ऐसा कार्तिकीचा सोहळा । चला जाऊ पाहू डोळा । ५०० प्रयोगांनंतर ‘संगीत देवबाभळी’ घेणार प्रेक्षकांचा निरोप

ऐसा लाभा जो चुकला | तुका म्हणे वाया गेला

सहा वर्षापूर्वी २२ डिसेंबर २०१७ यादिवशी ‘भद्रकाली’ प्रॉडक्शन’ च्या ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाचा श्रीगणेशा झाला. सहा वर्षांपासून सुरू असलेला या नाटकाचा यशस्वी प्रवास आता शेवटाकडे आला आहे. विठुरायाच्या आशीर्वादाने आणि आपल्या प्रेम प्रतिसादाने भारावलेली ही ‘संगीत देवबाभळी’ची नाट्य दिंडी आता विसावणार आहे. येत्या बुधवारी अर्थात २२ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६.३० वाजता श्री षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृह, सायन, मुंबई येथे या नाटकाचा शेवटचा प्रयोग संपन्न होणार आहे.

या तुफान गाजलेल्या आणि प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलेल्या नाटकाचा हा सहा वर्षांचा प्रवास सहज आणि सोपा अजिबातच नव्हता. अतिशय एक नवा आणि हटके विषय, नवीन लेखक, नवे मात्र प्रतिभासंपन्न कलाकार घेऊन हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर येणे तसे अवघड होते. परंतु भद्रकाली प्रोडक्शनने हा प्रयोग केला आणि मायबाप प्रेक्षकांच्या साथीने तो यशस्वी देखील झाला. मध्ये करोना सारखं भयाण संकट येऊन गेले मात्र त्यानंतरही रसिकांचे या नाटकावरील प्रेम कमी झाले नाही, ते चंद्रभागेसारखं वाहतच राहिलं.

प्रेक्षकांच्या याच प्रेमामुळे या नाटकाने सर्वाधिक ४४ पुरस्कार प्राप्त केले आणि लाखो रसिकांसह अनेक दिग्गजांच्या मनाला भुरळ घातली. मजल दरमजल करत अवघा महाराष्ट्र विठुमय करणारी ही ‘देवबाभळी’ आता ५०० व्या प्रयोगापर्यंत येऊन पोहोचली आहे.

खरं तर मायबाप रसिकांचा आग्रह आहे की, नाटक बंद करू नका मात्र कुठेतरी थांबणं हे गरजेचे असते. म्हणून ही वारी ५०० व्या प्रयोगापर्यंत नेवून आम्ही थांबणार आहोत. या नाटकाचा महाराष्ट्रातला हा शेवटचा प्रयोग २२ नोव्हेंबर २०२३ रोजी सायन येथील श्री षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृह येथे मोठ्या दिमाखात सादर होत आहे. दरम्यान या नाटकात शुभांगी सदावर्ते, मानसी जोशी यांनी मुख्य भूमिका साकारली असून, निर्माता म्ह्णून प्रसाद कांबळीने काम पाहिले आहे. तर या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन प्राजक्त देशमुखने केले आहे.

अनेकांनी हे नाटक अजूनही पाहिलेले नाही तर काहींनी या नाटकाच्या प्रयोगाची पारायणं केली आहेत. अशा सर्व मायबाप रसिकांसाठी ‘संगीत देवबाभळी’ हे नाटक पाहण्याची ही शेवटची संधी आहे. तेव्हा कार्तिकी एकादशीच्या पूर्वसंध्येला या विठू सावळ्या नाट्यकृतीसह हरीमय होण्यासाठी अवघे अवघे या!!!!

Spread the love

Related posts

The Roshans: Netflix Docu-Series Explores a Bollywood Legacy

आदर्श सून साकारत मिळवली लोकप्रियता, अभिनयसोबतच राजकारणात देखील तयार केली ओळख जाणून घ्या स्मृती ईराणी यांचा प्रवास

सईच्या घरी आली नवी पाहुणी! नव्या गाडीचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More