स्वप्नील जोशीची मुलगी मायरा जोशीचा भावनिक डेब्यू; अवधूत गुप्तेच्या ‘सांग आई’ गाण्यातून आई-मुलीच्या नात्याची सुरेख साद

आई आणि मुलीचं नातं म्हणजे गोडवा, आपुलकी, आणि अव्यक्त भावना… याच नात्याची सुरेल मांडणी अवधूत गुप्ते यांच्या ‘आई’ अल्बममधील शेवटच्या गाण्यात — ‘सांग आई’ — अनुभवायला मिळते. या गाण्याच्या निमित्ताने मायरा स्वप्नील जोशी हिने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली आहे.

स्वप्नील जोशीची कन्या असलेली मायरा या गाण्यात आपल्या पहिल्याच भूमिकेत कमालीची भावनिक उंची गाठताना दिसते. आईची आठवण, तिचं अनुकरण, आणि त्यामागचं गहिरं नातं – हे सगळं ती अत्यंत सहजतेने, प्रामाणिक अभिनयातून साकारते.

‘सांग आई’ या गाण्याचं दिग्दर्शन शोनील यलट्टीकर यांनी केलं असून, पूर्णिमा डे आणि मायरा मायलेकीच्या भूमिकेत दिसतात. एकविरा म्युझिक प्रस्तुत या गाण्याचं संगीत अवधूत गुप्ते यांचं आहे. शब्दांना जिवंत करणारे अर्थपूर्ण बोल प्रशांत मडपुवार यांनी लिहिले असून, संगीत संयोजन अनुराग गोडबोले यांचं आहे.

या गाण्याच्या निमित्ताने अवधूत गुप्ते भावनिक होतात. ते म्हणतात, “आई आणि मुलीमधील नातं अतिशय वेगळं असतं. मायरा ही माझ्या मित्राची मुलगी असली तरी तिच्या डोळ्यांत भाव आहे, अभिनय नैसर्गिक आहे. त्यामुळे ती या गाण्यासाठी योग्य होती. तिच्यात स्वप्नीलचे गुण स्पष्ट दिसतात. हे गाणं माझ्या मनापासून आलं आहे.”

गाण्याचं चित्रपटांकन, फ्रेम्स आणि एकंदर सौंदर्य हे पाहताना संगीतप्रेमी भारावून जातात. हे गाणं केवळ ऐकणं नाही, तर अनुभवणं होतं. ‘आई’ या अल्बममधील ही शेवटची कलाकृती प्रेक्षकांच्या मनात नक्कीच घर करून राहते.

स्वप्नील जोशीची कन्या असूनही मायराने स्वतःच्या ताकदीवर पहिल्याच गाण्यात स्वतःची छाप सोडली आहे. तिच्या चेहऱ्यावरील गोड भाव, संवाद नसतानाही भावना पोहोचवण्याची हातोटी आणि आई-मुलीच्या नात्याचा आत्मा साकारण्याची क्षमता लक्षवेधी आहे.

‘सांग आई’ हे गाणं म्हणजे एका नात्याचं हृदयातून केलेलं संगीतमय चित्रण – जे नक्कीच सगळ्यांच्या हृदयाला भिडणारं आहे.

Spread the love

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More