प्रियदर्शिनी इंदलकर – अभिजीत आमकर यांची फ्रेश जोडी झळकणार ‘लग्नाचा शॉट’मध्ये

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेचा विषय ठरलेल्या ‘लग्नाचा शॉट’ या आगामी चित्रपटाचं नवं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं असून, या पोस्टरमधून चित्रपटातील प्रमुख कलाकारांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिजीत आमकर ही फ्रेश जोडी पहिल्यांदाच प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. शीर्षक आणि संकल्पनेमुळे आधीच उत्सुकता निर्माण करणाऱ्या या चित्रपटाने आता पोस्टरद्वारे थेट प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

नव्या पोस्टरमध्ये नायक-नायिका पारंपरिक लग्नाच्या वेशभूषेत दिसत असून, त्यांच्या चेहऱ्यावर गोंधळलेले, प्रश्नार्थक भाव स्पष्टपणे जाणवतात. विशेष म्हणजे, डोक्याला बंदुकीसारखी बोटं लावलेली देहबोली पाहता, लग्नाच्या या प्रवासात काहीतरी अनपेक्षित आणि मोठा घोळ होणार असल्याची झलक मिळते.

पोस्टरच्या पार्श्वभूमीत रेल्वे, बस, वळणावळणाचे रस्ते आणि राशीचक्र यांसारखे दृश्यात्मक घटक दिसतात. त्यावर लिहिलेले ‘लग्नाआधीही… लग्नानंतरही’ हे शब्द कथेत वेळ, प्रवास, चुकीचे निर्णय आणि नशिबाचे खेळ यांची भूमिका महत्त्वाची असल्याचं सूचकपणे सांगतात. रंगीबेरंगी, उत्साही आणि हलकाफुलका टोन असलेलं हे पोस्टर चित्रपटाच्या मनोरंजक स्वभावाचं स्पष्ट दर्शन घडवतं.

या पोस्टरविषयी दिग्दर्शक अक्षय गोरे म्हणतात,

“‘लग्नाचा शॉट’ ही लग्नाच्या गोंधळाकडे मजेशीर नजरेने पाहणारी गोष्ट आहे. कोणताही उपदेश न करता, संपूर्ण कुटुंब एकत्र बसून पाहू शकेल असा निव्वळ मनोरंजनाचा अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न आहे. हलकं-फुलकं, स्वच्छ आणि प्रामाणिक मनोरंजन हेच या चित्रपटाचं खऱ्या अर्थानं बलस्थान आहे.”

महापर्व फिल्म्स निर्मित आणि जिजा फिल्म्स यांच्या सहयोगाने साकारलेला ‘लग्नाचा शॉट’ हा चित्रपट अक्षय गोरे यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे. चित्रपटाच्या गीत-संगीताची जबाबदारी प्रवीण कोळी आणि योगिता कोळी यांनी सांभाळली आहे. तर अक्षय महादेव गोरे, विजय महादेव गोरे, अभिषेक उत्कर्ष कोळी आणि सुरेश मगनलाल प्रजापती हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

६ फेब्रुवारी रोजी ‘लग्नाचा शॉट’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, लग्नाच्या गोंधळातली ही धमाल गोष्ट नक्कीच प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.

Spread the love

Related posts

झी स्टुडिओज घेऊन येत आहे रुबाबदार लव्हस्टोरी! ‘रुबाब’ चित्रपटाचा धडाकेबाज टीझर प्रदर्शित

‘कुरळे ब्रदर्स’ पुन्हा धमाल करायला सज्ज; ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ ३० जानेवारीला चित्रपटगृहात

आयुष संजीव – अनुष्का सरकटेची ‘जब्राट’ जोडी अखेर मराठी रुपेरी पडद्यावर

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More