उन्हात नऊवारी साडी नेसून घोडेस्वारी करणं सोपं नव्हतं – प्राप्ती रेडकरची ‘सावळ्याची जणू सावली’मधील खास आठवण

प्रेक्षकांना नेहमीच काहीतरी वेगळं, नवं देण्याचा प्रयत्न मालिकांची टीम सातत्यानं करत असते. असंच काहीसं ‘सावळ्याची जणू सावली’ या झी मराठीवरील मालिकेत पाहायला मिळालं. मालिकेत नुकतंच सावली आणि सारंगच्या लग्नाचं मोठं प्रकरण पार पडलं. लग्न म्हटलं की नाट्य आलंच! आणि त्यात सावलीच्या आगमनात प्रेक्षकांना जे काही पाहायला मिळालं, त्यानं प्रेक्षक अक्षरश: भारावून गेले.

या सीनबद्दल अभिनेत्री प्राप्ती रेडकर सांगते –

“जेव्हा मला कळलं की सेटवर घोडा येणार आहे, तेव्हापासूनच मी फारच उत्साही होते. पण त्याचबरोबर मला नऊवारी साडी, नथ, हिरवा चुडा, चंद्रकोर आणि सावळा मेकअप करून घोडेस्वारी करायची होती – म्हणजेच पूर्ण साजशृंगारात! हे ऐकून थोडं नर्व्हस वाटलं, कारण आयुष्यात पहिल्यांदाच असं काही करत होते. आई-बाबांनी खूप आत्मविश्वास दिला. सेटवर मला थोडं ट्रेनिंगही दिलं गेलं.”

ती पुढे म्हणाली, “दिग्दर्शक सरांनी विचारलं की तुला बॉडी डबल लागेल का? पण मी ठामपणे म्हणाले की हे मी स्वतः करणार. खरं सांगायचं तर उन्हात नऊवारी साडी सांभाळत घोडेस्वारी करणं फार आव्हानात्मक होतं, पण आम्ही तो सीन उत्तम पार पाडला.”

पण इथेच खास गोष्ट संपत नाही. प्राप्ती पुढे सांगते, “जेव्हा घोड्याची एंट्री झाली, तेव्हा लक्षात आलं की ती घोडी आहे आणि तिचं नाव रज्जो आहे. शूटदरम्यान मी तिच्याशी अगदी मैत्री केली. मी बोलायचे आणि ती ऐकायची असं वाटायचं. शूटिंगदरम्यान उन्हात ती उभी असली की मी स्वतः तिच्यासाठी सावली शोधायचे. थोडक्यात, रज्जोशी एक घट्ट नातं निर्माण झालं.”

या सुंदर अनुभवाचा शेवट करताना प्राप्ती म्हणते, “कलाकार म्हणून अनेक अनोखे प्रसंग अनुभवायला मिळतात. पण रज्जोसारखी सहकारी फार कमी वेळा भेटते.”

म्हणूनच, ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील सावली-सारंगच्या नव्या संसाराचं पुढचं पान बघायला विसरू नका – दररोज संध्याकाळी ७ वाजता, फक्त झी मराठीवर!

Spread the love

Related posts

Smriti Irani : स्मृती इराणी पुन्हा ‘तुलसी’च्या रुपात! ‘क्योंकि सास भी कभी बहू थी 2’ मधून लूक लीक

विद्या बालनचं मराठी मालिकेत आगमन; शिक्षिकेच्या भूमिकेत झळकणार, प्रोमो झाला व्हायरल!

‘कमळी’चा प्रेरणादायी उपक्रम! शाळकरी मुलींच्या शिक्षणासाठी १०० सायकलींचं वाटप

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More