स्टार प्रवाहने गेल्या अनेक वर्षांमध्ये महाराष्ट्राला इतिहासाची, परंपरेची आणि संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांसमोर आणल्या आहेत. राजा शिवछत्रपती, जय भवानी जय शिवाजी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा मालिकांच्या माध्यमातून मराठी समाजाच्या गौरवशाली इतिहासाला नवं रूप देत ही वाहिनी नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आली आहे. आता त्याच मालिकेत आणखी एक महत्त्वाचा अध्याय जोडत, स्टार प्रवाह क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमयी जीवनावर आधारित मालिका घेऊन येत आहे.
दीडशे वर्षांपूर्वी, जेव्हा महिलांना ‘चूल आणि मुल’ या चौकटीत मर्यादित करणारी समाजव्यवस्था अस्तित्वात होती, तेव्हा सावित्रीबाई आणि महात्मा जोतीबा फुले यांनी त्या चौकटींना खंबीरपणे छेद दिला. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे मुलींच्या शिक्षणासाठी नवी दारे खुली झाली आणि ‘शिकून सज्ञान होण्याचा’ अधिकार मिळवून देण्याचा ऐतिहासिक मार्ग मोकळा झाला. घरच्यांच्या विरोधापासून समाजाच्या रोषापर्यंत—अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जात त्यांनी परिवर्तनाची ज्योत पेटवून ठेवली.
हीच प्रेरणादायी कथा आता मनोरंजनातून थेट घराघरांत पोहोचणार आहे. या मालिकेत अभिनेत्री मधुराणी गोखले सावित्रीबाईंची भूमिका साकारणार आहेत, तर डॉ. अमोल कोल्हे महात्मा जोतीबा फुलेंच्या भूमिकेत झळकणार आहेत. या मालिकेची निर्मिती अमोल कोल्हे यांच्या जगदंब क्रिएशन्सने केली आहे.
आपल्या भावनांविषयी बोलताना मधुराणी म्हणतात,
“सावित्रीबाई म्हणजे युगाची स्त्री. एवढं विराट व्यक्तिमत्त्व साकारण्याची संधी मिळतेय, ही माझ्यासाठी अभिमानाची आणि जबाबदारीची गोष्ट आहे. आपण आज ज्या स्वातंत्र्यानं शिकतो, काम करतो—त्या स्वातंत्र्यासाठी सावित्रीबाईंनी केलेला संघर्ष अवर्णनीय आहे. त्यांच्या विषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याचा मला आनंद आहे. विविध भावना मनात आहेत… आणि प्रेक्षकांची साथ मिळेल, हीच आशा.”
डॉ. अमोल कोल्हे सांगतात,
“महात्मा जोतीराव फुले यांची व्यक्तिरेखा साकारणं हे वेगळंच आव्हान आहे. विचारांची प्रखर मशाल—हे वर्णन त्यांच्यासाठी अगदी योग्य. व्यवस्थेला प्रश्न विचारायची हिंमत त्यांनीच दिली. स्टार प्रवाहसोबतचं माझं नातं आधीपासूनच खास आहे. ‘राजा शिवछत्रपती’ मालिकेने माझ्या प्रवासाला मोठं वळण दिलं. आता १७ वर्षांनी पुन्हा स्टार प्रवाहसोबत, अभिनेता आणि निर्माता या दोन्ही भूमिकांमध्ये काम करण्याची संधी मिळतेय. सावित्रीबाईंचा इतिहास साकारताना मनात प्रचंड भावुकता आहे.”
या भव्य प्रकल्पाबद्दल स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे म्हणतात,
“मनोरंजनासोबत समाजिक बांधिलकी जपणं ही स्टार प्रवाहची परंपरा आहे. स्त्री–पुरुष समानतेची वाटचाल आज मोठ्या उंचीवर पोहोचली आहे, पण काही काळापूर्वी महिलांची मर्यादा केवळ घरापर्यंतच होती. अशा काळात सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांनी शिक्षण, विधवा पुनर्विवाह, बालविवाह, सतीप्रथा यांना धैर्याने विरोध करत समाजपरिवर्तनाची क्रांती घडवली. सावित्रीबाईंचे कष्ट आणि जोतीबांच्या पाठिंब्यामुळेच स्त्रियांना आजचा उंबरठ्याबाहेरचा अभिमानाचा प्रवास शक्य झाला. ही कथा मालिकेतून मांडणं अत्यावश्यक होतं.”
५ जानेवारीपासून स्टार प्रवाहवर ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’