मराठी सिनेसृष्टीतील सोनेरी अध्याय म्हणजे अशोक मामा. अशोक मामा यांनी आजवर शेकडो मराठी चित्रपट केले. सोबतच आपल्या अभिनयाने छोटा पडदा आणि रंगभूमी देखील गाजवली. अशोक सराफ यांनी आपल्या आयुष्याची ५० हून अधिक वर्ष ही मराठी सिनेसृष्टीला दिली आहेत. फक्त मराठीच नाही तर ‘सिंघम’, ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘गुप्त’, ‘कोयला’, ‘करन अर्जून’, ‘येस बॉस’सारखे हिंदी चित्रपट तसेच ‘हम पांच’ सारख्या हिंदी मालिकांमधील भूमिकांमधूनही त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. (Ashok Saraf)
आपल्या कारर्किर्दीत अशोक सराफ यांनी विविधांगी भूमिका साकारल्या. त्यांनी कायम भूमिकांना महत्त्व दिले, भूमिकांच्या लांबीला नाही. कथानकामध्ये त्या भूमिकेचे काय स्थान आहे, ती भूमिका काय करु शकते या गोष्टींना त्यांनी भूमिकेची निवड करताना अधिक महत्त्व दिले. पण प्रेक्षकांना एखाद्या कलाकाराची एखादी भूमिका आवडली की, त्यांना सतत त्याच भूमिकेत कलाकार दिसावा असे वाटते आणि म्हणूनच अशोकमामांचे विनोदी चित्रपट गाजल्यानंतर त्यांना विनोदी भूमिका वाट्याला येवू लागल्या. आणि त्यांच्यावर विनोदी अभिनेत्याचा टॅग लागला, त्यावेळी त्यांना गंभीर भूमिका करताना खूप त्रास झाला.
यावेळचा एका चाहत्याचा किस्सा त्यांनी एका मुलाखतीत सांगितला होता.
अशोक सराफ यांनी ‘राम राम गंगाराम’ या सिनेमात म्हमदू ही कॉमेडी भूमिका साकारली होती. हा सिनेमा हीट ठरला. आणि म्हमदूला तर प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. त्यानंतर मामांचे ‘हमीदाबाईची कोठी’ या नाटकाचा प्रयोग सुरु होते. या नाटकाच्या प्रयोगादरम्यान प्रेक्षकांमधून त्यांना आवाज ऐकू आला की, ‘ए महादू आपला म्हमद्या दलिंदर झाला रे…’ झालं असं की, ‘हमीदाबाईची कोठी’ या नाटकात अशोक सराफ यांनी एक दादा साकारला होता. जो शेवटी खूप हीनदीन अशा परिस्थितीत दिसतो.
=====
=====
यावेळी आपल्याला कॉमेडी करुन हसवणारा असा माणूस अशा स्थितीत पाहून प्रेक्षकांना ती भूमिका पटली नाही. अशाच एका प्रेक्षकाची ही प्रतिक्रीया होती. तो प्रेक्षक सिनेमाचा होता. पण अनेक सिनेमांतून आपल्याला खळखळून हसवणारे अशोक मामा स्वत:ला विनोदी नट मानत नाहीत. ते मी विनोदी नट नाही, तर मी कॅरेक्टर आर्टीस्ट आहे हे कायम स्पष्ट करतात. त्यांना कॉमेडीपेक्षा वेगळ्या भूमिका करायला आवडतात.
‘हमीदाबाईची कोठी’ या नाटकानंतर अशोक सराफ यांनी ‘बहुरंगी’ हा सिनेमा केला होता. या सिनेमात त्यांची भूमिका थोडी गंभीर होती. त्यांच्या या भूमिकेचे समीक्षकांनी कौतुक केले. राज्य शासनाने त्यांना पुरस्कार देवून गौरवले. पण हा सिनेमा देखील बॉक्स ऑफीसवर फारसा चालला नाही. लोकांना त्यांना कॉमेडी भूमिकेतच पाहायचे होते. त्यामुळे त्यांच्या वाट्याला अधिकाअधिक कॉमेडी भूमिकाच येत गेल्या.