आपल्या देशात चित्रपट, मालिका या माध्यमांमध्ये काही गोष्टी, काही विषय स्पष्ट भाषेत मांडण्यासाठी खूपच मर्यादा आहेत. मात्र ओटीटी माध्यम आल्यापासून ही कमी त्याने भरून काढली. या माध्यमावर कोणतेही बंधन नसल्यामुळे अनेक संवेदशील आणि बोल्ड विषय या प्लॅटफॉर्मवर वेबसिरीज किंवा चित्रपटाच्या माध्यमातून येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे काही बोल्ड मात्र समाजाच्या, स्वतःच्या दृष्टीने महत्वाच्या अशा अनेक विषयांना वाचा फोडण्यास मदत झाली.
मागील काही काळापासून वेगवेगळ्या प्रकारची गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढत असून, यात ‘सेक्स्टॅार्शन’ या एका नवीन गुण्याची भर पडलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. सेक्स्टॅार्शन म्हणजेच लैंगिक खंडणी. अतिशय संवेदनशील असलेल्या या विषयाला भीती, लाज आदी गोष्टींमुळे नीटशी वाचा फुटलेली पाहायला मिळत नाही. मात्र जर आपण ‘सेक्स्टॅार्शन’चा नीट अभ्यास केला तर आपल्याला जाणवेल हे किती मोठे आणि भयानक गुन्हेगारीचे जग बनत आहे.
याच महत्वाच्या, काहीशा मागे राहत असलेल्या आणि पुरेशी माहिती नसलेल्या विषयाला आता एका वेबसिरीजच्या माध्यमातून समाजासमोर मांडण्यात येणार आहे. ‘सेक्स्टॅार्शन’च्या जाळ्याबद्दल, त्यात अडकणाऱ्या लोकांबद्दल, याच्या स्वरूपाबद्दल आदी अनेक गोष्टींची माहिती आपल्याला या सिरीजमधून मिळणार आहे. समाजातील विविध स्तरातील लोक प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष जाहिरातीतून, फोनवर, सोशल मीडियावर सेक्स संदर्भातील व्हिडीओज, जाहिराती बघतात आणि एका वेगळ्याच चक्रव्युहात अडकतात.
समाजाच्या भीतीपोटी, शरमेखातर या महाजालमध्ये अडकलेले अनेक जण योग्य पाऊल उचलत नाहीत. समाजातील याच भयाण वास्तवावर भाष्य करणारी ‘कांड’ ही वेबसीरिज लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. भिमराव काशिनाथ मुडे दिग्दर्शित ‘कांड’ या वेबसीरिजचे पोस्टर सोशल मीडियावर नुकतेच झळकले आहे.
मनवा नाईक, हरीश दुधाडे, भिमराव काशिनाथ मुडे यांनी या सीरिजचे लेखन केले असून, प्लॅनेट मराठी आणि मॅन्यूएला क्रिएशन्स निर्मित या वेबसीरिजचे अक्षय विलास बर्दापूरकर आणि मनवा नाईक निर्माते आहेत. मात्र या सिरीजचे पोस्टर जरी समोर आले असले तरी यात कोणकोणते कलाकार दिसणार याबद्दलची माहिती अद्यापही गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये आता या सिरीजमधील कलाकारांबद्दल अनेक चर्चांना उधाण आलेले पाहायला मिळत आहे.
सेक्स्टॅार्शनच्या गुन्ह्यामध्ये मधल्या काही काळापासून मोठ्याप्रमाणावर वाढ झालेली दिसत आहे. अशातच यात अडकलेले लोकं बाहेर पडता येत नसल्यामुळे टोकाचा विचार करतात. मात्र ‘कांड’ या सिरीजमधून सेक्स्टॅार्शनच्या गुन्ह्याबद्दल आणि त्यातून बाहेर पडण्याबद्दल लोकांना जागरूक केले जाणार आहे. अशा गोष्टीत अडकल्यानंतर काय करावे, कसे या गोष्टीला सामोरे जावे याबद्दल लोकांना माहिती या सिरीजमधून मिळणार आहे.
अतिशय वेगळ्या मात्र खूपच महत्वाच्या विषयावर येऊ घातलेल्या या सिरीजबद्दल लोकांच्या मनात कमालीची उत्सुकता दिसून येत आहे. मुख्य म्हणजे सिरीजचे पोस्टर पाहून ही कमालीची बोल्ड सिरीज असण्याची शक्यता देखील नाकारता येऊ शकत नाही. त्यामुळे आता या सिरीजबद्दल लवकरच पुढील माहिती येईल आणि प्रेक्षकांच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांना उत्तर मिळतील.