महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली. यामध्ये चित्रपती व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार, चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार, स्व. राज कपूर जीवन गौरव पुरस्कार, स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार या पाच मानाच्या पुरस्कारांचा समावेश आहे. ही घोषणा मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली.
यंदाचा चित्रपती व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता महेश मांजरेकर यांना देण्यात येणार आहे. या पुरस्कारामध्ये ₹१० लाखांची रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, मानपत्र व चांदीचे पदक दिले जाते.
चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कारासाठी प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांची निवड झाली असून, या पुरस्काराचे स्वरूप ₹६ लाख रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, मानपत्र व चांदीचे पदक असे आहे.
हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रतिष्ठेचा स्व. राज कपूर जीवन गौरव पुरस्कार यावर्षी ख्यातनाम अभिनेते अनुपम खेर यांना दिला जाणार आहे. तर स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अष्टपैलू अभिनेत्री काजोल देवगण यांना मिळणार आहे. या दोन्ही पुरस्कारांचे अनुक्रमे ₹१० लाख व ₹६ लाख इतके मूल्य आहे.
तसेच, १९९३ पासून दिला जाणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ मराठी गझल गायक भीमराव पांचाळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप ₹१० लाख रोख रक्कम, मानचिन्ह, मानपत्र व शाल असे आहे.
या सर्व पुरस्कारांचे वितरण २५ एप्रिल २०२५ रोजी एन.एस.सी.आय. डोम, मुंबई येथे एका भव्य समारंभात होणार आहे. अशी माहिती मंत्री ॲड. शेलार यांनी यावेळी दिली.