नाटकं, मालिका, चित्रपट अशा मनोरंजनाच्या तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या प्रभावी आणि बहारदार अभिनयाने लोकांचे मनोरंजन करणारे अभिनेते म्हणून भरत जाधव यांना ओळखले जाते. भरत यांनी त्यांच्या प्रगल्भ विनोद बुद्धीच्या जोरावर आणि जिवंत अभिनयाच्या कसबीमुळे मराठी मनोरंजनविश्वात आपला वेगळा असा प्रेक्षकवर्ग तयार केला आणि अमाप लोकप्रियता मिळवली. भरत आणि मुख्यतः नाटकांमध्ये आपली वेगळी छाप सोडली. सोबतच मराठी कला जगतात सर्वाधिक मानधन घेणारे आणि स्वतःची व्हॅनिटी व्हॅन असणारे पहिले अभिनेते अशी विशेष ओळख देखील भरत जाधव यांनी कमावली.
मात्र मागील बऱ्याच काळापासून भरत हे कलाविश्वपासून जरा लांब होते. त्यांचे चाहते त्यांची विविध माध्यमांमध्ये खूपच आठवण काढत होते. मध्ये भरत हे मुंबई सोडून कोल्हापूरला स्थायिक झाल्याचे समोर आले. मात्र आता लवकरच भरत जाधव आपल्याला एका नवीन चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. ही बातमी त्यांच्या फॅन्ससाठी खूपच आनंद देणारी ठरली आहे. भरत यांना मोठ्या काळानंतर पुन्हा अभिनय करताना बघणे म्हणजे सर्वांसाठीच मोठी पर्वणी असणार आहे.
बऱ्याच वर्षांनी भरत जाधव हे एका मोठ्या चित्रपटातून पुन्हा मनोरंजनविश्वात पदार्पण करण्यास सज्ज झाले आहेत. त्यांच्या आगामी सिनेमाचे नाव आहे. ‘लंडन मिसळ’. अतिशय हटके नाव असणाऱ्या या सिनेमाबद्दल आता प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता वाटत आहे. नक्की लंडन मिसळ काय आहे? याबद्दल सोशल मीडियावर विविध मतं येताना दिसत आहे. भरत यांनी नेहमीच त्यांच्या सिनेमातून, नाटकांमधून अथवा मालिकांमधून प्रेक्षकांना काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्न केला. हीच परंपरा पुढे राखत त्यांनी या ‘लंडन मिसळ’ सिनेमात देखील एक खास आणि वेगळा प्रयत्न केला आहे. भरत यांनी या चित्रपटात पहिल्यांदाच या चित्रपटासाठी रॅप गायन केले आहे. जालिंदर कुंभार दिग्दर्शित ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे.
या चित्रपटाद्वारे भरत जाधव बऱ्याच वर्षांनी मोठ्या आणि महत्त्वपूर्ण भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत. श्री. रवींद्रनाथ टागोर यांच्या एका नाटकावरून ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट प्रेरित आहे, हे या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य. नावावरून लक्षात आलेच असेल. सिनेमाची कथा लंडनमध्ये घडताना दिसणार आहे. या सिनेमाची कथा आदिती आणि रावी या लंडनमध्ये राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींची आहे. आपल्या वडिलांचे एक स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना अनेक अडी-अडचणींचा सामना करावा लागतो. या प्रवासात त्यांना त्यावेळी ज्या ज्या दिव्यातून त्यांना जावे लागते, याची कथा म्हणजे लंडन मिसळ. दरम्यान हा सिनेमा येत्या ८ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात भरत जाधव एका हटके भूमिकेत दिसणार आहेत. तसेच यात ऋतुजा बागवे, रितिका श्रोत्री, माधुरी पवार, गौरव मोरे, निखील चव्हाण, ऋतुराज शिंदे आणि सुनील गोडबोले हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत.