Prajakta Mali on Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठी 6 साठी अनेक कलाकारांची नावं सध्या चर्चेत आहेत. यामध्ये लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नावही घेतलं जात होतं. बिग बॉस मराठीच्या घरात जाण्याबाबत प्राजक्तानं नेमकं काय म्हटलं, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक होते.
छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त आणि चर्चित शो म्हणजे ‘बिग बॉस’. काही दिवसांपूर्वीच ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वाची अधिकृत घोषणा झाली. मागील सीझनच्या यशानंतर यंदाच्या पर्वाबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळतेय. विशेष म्हणजे यावेळीही महाराष्ट्राचा लाडका ‘भाऊ’ अर्थात रितेश देशमुखच हा शो होस्ट करताना दिसणार आहे.
स्पर्धकांची नावं सध्या गुप्त ठेवण्यात आली असली, तरी सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. चाहते देखील आपल्या आवडत्या कलाकारांना थेट प्रश्न विचारत आहेत. मराठी सिनेसृष्टीतील ‘फुलवंती’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राजक्ता माळीलाही एका चाहत्यानं ‘बिग बॉस मराठीमध्ये जाणार का?’ असा प्रश्न विचारला आणि त्यावरचं तिचं उत्तर सध्या चर्चेत आलं आहे.
बिग बॉसच्या एन्ट्रीवर काय म्हणाली प्राजक्ता माळी?
प्राजक्तानं नुकताच इन्स्टाग्रामवर चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी तिनं अनेक प्रश्नांना मनमोकळी उत्तरं दिली. त्याच दरम्यान एका चाहत्यानं ‘बिग बॉस मराठी?’ असा थेट प्रश्न विचारला. यावर प्राजक्तानं फक्त दोन शब्दांत उत्तर दिलं – ‘Never Ever’, म्हणजेच कधीच नाही!
या उत्तरानंतर प्राजक्ता माळी बिग बॉस मराठी 6 मध्ये दिसणार नाही, हे स्पष्ट झालं असून चाहत्यांना अखेर अपेक्षित उत्तर मिळालं आहे.