Rajinikanth Coolie Movie: पाच दशकांहून अधिक काळ अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारे सुपरस्टार रजनीकांत यांची लोकप्रियता आजही तशीच अबाधित आहे. सुरुवातीला खलनायकाच्या भूमिका साकारणारे रजनी, मेहनत आणि करिष्म्याच्या जोरावर ‘थलाइवा’ बनले. त्यांचा प्रत्येक चित्रपट हा चाहत्यांसाठी सणासारखा असतो.
यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांचा बहुप्रतिक्षित ‘कुली’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. १४ ऑगस्ट २०२५ रोजी रिलीज होणाऱ्या या चित्रपटाचं आगाऊ बुकिंग ९ ऑगस्टला सुरू होताच अवघ्या ३० मिनिटांत तब्बल १०,००० तिकिटांची विक्री झाली. यावरून प्रेक्षकांच्या उत्साहाचा अंदाज सहज लावता येतो.
आता या चित्रपटातील कलाकारांना मिळालेल्या मानधनाची चर्चा जोरात आहे. Deccan Heraldच्या माहितीनुसार, रजनीकांत यांनी ‘कुली’साठी तब्बल ₹200 कोटींचं मानधन घेतलं आहे. सुरुवातीला त्यांना ₹150 कोटी देण्याचं ठरलं होतं, मात्र तुफान अॅडव्हान्स बुकिंगमुळे त्यांचे मानधन वाढवण्यात आले.
या चित्रपटात बॉलीवूडचा ‘Mr. Perfectionist’ आमिर खानही एका खास भूमिकेत झळकणार आहे. सुरुवातीला त्याने ₹20 कोटी मानधन घेतल्याची चर्चा होती, पण त्याच्या जवळच्या सूत्रांनी सांगितलं की आमिरने रजनीकांत यांच्यावरील प्रेम आणि आदरापोटी हा चित्रपट कोणतेही मानधन न घेता केला आहे.
‘कुली’मध्ये नागार्जुन अक्किनेनी सायमनची भूमिका साकारत असून त्यांना ₹10 कोटी मिळाले आहेत. अभिनेत्री श्रुती हसनला ₹4 कोटी, तर ‘बाहुबली’ फेम सत्यराज (कटप्पा) यांना ₹5 कोटी मानधन मिळालं आहे.
या चित्रपटानंतर रजनीकांत ‘जेलर २’ मध्ये झळकणार आहेत. नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. वयाच्या ७४ व्या वर्षीही रजनीकांत यांची लोकप्रियता कमी झालेली नाही आणि ते आजही साउथ इंडस्ट्रीचे ‘मास हिरो’ मानले जातात.