स्पोर्ट्स ड्रामा हा बॉलीवूड चित्रपट निर्मात्यांच्या आवडीचा विषय आहे. स्पोर्ट्स ड्रामाच्या केंद्रस्थानी असलेला चरित्रनायक जर खेळाडू वा प्रशिक्षक असल्यास त्या सिनेमांच्या पटकथेत ‘उत्साह’, ‘उत्कट भाव’, ‘संघर्ष’ आणि ‘देशभक्ती’ असं सर्व मनोरंजनासाठी अपेक्षित साहित्य चवी-चवीने टाकले जाते. प्रेक्षकही अशा चित्रपटांचे मनापासून स्वागत करतात आणि त्याचा आस्वाद ही घेतात. यामुळेच यापूर्वी ‘चक दे इंडिया’ (हॉकी), ‘भाग मिल्खा भाग’ (रेसिंग), ‘मेरी कॉम’ (बॉक्सिंग), ‘दंगल’ (कुस्ती), ‘पंगा’ (कबड्डी), एमएस धोनी, ८३ (क्रिकेट) सारखे चित्रपट आले. या सिनेमांना प्रेक्षकांचं खूप प्रेमही मिळाले. हा ट्रेंड पुढे नेत, आता दिग्दर्शक अमित शर्मा यांने भारताचे दिग्गज फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांच्या उदयाची आणि भारतीय फुटबॉलच्या सुवर्णकाळाची कहाणी ‘मैदान‘ चित्रपटातून मांडली आहे. तेही ईदच्या निमित्ताने. या प्रभावी गोष्टीचा केंद्रस्थान असलेला कोच रहीम आणि ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अजय देवगणने भूमिकेत हृदयस्पर्शी अभिनय केला आहे. (Maidaan Movie Review ajay devgan)
अमित शर्मा यांच्या दिग्दर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांचे जीवनचरित्र रेखाटताना त्याने फुटबॉलच्या या गोल्डन बॉयचा गौरवही केला तितक्याच सहजतेने केला आहे. फार सिनेमॅटिक लिबर्टी घेण्याच्या मोहात दिग्दर्शक पडला नाहीये. चित्रपटाच्या पूर्वार्धात, तो पात्र आणि कथा स्थापित करण्यात वेळ घालवतो, परंतु उत्तरार्धात त्याने सिनेमाची पकड अधिक मजबूत केलीय. प्रेक्षकांचा पटकथेतील रस मिनिटागणिक वाढत जातो. आणि शेवटच्या वीस मिनिटांत प्रेक्षक डोळे मिचकावू शकत नाहीत; इतक्या वेगवानरित्या रोमांचक कथापट त्याने पडद्यावर रेखाटला आहे. सिनेमाची पूर्ण लांबी ही तब्बल तीन तासांची आहे. चित्रपट थोडासा ‘क्रिस्प’ करता आला असता; असा वाव संकलनात अनेक ठिकाणी दिसतो. काही दृश्ये दिग्दर्शकीय रुपी सपाट झालेली आहेत. तर काही अनावश्यक ताणली गेलेली दिसतात.
दुसरीकडे ऐतिहासिक फुटबॉल सामने मोठ्या पडद्यावर थ्रिलर शैलीत दाखवतात आले आहेत. तुषार कांती रे आणि फ्योडोर ल्यास यांची सिनेमॅटोग्राफी वाखाणण्याजोगी आहे. १९५०-६० च्या दशकातील कोलकाता सुंदरपणे चित्रित केले गेलं आहे. चित्रपटाला विश्वासार्ह रूप देण्यासाठी दिग्दर्शकाने वास्तविक फुटेजचा सिनेमाच्या पटकथेत चपखल वापर केला आहे. सोबतच चित्र अधिकाधिक वास्तविक बनवण्यासाठी वेशभूषा विभागाने आपले काम चोख बजावले आहे. तो काळ चित्रित करण्यासाठी व्हीएफएक्सचाही चांगला वापर करण्यात आला आहे. ए आर रहमानचे सुखदायक संगीत कथा पुढे नेण्यास सहकार्य करते.
चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेता अजय देवगण यावेळीही सय्यद अब्दुल रहीम च्या भूमिकेत सूर्यासारखा चमकत आहे. ‘सिंघम’च्या विपरीत, तो शांत, संयमी आणि प्रतिष्ठित व्यक्तिरेखेतील त्याच्या चमकदार अभिनयाने अनेक दृश्यांमध्ये डोळे ओलावतो. सिगारेट ओढण्याची त्याची शैली पात्राला बळ देते. सायराच्या भूमिकेत प्रियमणीने तिची भूमिका अतिशय सुंदरपणे साकारली आहे. गजराज राव ‘वाईट’ आणि ‘नकारात्मक’ वृत्तीच्या क्रीडा पत्रकाराच्या भूमिकेत विशेष शोभून दिसतात.
१९५२ ते १९६२ हा भारतीय फुटबॉलचा सुवर्णकाळ होता. सय्यद अब्दुल रहीम (अजय देवगण) या एका व्यक्तीमुळे हे शक्य झाले. या चित्रपटाची कथा त्यांच्या जीवनावर आधारित आहे. कथेच्या सुरुवातीला सय्यद अब्दुल रहीम देशभरात फिरून तळागाळातून खेळाडू गोळा करतातआणि त्यांना देशासाठी खेळण्यासाठी प्रशिक्षण देतात. दरम्यान, त्यांना भारतीय फुटबॉल फेडरेशनमधील काही प्रादेशिकांशी सामना आणि त्याच्याशी होणाऱ्या वादामुळे अनेक अडचणी येतात. बंगालच्या खेळाडूंना टीम इंडियामध्ये अधिकाधिक संधी मिळावी, अशी तिथं (फेडरेशनमध्ये) बसलेल्या लोकांची इच्छा असते, पण सय्यद अब्दुल रहीम यांची विचारसरणी वेगळी असते. त्यांना खऱ्या कलागुणांना संधी द्यायची असते. १९५२ आणि १९५६ च्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाची कामगिरी उत्कृष्ट होते, तरीही संघ अंतिम फेरीत पोहोचू शकत नाही. याच कारणामुळे रहीम यांना प्रशिक्षक पदावरून हटवण्यात येते. दरम्यान, त्यांना कॅन्सर झाल्याचे निदान होते, तरीही त्यांचे धैर्य तुटत नाही. ते पुन्हा जिद्दीने भारताचा प्रशिक्षक बनतात आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत संघाला सुवर्ण गौरव मिळवून देतात. ही अशी रंजक कहाणी आपल्याला पडद्यावर रोमांचक पार्श्वभूमीत पाहायला मिळते.
चित्रपटात तुम्हाला फक्त अजय देवगणच दिसणार आहे. अजय देवगणने सय्यद अब्दुल रहीम च्या भूमिकेत उत्कृष्ट काम केले आहे. अजय देवगण डोळ्यांनी अभिनय करण्यासाठी ओळखला जातो, या चित्रपटातही त्याने मुख्यतः डोळ्यांनीच अभिनय केला आहे. भारतीय खेळाडूंच्या भूमिकांमध्ये सर्व कलाकारांनी छाप पाडली आहे. सिनेमात अनेक नवे चेहरे आहेत आणि प्रत्येकाने उत्तम अभिनय केला आहे. चुन्नी गोस्वामीच्या भूमिकेत अमर्त्य रे, पीके बॅनर्जीच्या भूमिकेत चैतन्य शर्मा, पीटर थांगराज च्या भूमिकेत तेजस रविशंकर, जरनैल सिंह च्या भूमिकेत देविंदर सिंह, तुलसीदास बलरामच्या भूमिकेत सुशांत वायदांडे, एस एस हाकिम च्या भूमिकेत ऋषभ जोशी आणि राम बहादुर छेत्रीच्या व्यक्तिरेखेत अमनदीप ठाकुर यांनी लक्षवेधी कामगिरी केली आहे. यातील अनेक जण प्रत्यक्षात फुटबॉलपटू आहेत. सुवर्णपदक विजेत्या संघाची झालेली कास्टिंग अधोरेखित करण्याजोगी आहे. आपला देश क्रिकेट आणि हॉकीसाठी सुरुवातीच्या काळापासून ओळखला जातो, जरी एक काळ असा आला की जेव्हा भारतीय फुटबॉलला आशियाचे ब्राझील म्हटले जायचे. सय्यद अब्दुल रहीम या एका व्यक्तीमुळेच हे शक्य झाले. जर तुम्हाला त्यांची कथा जाणून घ्यायची असेल तर तुम्ही हा चित्रपट नक्की पाहा! सिनेमा पाहून तुम्हाला ‘किक’ बसल्याशिवाय राहणार नाही!
सिनेमा : मैदान
निर्मिती : झी स्टुडिओज, बोनी कपूर
कलाकार : अजय देवगण, प्रियामनी, गजराज राव
दिग्दर्शक : अमित शर्मा
लेखन : सैविन क्वाड्रास, अमन राय, अतुल शाही, अमित शर्मा, रितेश शाह
सिद्धांत मागो, आकाश चावला, अरुणव जॉय सेनगुप्ता
दर्जा : साडेतीन स्टार
======
हे देखील वाचा: भन्साळींच्या ‘हिरामंडी’मागचा ‘हा’ इतिहास ठाऊक आहे का?
======