भारतीय मनोरंजनविश्वातील अतिशय प्रतिभासंपन्न आणि हुशार दिग्दर्शक म्हणून मणिरत्नम यांना ओळखले जाते. त्यांनी त्यांच्या करियरमध्ये दाक्षिणात्य आणि हिंदी भाषांमध्ये अतिशय उत्तम कलाकृती तयार केल्या आहेत. दिग्गज आणि मोठे दिग्दर्शक आहेत. मणिरत्नम यांनी अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहेत. सध्या मुंबईमध्ये मामि फिल्म फेस्टिवल सुरु आहे. या फेस्टिवलदरम्यान मणिरत्नम यांना (दक्षिण आशिया) सिनेसृष्टीमधे त्यांच्या सर्वोत्कृष्ट योगदानासाठी MAMI एक्सलन्स इन सिनेमा अवॉर्ड प्रदान करण्यात आला. त्यानंतर दिग्दर्शक इम्तियाज अलीने मणिरत्नम यांच्याशी संवाद साधत त्यांना त्यांच्या दिग्दर्शकीय प्रवासाबद्दल अनेक प्रश्न विचारत बोलके केले.
मणिरत्नम हे मागील जवळपास चार दशकांपेक्षा जास्त काळ या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी त्यांच्या चित्रपटांच्या करियरमध्ये रोमंटिक चित्रपटांपासून ते राजकीय विषयांपर्यंत जवळपास सर्वच विषयांवर चित्रपट बनवले आहेत. मणिरत्नम यांनी जेव्हा या क्षेत्रात येण्याचे ठरवले तेव्हा त्यांना दिग्दर्शन, निर्मितीबद्दल काहीही माहिती नव्हती. त्यांनी दिग्दर्शक इम्तियाज अलीशी चर्चा करताना हे देखील सांगितले की, त्यांना त्यांच्या आयुष्याच्या विविध वळणावर, अनुभवांवर विविध कथा सापडत गेल्या. कलाकारांच्या निवडीपासून, भाषा, सेटिंग, सेट आदी सर्वच गोष्टींची दिग्दर्शकावर किती मोठी जबाबदारी असते याबद्दल देखील त्यांनी अनेक मुद्दे स्पष्ट केले.
यासोबतच मणिरत्नम यांनी हे देखील सांगितले की, एक लेखक म्हणून त्यांनी वास्तव आणि त्याच्याशी संबंधित चित्रपटाशी कथा लिहण्यावर त्यांनी भर दिला. वास्तवाचे अनुकरण करत असल्यामुळे त्यांना त्यांच्या चित्रपटातील स्त्री पात्रं लिहिणे कसे सोपे जाते याबद्दल देखील चर्चा केली. तर एक दिग्दर्शक म्हणून काम करताना ते त्यांच्यात असलेला लेखक बाजूला ठेऊन मग सेटवर जातात आणि कथेच्या गरजेनुसार चित्रपटाची रचना करतात. कलाकारांकडून कसे काम काढून घ्यायचे याचे कौशल्य देखील त्यांनी सर्वांना सांगितले.
या मुलाखतीदरम्यान मणिरत्नम यांनी अतिशय हुशार आणि प्रतिभावान अशा संगीतकार गायक ए. आर. रहमान यांच्याशी झालेल्या पहिल्या भेटीच्या आठवणींना देखील यावेळी उजाळा दिला. सांगितलं वाहून घेतलेल्या रहमान यांच्यावर त्यांनी भरभरून स्तुतीसुमने उधळली. यासोबतच त्यांनी सिनेमाला अपयश मिळाल्यानंतर ते अपयश कसे पचवायची आणि त्यातून कसे शिकायचे याबद्दल काही गोष्टी सांगितल्या. प्रेक्षकांची आवड आणि आपल्या डोक्यातील कल्पना यांच्यात सांगड कशी घालायची हे देखील सांगितले. दरम्यान या मामि फिल्म फेस्टिवलमध्ये मणिरत्नम यांचा अलीकडेच ब्लॉकबस्टर ठरलेला पोन्नियिन सेल्वन भाग 1आणि 2 देखील प्रदर्शित होणार आहे. मणिरत्नम यांनी त्यांच्या करियरमध्ये पल्लवी अनुपल्लवी, मौना रागम, नायकन, रोजा, बॉम्बे, इरुवर, आलापयुथे, कन्नाथिल मुथामित्तल आणि गुरू आदी अनेक सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहेत. त्यांना विविध लहान मोठ्या पुरस्कारांसोबतच भारत सरकारच्या सर्वोच्च अशा पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे.