दिग्दर्शक दीबाकर बॅनर्जी यांचा ‘लव्ह सेक्स और धोका २’चा टीझर आला आहे अन् हा टीझर पाहून बरेच लोक अस्वस्थ झाले आहेत. अर्थात दीबाकरसारख्या दिग्दर्शकाकडून अशाच धाडसी प्रयोगाची अपेक्षा आहे. असे विषय केवळ दीबाकरच हाताळू शकतात असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. एका व्हायरल झालेल्या एमएमएस व्हिडीओवरुन प्रेरित दीबाकर बॅनर्जी यांनी २०१० साली ‘लव्ह सेक्स और धोका’ हा पहिला भाग सादर केला होता. हा चित्रपट थिएटरमध्ये बघताना कित्येकांना त्रास झाला, या चित्रपटाचा ट्रेलर आमिर खानमुळे तब्बल ३ वेळा एडिट करावा लागला होता.
आजच्या लेखाच्या माध्यमातून २०१० च्या ‘लव्ह सेक्स और धोका’ या चित्रपटाचे काही किस्से आपण जाणून घेणार आहोत. २००४ मध्ये दिल्लीच्या आर.के.पुरम परिसरातील एका पब्लिक स्कूलमधील दोन विद्यार्थ्यांचा एक एमएमएस व्हायरल झाला होता. त्यावेळी या विषयावरुन बराच गहजब माजला. लोक चित्रविचित्र पद्धतीने लैंगिक संबंध बनवताना व्हिडीओ काढत असल्याचं प्रमाण त्यावेळी वाढत होतं. याचदरम्यान ‘खोसला का घोसला’ आणि ‘ओय लक्की लक्की ओय’सारखे हटके पण तितकेच जबरदस्त चित्रपट देणाऱ्या दीबाकर बॅनर्जी यांनी या एमएमएस प्रकरणाला हात घालायचं ठरवलं अन् ‘लव्ह सेक्स और धोका’ हा चित्रपट समोर आला. (Love Sex Aur Dhokha 2)
बऱ्याच लोकांनी या चित्रपटाचं नाव ऐकूनच याकडे पाठ फिरवली. अत्यंत बोल्ड चित्रपट असल्याने फॅमिली ऑडियन्सनेही याकडे कानाडोळा केला. पण समीक्षकांनी मात्र चित्रपटाचं कौतुक केलं अन् प्रदर्शनानंतर लोकांकडूनही या चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाचं चित्रीकरण ते प्रदर्शन सगळंच हटके आणि लाजवब होतं. याच्या शूटिंगसाठी प्रोफेशनल कॅमेरा वापरण्यात आला नव्हता. यामध्ये कॅमेरा हे एक मध्यम नव्हे तर एक पात्र म्हणूनच दीबाकर यांनी वापरलं आणि याच्या माध्यमातून प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव दिला. हँडीकॅम, मोबाइल कॅमेरा, सिसिटीव्ही कॅमेरा, स्पाय कॅमेरा अशा वेगवेगळ्या कॅमेरांच्या माध्यमातून त्यांनी याचं चित्रीकरण केलं.
चित्रपटाच्या पहिल्या सेगमेन्टमध्ये नुशरत भरूचासह अंशुमन झाने काम केलं होतं. ऑनर किलिंगच्या या सीनमध्ये नुशरत आणि अंशुमन दोघांनाही मारताना दाखवलं आहे. काही वर्षांनी जेव्हा हा सीन पाहून काहींनी पाहिला तेव्हा त्यांना मराठी चित्रपट ‘सैराट’च्या अस्वस्थ करणाऱ्या सीनची आठवण आली. लव्ह सेक्स और धोकामधला तो सीन फारच भयावह आणि अस्वस्थ करणारा होता. हा सीन पाहताना चित्रपटगृहातील एका महिलेने तिथेच उलटी केली होती. ‘लव्ह सेक्स और धोका’ हा राजकुमार रावचा पहिला चित्रपट होता असं सांगितलं जातं, पण याआधी राम गोपाल वर्मा आणि अमिताभ बच्चन यांच्या ‘रण’ या चित्रपटात राजकुमारने एक छोटीशी वार्ताहाराची भूमिका निभावली होती अन् या छोट्या भूमिकेसाठी राजकुमार रावला केवळ ३००० रुपये इतकं मानधन मिळालं होतं.
चित्रपटाचं शूटिंग पूर्ण होऊन पोस्ट प्रोडक्शनचं काम सुरू झालं अन् या चित्रपटाचा ट्रेलर आमिर खानच्या ‘३ इडियट्स’बरोबर प्रदर्शित केला जाणार होता. ९० सेकंदांचा हा ट्रेलर काढल्यानंतर तो आमिरच्या ‘३ इडियट्स’सारख्या चित्रपटाबरोबर चित्रपटगृहात दाखवता येणार नाही असं सांगण्यात आलं. दुसऱ्यांदा ट्रेलर कट केला तेव्हाही तीच गोष्ट झाली शेवटी तिसऱ्यांदा एडिट करून जेव्हा ट्रेलर दाखवण्यात आला तेव्हा तो आमिरच्या चित्रपटाला जोडून दाखवण्यात आला.
चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी यामधीलच एक बोल्ड सीन असलेला एक फोटो व्हायरल करण्यात आला ज्यात एक महिला बॅकलेस आहे अन् ती एका पुरुषाबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करताना दिसत आहे. हा फोटो पाहून चांगलीच खळबळ उडाली, सेन्सॉर बोर्डानेही यावर आक्षेप घेतला. इतकंच नव्हे तर चित्रपटात एक गाणं होतं ‘तू नंगी अच्छी लगती है’ अन् हे गाणं चित्रपटाच्या थीमशी अगदी मिळतं जुळतं होतं, पण त्याचे शब्द बदलून ‘तू गंदी अच्छी लगती है’ करण्यात आलं. वेगवेगळे सीन्स ब्लर करण्यात आलं, सेन्सॉरची कात्री या चित्रपटावर चालली तरी याला ए सर्टिफिकेटसह प्रदर्शित करण्यात आला अन् तरी या चित्रपटाने सिनेविश्वाला एक वेगळं वळण दिलं. चित्रपटात भले दीबाकर बॅनर्जी यांनी ‘लव्ह आणि सेक्स’ दाखवलं असलं तरी खरा ‘धोका’ सेन्सॉर बोर्डाने त्यांच्याबाबतीत केला. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. पहिल्या भागाप्रमाणेच यातही तीन वेगवेगळ्या कथा पाहायला मिळणार असल्याचं टीझरवरुन स्पष्ट होत आहे.
=====
हे देखील वाचा: कंगना रणौत: ती आली तिने पाहिलं आणि तिने सर्वांची मने जिंकली
=====