चित्रपटप्रेमींच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरणाऱ्या २२ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला मुंबईत शुक्रवार, ९ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. पन्नासहून अधिक देशांतील विविध भाषांमधील निवडक सिनेमांचा समावेश असलेल्या या महोत्सवामुळे यंदाही सिनेप्रेमींसाठी एक आगळीवेगळी मेजवानी सजणार आहे.
यंदाच्या महोत्सवाचं विशेष आकर्षण ठरणार आहे ते मराठमोळ्या कलावंतांचे चित्रपट. यात दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांचा बहुचर्चित आगामी हिंदी चित्रपट ‘मयसभा’, दिग्दर्शक क्षितीज पटवर्धन यांचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘उत्तर’, तसेच दिग्दर्शक संतोष डावखर यांचा ‘गोंधळ’ या महत्त्वाच्या कलाकृतींचा समावेश आहे. सान चित्रपट महोत्सवात FIPRESCI ज्युरी पुरस्कार पटकावलेल्या इंडोनेशियन चित्रपट ‘ऑन यूअर लॅप’ (पांगकू) यांच्या विशेष प्रदर्शनाने महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे.
निवडलेले चित्रपट प्रभादेवीतील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये तसेच ठाण्यातील लेक शोर मॉलमधील सिनेपोलीस चित्रपटगृहात प्रदर्शित केले जाणार आहेत. ९ दिवस चालणाऱ्या या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवासाठी सशुल्क नोंदणी सुरू असून, आजच रजिस्ट्रेशन करून दर्जेदार आणि वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांचा अनुभव घ्या. अतिशय वाजवी शुल्कात प्रतिनिधी नोंदणीसाठी www.thirdeyeasianfilmfestival.com या संकेतस्थळाला भेट द्या. प्रभात चित्र मंडळाच्या सभासदांसाठी खास सवलतीची सोयही उपलब्ध आहे.
या महोत्सवात पद्मभूषण सई परांजपे यांना ‘आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार’ देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच दिग्दर्शिका उमा दा कुन्हा यांना ‘सत्यजित रे स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. दिवंगत सुधीर नांदगांवकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यावर्षीचा विशेष चित्रपट लेखन पुरस्कार चित्रपट अभ्यासक व क्युरेटर मिनाक्षी शेड्डे यांना देण्यात येणार आहे.
=====
हे देखील वाचा :
=====