‘लाडकी बहीण’ सिनेमाचा भव्य मुहूर्त सोहळा; सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते पहिला क्लॅप

महाराष्ट्र सरकारच्या लोकप्रिय ‘लाडकी बहीण’ योजनेवर आधारित असलेला हा चित्रपट ओम साई सिने फिल्म आणि शुभम फिल्म प्रोडक्शनच्या संयुक्त विद्यमाने साकारला जात आहे. निर्मात्या शितल गणेश शिंदे, बाबासाहेब पाटील आणि अनिल वणवे यांनी या विषयाला मोठ्या पडद्यावर आणण्याचा धाडसी निर्णय घेतला असून, या चित्रपटाचे दिग्दर्शन गणेश शिंदे करत आहेत. पटकथा आणि संवाद लेखनाची जबाबदारी शितल शिंदे यांनी स्वतः सांभाळली आहे.

साताऱ्यात पार पडलेल्या या मुहूर्तप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यासह कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले, कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, सांस्कृतिक विभाग उपाध्यक्ष पंकज चव्हाण व इतर मान्यवरांनी उपस्थिती लावली.

‘लाडकी बहीण’ योजना ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. ही योजना केवळ सरकारी आकडेवारीपुरती मर्यादित न राहता, ती अनेक महिलांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणणारी ठरली आहे. हाच सामाजिक आणि भावनिक दृष्टिकोन असलेला विषय खेळकर शैलीत सादर करत, एक परिपूर्ण कौटुंबिक चित्रपट तयार करण्याचा दिग्दर्शकांचा मानस आहे.

या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले कलाकार झळकणार आहेत. मोहन जोशी, माधव अभ्यंकर, शशांक शेंडे, विजय पाटकर, अनिल नगरकर, सुरेखा कुडची, उषा नाडकर्णी, प्रिया बेर्डे, गौतमी पाटील, भारत गणेशपुरे, जयवंत वाडकर, सारिका जाधव, रुक्मिणी सुतार आणि जयश्री सोनवले या कलाकारांची उपस्थिती सिनेमाला वेगळी उंची देणारी आहे.

गजानन शिंदे हे या सिनेमाचे छायालेखक असून, विनीत देशपांडे यांचे संगीत लाभले आहे. गायक अवधूत गुप्ते आणि आनंद शिंदे यांच्या आवाजात चित्रपटातील गाणी सजणार आहेत. नृत्य दिग्दर्शक म्हणून पंकज चव्हाण काम पाहणार असून, प्रशांत कबाडे आणि शिवाजी सावंत हे कार्यकारी निर्माते आहेत.

सामाजिक बांधिलकी आणि मनोरंजन यांचा सुंदर मिलाफ असलेला ‘लाडकी बहीण’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Spread the love

Related posts

‘ऑल इज वेल’ चित्रपटात सयाजी शिंदेचा भाईगिरीतही मराठी बाणा – प्रेक्षकांना हसवणार भन्नाट अंदाज

माधव वझेंना श्रद्धांजली : ‘ऑल इज वेल’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरणार

अमर, अकबर आणि अँथनी येणार भेटीला – ‘ऑल इज वेल’ २७ जूनला चित्रपटगृहात

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More