महाराष्ट्राच्या हृदयात कोरलेलं नाव – छत्रपती शिवाजी महाराज – तब्बल ३४५ वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत, तेही नव्या रूपात, नव्या ध्येयाने! गेल्या काही काळापासून चर्चेत असलेला ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा भव्य मराठी चित्रपट या येणाऱ्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. आणि याची औपचारिक घोषणा करण्यात आली आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी, विठ्ठल-रखुमाईच्या आशीर्वादासह.
दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर यांनी विठ्ठल दर्शन घेत, चित्रपटाचा थरारक टीझर रसिकांसमोर आणला. या चित्रपटाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा त्यांनीच सांभाळली असून, निर्मितीची जबाबदारी राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध यांच्यावर आहे. शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता सिद्धार्थ बोडके दिसणार असून, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये बालकलाकार त्रिशा ठोसरही झळकली आहे.
टीझरची सुरूवात होते ती एका आवाजाने — “राजं… राजं…”. या शब्दांमधली तगमग, आर्तता आणि जोश मनाला चटका लावतो. सिद्धार्थ बोडके यांच्या संवादातून इतिहास जणू पुन्हा जिवंत होतो — पण केवळ भूतकाळ आठवण्यासाठी नव्हे, तर आजसाठी प्रेरणा घेण्यासाठी. महाराजांचं व्यक्तिमत्त्व, त्याग, टीझरमधून प्रत्ययाला येतं. प्रत्येक दृश्य, प्रत्येक संवाद अंगावर काटा आणतो.
हा चित्रपट केवळ ऐतिहासिक पुनरावलोकन करत नाही, तर आधुनिक समाजाला शिवरायांच्या विचारांतून नवी दिशा दाखवण्याचा प्रयत्न करतो.
या संदर्भात दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणतात –
“शिवाजी महाराज ही एक ऐतिहासिक व्यक्तिरेखा नाही, ते एक जिवंत विचार आहेत. आणि आज त्यांची गरज अधिक भासत आहे. ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट म्हणजे केवळ इतिहासाकडे मागं वळून पाहणं नाही, तर त्या विचारांमधून आजचा अंधार दूर करण्याचा प्रयत्न आहे. समाजात जी निराशा, उदासीनता आणि दिशाहीनता आहे, त्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी पुन्हा एकदा आपण महाराजांकडे वळायला हवं. हा सिनेमा त्या जाणिवेचा आवाज आहे.”