना कथाकथन, अभिनय आणि दिग्दर्शनाची शिस्त त्यांनी जवळून अनुभवली. याच काळात दिग्दर्शन आणि लेखनाकडे त्यांचा कल वाढला. अनेक चित्रपटांत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत त्यांनी अनुभव मिळवला. ‘रेखा’ आणि ‘पॅम्पलेट’ या शॉर्ट फिल्म्समधून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. ‘पॅम्पलेट’ या शॉर्ट फिल्मची निवड ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’च्या इंडियन पॅनोरमा विभागात झाली, तसेच ‘इंटरनॅशनल डॉक्युमेंटरी अँड शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल ऑफ केरला’मध्ये तिला पुरस्कारही मिळाला. ‘रेखा’ या शॉर्ट फिल्मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून, या चित्रपटाची निर्मिती प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनी केली होती. या शॉर्ट फिल्मचीही निवड इंडियन पॅनोरमा विभागात झाली होती.

चित्रपट दिग्दर्शनाची इच्छा मनाशी बाळगून असलेले शेखर बापू रणखांबे आता ‘रुबाब’च्या निमित्ताने आपली कथा मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहेत. गावाकडच्या प्रेमकथेचा विषय जरी परिचित असला, तरी ‘रुबाब’ची मांडणी आणि दृष्टिकोन मात्र वेगळा आहे. हा चित्रपट केवळ प्रेमकहाणीपुरता मर्यादित नसून, प्रेम जपताना असलेला स्वाभिमान, ठामपणा आणि आत्मविश्वास यांवर ठळकपणे भाष्य करतो.

दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे म्हणतात, “ ‘रुबाब’ हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे, कारण हा माझा पहिला चित्रपट आहे. झी स्टुडिओज आणि निर्माते संजय झणकर यांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांच्या विश्वासामुळे मला योग्य दिशा आणि व्यासपीठ मिळाले. चित्रपटातील कलाकारांनीही प्रामाणिकपणे काम करत या कथेला न्याय दिला आहे. ‘रुबाब’ ही केवळ लव्हस्टोरी नसून त्यामध्ये वेगळेपणा आहे. टीझरला मिळणारा प्रतिसाद पाहून खूप आनंद होतो आणि प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल, असा मला विश्वास आहे.”

या चित्रपटात संभाजी ससाणे आणि शीतल पाटील मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केले असून, संजय झणकर आणि गौरी झणकर निर्माते आहेत. उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर हे प्रस्तुतकर्ता आहेत. ‘रुबाब’ येत्या ६ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

=====

हे देखील वाचा : दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार! रितेश भाऊंच्या नव्या प्रोमोमुळे ‘बिग बॉस मराठी 6’ची उत्सुकता शिगेला

=====

Spread the love

Related posts

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अभिजीत श्वेतचंद्र; ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’साठी सज्ज

मराठी सिनेमाचा ऑस्करमध्ये डंका! ‘दशावतार’ची 2026 च्या ऑस्करच्या मुख्य शर्यतीत ऐतिहासिक झेप

प्रियदर्शिनी इंदलकर – अभिजीत आमकर यांची फ्रेश जोडी झळकणार ‘लग्नाचा शॉट’मध्ये

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More