एव्हरेस्ट एंटरटेनमेंट पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे प्रेमाची अनोखी कथा – पण यावेळी प्रेमकहाणी आहे एका अरेंज मॅरेजची! ‘प्रेमाची गोष्ट २’ या बहुप्रतीक्षित मराठी चित्रपटाचा हटके टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून, टीझरमुळे प्रेक्षकांच्या उत्कंठेला उधाण आलं आहे. येत्या २२ ऑक्टोबरला, दिवाळीच्या खास मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘प्रेमाची गोष्ट’ या चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद लाभला होता. घटस्फोटासारख्या संवेदनशील विषयावर प्रभावी भाष्य करत, या चित्रपटाने अनेकांच्या मनाचा ठाव घेतला होता. त्यामुळे ‘प्रेमाची गोष्ट २’ बाबत प्रेक्षकांच्या अपेक्षा अधिकच उंचावल्या आहेत. यावेळीही प्रेम आणि वास्तव यांचं एक वेगळंच नातं उलगडणार आहे.
चित्रपटाच्या टीझरमध्ये ललित प्रभाकरसोबत स्वप्नील जोशी आणि भाऊ कदम यांचाही सशक्त सहभाग आहे. आबुराव आणि बाबुराव ही त्यांची पात्रं प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचं काम करतायत. टीझरमध्ये ललित घटस्फोटासाठी कोर्टात पोहोचलेला दिसतो, आणि आपल्या प्रेमातल्या चुकांचा दोष तो थेट देवालाच देतो. त्याचवेळी देव त्याला “होऊ दे तुझ्या मनासारखं” म्हणत पुन्हा प्रेमात नशीब आजमावण्याची संधी देतो. या नवीन संधीमुळे ललितच्या आयुष्यात काय बदल होतात, हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे.
या चित्रपटात ललित प्रभाकरसोबत ऋचा वैद्य आणि रिधिमा पंडित या अभिनेत्रींचाही दमदार अभिनय पाहायला मिळेल. या नव्या स्टारकास्टमुळे कथेला आणखी उंची मिळणार आहे.
चित्रपटाचे निर्माते संजय छाब्रिया म्हणतात, “आजच्या तरुणाईच्या नजरेतून प्रेमाचं दर्शन घडवणारी ही कथा आहे. सतीश राजवाडेंनी पूर्वीही अनेक सुपरहिट प्रेमकथा सादर केल्या असून, आता ही कथा प्रेक्षकांच्या मनात घर करेल याची खात्री आहे.”
दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणतात, “ही एक फ्रेश लव्ह स्टोरी आहे. खास व्हीएफएक्स वापरून प्रेमाच्या या प्रवासाला एक जादुई अनुभव देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. टीझरला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद मनाला आनंद देतो.”
एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि संजय छाब्रिया निर्मित ‘प्रेमाची गोष्ट २’ हे दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचं आणखी एक हृदयस्पर्शी प्रेमकथानाट्य ठरणार आहे. सहनिर्माते अमित भानुशाली यांचीही यात मोलाची साथ आहे. प्रेम आणि नशीबाचा हा जादुई प्रवास यंदाच्या दिवाळीत, २२ ऑक्टोबर रोजी, मोठ्या पडद्यावर अनुभवायला विसरू नका!