मराठी मनोरंजनविश्वात सध्या फक्त आणि फक्त चर्चा आहे ती झी मराठीच्या पुरस्कारांची. नात्यांचा उत्सव साजरा करणाऱ्या या पुरास्कारांची मोठी क्रेझ मराठी प्रेक्षकांमध्ये नेहमीच दिसून येत असते. झी मराठी खूपच जुनी वाहिनी असून, मागील अनेक वर्षांपासून झी मराठीचे हे पुरस्कार दरवर्षी न चुकता मोठ्या दणक्यात संपन्न होतात. मुख्य म्हणजे झी नेहमीच त्यांच्या या पुरस्कारांमध्ये त्यांचे नावीन्य दाखवत प्रत्येकवर्षी प्रेक्षकांसाठी एक सुखद असे सरप्राईज घेऊन येत असते.
अशातच यावर्षीचा सोहळा देखील नुकताच मोठ्या जल्लोषात पार पडला. यावर्षीच्या सोहळ्याचे मुख्य आकर्षण होते ते धक धक गर्ल माधुरी दीक्षित आणि डान्स दिवा मलायका अरोरा. या दोघीनी या सोहळ्याला हजेरी लावत चार चांद लावले. या नात्यांच्या महाउत्सवात या दोन्ही तारकांची उपस्थिती म्हणजे दुग्ध शर्करा योगच जणू. माधुरीबद्दल सांगायचे तर आपण अनेकदा किंबहुना नेहमीच तिच्यात असणारे तिचे मराठीपण बघत असतो. तिचे वागणे, बोलणे, पेहराव, खाणे यातून ती पक्की महाराष्ट्रीय असल्याचे सगळ्यांना जाणवते.
मात्र यावर्षी माधुरी दीक्षितसोबतच मलायका अरोराचा मराठी लूक आणि मराठी गाण्यांवरील तिचा नाच सगळ्यांसाठीच आश्चर्याचा धक्का होता. मलायका अरोराचा कोळी डान्स हा या पुरस्कार सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरला. लाल नऊवार साडी, नाकात नाथ, अंबाडा अशा एकदम कडक कोळी लूकमध्ये मलायका कमालीची सुंदर दिसत होती. या डान्ससोबतच तिने स्टेजवर चक्क लाडू देखील वळले. हो मराठी मधील कॉमेडी क्वीन असलेल्या श्रेया बुगडेकडून मलायकाने बेसनाचे लाडू बनवाचे धडे घेतले आणि लाडू तयार केले. हे लाडू तिने संगीतकार आणि दिग्दर्शक असलेल्या सलील कुलकर्णी यांच्यासाठी खास बनवल्याचे देखील सांगितले.
तर माधुरी दीक्षितनेही झी मराठीच्या सर्व नायिकांसोबत मंगळागौर साजरी केली. सोबत रंगली ती माधुरी, भाऊ कदम आणि भुवनेश्वरी यांच्या हास्याची जुगलबंदी. एकूणच काय तर या सोहळ्यात तुफान धमाल आणि मजामस्ती प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाच्या निवेदनाची धुरा सांभाळली ती म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी जोडी अक्षरा आणि अधिपती यांनी.
तर मग ही सर्व मजा, मस्ती, धमाल आणि धमाकेदार परफॉर्मन्स पाहण्याची प्रेक्षकांना नक्कीच उत्सुकता लागली असेल, तेव्हा शनिवार ४ नोव्हेंबर संध्या. ७ ह्या तारखेची नोंद आपल्या कॅलेंडर नक्की करून ठेवा. घरचं कार्य आहे सहकुटुंब सर्वाना आग्रहाचं निमंत्रण.