ShareChat आणि Moj या भारतातील आघाडीच्या स्वदेशी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा भाग असलेल्या Quick TV ने आपल्या कंटेंट विश्वात एक नवा आणि प्रभावी प्रकार सादर केला आहे. ‘ऑपरेशन शक्ती’ ही मायक्रो-ड्रामा सिरीज गुप्तहेरगिरीचा थरार, सैन्याचा पराक्रम आणि अटळ देशप्रेम यांचा जबरदस्त संगम आहे. विशेष म्हणजे ही सिरीज व्हर्टिकल स्क्रीनसाठी खास तयार करण्यात आली असून आजच्या मोबाईल-फर्स्ट प्रेक्षकांना ध्यानात घेऊन मांडली आहे.
या सिरीजमध्ये अभिनेता रोहित चौधरी एका हटके आणि दमदार भूमिकेत दिसतो. ‘बरेली की बर्फी’, ‘कानपूरिये’सारख्या चित्रपटांमधील आणि ‘बहुत हुआ सम्मान’ व ‘द फॉरगॉटन आर्मी’सारख्या वेब व टीव्ही प्रोजेक्ट्समधील कामासाठी ओळखला जाणारा रोहित येथे अंडरकव्हर एजंट परमवीर सिंगच्या भूमिकेत झळकतो. पाकिस्तानातील शत्रू प्रदेशात ‘हैदर’ या नावाने वावरत असताना, एका दहशतवादी हल्ल्यात त्याच्या बहिणीचा – शक्तीचा – मृत्यू होतो आणि इथूनच त्याच्या मिशनला वैयक्तिक सूडाची धार येते.
बहिणीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी परमवीर ‘घोस्ट स्क्वॉड’ नावाची एक गुप्त टीम उभी करतो. या धोकादायक मोहिमेत त्याला अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागतं. या प्रवासात त्याची गाठ पडते आयएसआयएस एजंट झोयाशी, जी भूमिका स्वाती नेगीने साकारली आहे. तिचं खलनायकी सादरीकरण कथेला आणखी धारदार बनवतं.
एकूण ५४ भागांची ही सिरीज तीव्र अॅक्शन, देशभक्तीची भावना आणि थरारक वळणांनी भरलेली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित झालेली ‘ऑपरेशन शक्ती’ देशप्रेम जागं करण्याचं काम करते. सीमारेषेवरील घुसखोरी, तणावपूर्ण चौकशी सीन, दुहेरी एजंट्स आणि अनपेक्षित ट्विस्ट्स यामुळे प्रत्येक भाग शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.
मायक्रो-ड्रामा प्रकारात नवा प्रयोग करत, या सिरीजमध्ये अत्याधुनिक प्रोस्थेटिक मेकअपचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक वेषांतर आणि जखमेचं दृश्य अधिक वास्तवदर्शी वाटतं. याशिवाय, या सिरीजमधील ओरिजिनल गाणी देशप्रेम जागवणाऱ्या शब्दांनी आणि भावस्पर्शी सुरांनी प्रेक्षकांच्या मनाला भिडतात.
ShareChat आणि Moj चे CEO व Co-Founder अंकुश सचदेवा यांनी यासंदर्भात सांगितलं की, “आजचे प्रेक्षक केवळ मनोरंजन नाही, तर त्यांच्या भावना आणि वर्तमान घडामोडींशी जोडलेला कंटेंट पाहू इच्छितात. ‘ऑपरेशन शक्ती’च्या माध्यमातून आम्ही आमच्या कंटेंटमध्ये नवे प्रयोग करत आहोत, जे प्रेक्षकांच्या आवडीला साजेसे असतील आणि त्यांना अधिक पर्याय देतील.”