सणवार सुरु झाले की अनेक लहानमोठे सिनेमे एकापाठोपाठ प्रदर्शित होण्यास सुरुवात होते. सध्या असेच मराठी मनोरंजनविश्वात चालू झाल्याचे चित्र आहे. अनेक चांगल्या सिनेमांची मेजवानी मराठी प्रेक्षकांना मिळणार आहे. या चित्रपटांच्या गर्दीत आता अजून एका नवीन सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ‘पिल्लू बॅचलर’ असे या सिनेमाचे नाव आहे. नावापासूनच उत्सुकता निर्माण करणारा “पिल्लू बॅचलर” हा नवा चित्रपट दिवाळीनंतर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
विनोदी अंगानं जाणारी एक हलकीफुलकी कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. नावावरून प्रेमकथा असल्याचा अंदाज बाधता येतो, पण तरीही कथा काय असेल यांचं कुतूहल आहेच. त्याशिवाय उत्तम कलाकार, दूरदृष्टी असलेला दिग्दर्शक, उत्कृष्ट गाणी आणि तांत्रिकदृष्ट्या भक्कम असलेल्या या चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली आहे. मात्र त्यासाठी ८ डिसेंबरपर्यंत वाट पहावी लागणार आहे. चित्रपटात पार्थ भालेराव, सायली संजीव, अक्षया देवधर, शशांक शेंडे, डॉ. मोहन आगाशे असे उत्तमोत्तम कलाकार आहेत. पार्थचा नुकताच बॉइज ४ हा सिनेमा प्रदर्शित झाले असून, त्याला प्रेक्षकांनी दमदार प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता पार्थच्या या आगामी सिनेमाकडून प्रेक्षकांना चांगल्याच अपेक्षा आहेत.
वर्षा पाटील, सुनील फडतरे, अभिजित देशपांडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अरविंद जगताप यांनी लिहिलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन तानाजी घाडगे यांनी केलं आहे. बस्ता, बरड असे उत्तम चित्रपट तानाजी घाडगे यांनी या पूर्वी प्रेक्षकांना दिले आहेत. मंगेश कांगणे यांनी गीतलेखन, चिनार महेश यांनी संगीत दिग्दर्शन, सूर्या मिश्रा यांनी छायांकन, अनंत कामथ यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे.