मनोरंजन हे क्षेत्र लोकांना जागृत करण्याचे मोठे आणि प्रभावी माध्यम आहे. या माध्यमाच्या वापरातून अनेकदा विविध सामाजिक विषयांना हात घालत लोकांना त्याबाबत जागरूक केले जाते. चित्रपट, नाटकं, मालिका यामधून लोकांना अनेक वाईट प्रथा, चालीरीती, अंधश्रद्धा आदी अनेक बाबींबद्दल विचारणा योग्य दिशा दिली जाते. या माध्यमाची पोहोच देखील दूरवर असल्याने आता या माध्यमाचा वापर लोकांना जागृत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो.
दरम्यान ‘कळसूत्री’ या संस्थेतर्फे मीना नाईक गेली कित्येक वर्ष सातत्याने मुलांच्या सामाजिक समस्यांवर नाटक आणि पपेट्स माध्यमातुन लोकजागृती निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न करत आहेत. त्यांचं ‘वाटेवरती काचा ग..’ हे बाल लैंगिक शोषणावरील नाटक, ‘अभया’ हे पॉक्सो कायद्याविषयीचे नाटक सध्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्रा बाहेरही गाजत आहे.
या नाटकांचे प्रयोग करत असताना लक्षात आलं कि ग्रामीण भागात, आदिवासी समाजात आणि काही प्रमाणात शहरी भागातही मुलींना फक्त ७वी पर्यंत शिकवून त्यांचं लग्न लावून दिलं जात. कारणं अनेक आहेत. ७वी नंतर पुढे शिकायचं असेल तर दूरवर चालत जावं लागतं. त्यामुळे पालकांना भीती वाटते. मुलींवर काही अतिप्रसंग झाला तर. काहीवेळा पालकांना वाटतं मुलींचं लग्न लावून दिलं कि आपली जबाबदारी संपली. सासर लोकांनी तिच उर्वरित आयुष्य कसं ते पाहून घ्यावं. परंतु आजच्या जगात शिक्षण किती महत्वाचं आहे, या बद्दल समाजात जागृती निर्माण करून बालविवाह टाळणं आवश्यक आहे, हे नाटकाच्या माध्यमातून पटवता येतं. व्याख्यान किंवा पुस्तकं वाचून दाखवण्या पेक्षा नाटकातुन अधिक परिणाम होतो. हे मी अनेकदा दाखवून दिलेलं आहे.
सातवी पास हे नाटक राधा या एका तरुण मुलीच्या भोवती फिरते. जिने नुकतीच 7 वी इयत्ता पूर्ण केली आहे. तिला तिचे शिक्षण सुरू ठेवण्याची इच्छा आहे. परंतु तिच्या निर्णयाला तिच्या आईचा तीव्र विरोध आहे. ती राधाला शाळेत जाण्यास मनाई करते आणि तिचे लग्न करण्याचा निर्णय घेते. दरम्यान या नाटकातून समाजात आजही अस्तित्वात असणाऱ्या बालविवाह, शिक्षणाचा अधिकार आदी अनेक गंभीर समस्येवर प्रकाश टाकते.
प्राजक्त देशमुख हा तरुण यशस्वी नाटककाराने हे ‘सातवी पास’ नाटक लिहिले असून, कौशल इनामदार यांनी नाटकाला संगीत दिले आहे. तीन तरुण मुली आणि तीन मुलगे यांनी प्राजक्तची ही संहिता जिवंत केली आहे. या नाटकात अत्यंत कल्पकतेने मीना नाईक यांनी पपेट्स चा उपयोग केला आहे. नाच गाणी आणि पपेट्स यामुळे नाटकाची रंगत वाढली आहे. एन. सी. पी. ए. ने या नाटकाचा प्रारंभ 2 डिसेंबरला 5 वा. त्यांच्याकडे करण्याचे योजले आहे.