खालच्या जातीतील लोकांसाठी लढा देणाऱ्या आणि समाजासाठी आजच्या हितासाठी विविध लढे देत, या समाजाला योग्य दिशा दाखवून मोठी क्रांती घडवणाऱ्या, महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल सर्वांनाच तशी जुजबी माहिती आहे. मात्र त्यांचे कार्य खूपच मोठे आणि विलक्षण होते. त्यांच्या कार्याची संपूर्ण जगाला इत्यंभूत माहिती देणारा ‘सत्यशोधक’ नावाचा एक सिनेमा येऊ घातला आहे. याच सिनेमात महात्मा फुले यांच्या पत्नीची सावित्रीबाई यांची भूमिका अभिनेत्री राजश्री देशपांडे साकारत आहे. नुकताच तिचा सिनेमातील पहिला लूक समोर आला आहे.
ज्या काळातील स्त्रियांना उंबरठा किंबहुना स्वयंपाक घरातून बाहेर येण्याचा देखील अधिकार नव्हता, त्या काळात स्त्रियांना शिक्षण मिळावे यासाठी लढा प्रखर दिला तो सावित्रीबाई फुले यांनी. आपल्या पतीला त्याच्या सामाजिक कार्यात साथ देत त्यांनी समाजाला योग्य दिशा देण्याचे महान काम केले. आज ज्या स्त्रिया मोठमोठ्या डिग्री घेत शिक्षण घेताना दिसत आहे, याचे संपूर्ण श्रेय सावित्रीबाई फुले यांनाच जाते. नुसते शिक्षण नाही तर इतरही अनेक गोष्टींमध्ये त्यांनी स्त्रियांना त्यांचा अधिकार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. नुकताच या सिनेमातील सावित्रीबाई यांची भूमिका साकारणाऱ्या राजश्री देशपांडेच्या पहिला लूक जाहीर करण्यात आला आहे.
आपल्या पतीच्या खांद्याला खांदा देत, समाजाचा रोष पत्करून फक्त महिलांच्या सबलीकरणाचा विचार करणाऱ्या आणि ते स्वप्न प्रत्यक्षात आणणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा जीवनप्रवास मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संघर्षमयी जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. याच पार्श्वभूमीवर या चित्रपटातील सावित्रीमाईंच्या भूमिकेतील राजश्री देशपांडे यांचे पोस्टर म्हणजेच फर्स्ट लूक प्रकाशित करण्यात आला आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते हे पोस्टर प्रकाशित करण्यात आले.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे म. फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सावित्रीमाईंच्या या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. पुण्यातील फुले वाड्यात हा कार्यक्रम संपन्न झाला. ‘‘युगानु युगाच्या स्त्री जन्मातील अंधाराला प्रकाशमय करणारी क्रांतीज्योत, सावित्रीमाईची गोष्ट!!’’ सांगणाऱ्या सावित्रीमाईंच्या समोर कंदिलाच्या प्रकाशात पाटी पेन्सिल आहे आणि त्यावर अक्षरे टिपलेली आहेत.
शांत, प्रेमळ आणि समजूतदारपणाच्या छटा त्यांच्या चेहऱ्यावर अगदी बोलक्या दिसत आहेत जणू स्त्रियांच्या प्रगत, शिक्षीत आणि नवजीवनाची दिशा आखत आहेत! आडवं कुंकू हे सावित्रीमाईंची ओळख सांगतं. राजश्री देशपांडे यांच्या या पर्फेक्ट लूकमुळे सावित्रीमाई याचि देही, याचि डोळा आपल्याला समोर दिसतात. यापूर्वी म. ज्योतिराव फुले यांचे पोस्टर लॉन्च झाले होते, अभिनेते संदिप कुलकर्णी म. फुलेंची भूमिका साकारत आहेत. त्यांच्या लूकचीही जोरदार चर्चा झाली होती. तर, अभिनेत्री राजश्री देशपांडे यांना यापूर्वी उत्कृष्ट अभिनयासाठी फिल्मफेअर ओटीटीचा उत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. दरम्यान ‘सत्यशोधक’ हा चित्रपट ५ जानेवारी, २०२४ रोजी प्रदर्शित होईल.