तिमिराकडून तेजाकडे नेणारा असा दिवाळीचा सण सुरु झाला आहे. वर्षभर ज्या सणाची लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच वाट बघत असतात तो सण अर्थात दिवाळी. दिवाळी म्हटले की डोळ्यासमोर येते ते फटाक्यांची रंगीबेरंगी आतिषबाजी, फराळाचा घमघमाट, आकर्षक मोठमोठ्या रांगोळ्या, सुंदर पणत्यांची आरास, आकाश कंदील – लायटिंगचा झगमगाट, किल्ल्यांची स्पर्धा या आणि अशा अनेक विशेष बाबी या सणाच्या आहेत.
दिवाळी सण म्हटलं की, लहान असो किंवा मोठे सर्वच खूपच उत्सुक आणि आनंदी असतात. अनेक दिवस आधीच प्रत्येकाच्या मनात यावर्षी काय खास करायचे याबद्दल विचार सुरु होतात. आपल्या सारखेच आपल्या कलाकारांचे देखील आहे. फराळ, सजावट, खरेदी, घराची सफाई हे सर्व कलाकारांना देखील अपवाद नाही. चला तर मग आज आपण आपल्या झी मराठीच्या लाडक्या कलाकारांच्या यावर्षीच्या दिवाळीबद्दल जाणून घेऊया.
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ची अक्षरा म्हणजेच शिवानी रंगोळे तिच्या दिवाळीच्या आठवणीबद्दल सांगताना म्हणते, “माझ्यासाठी दिवाळीची आठवण म्हणजे माझ्या तीन मावश्या आणि आम्ही सर्व भावंडं एकत्र येऊन फराळ बनवायचो. ही गोष्टी मी फार मिस करते. ह्या वर्षी कामात खूप गुंतलेली आहे. पण सुट्टी मिळाली तर मी आणि विराजस पुण्याला जाऊ माझ सासर आणि माहेर दोन्ही पुण्यातच आहे. सर्व कुटुंबासोबत दिवाळी साजरी करू आणि सुट्टी नाही मिळाली तर मुंबईतच मित्र मंडळींना घरी फराळासाठी बोलावेल. त्यांच्यासोबत फराळ करत करत गप्पा गोष्टी करू. मला फक्त दिवाळीची नाही तर भाऊबीजेच्या पण उत्सुकता असते. कारण तो एक दिवस आहे जेव्हा आम्ही सगळे भावंडं जे आता कामानिमित्त वेगवेगळ्या शहरात आहे ते या दिवशी आवर्जून व्हिडिओ कॉलमध्ये एकत्र येतो आणि एकमेकांशी बोलतो.
अधिपतीची भूमिका साकारून लोकप्रिय झालेल्या ऋषिकेश शेलारने त्याच्या दिवाळीच्या आठवणीबद्दल सांगितले, “मी दिवाळीत शाळेच्या सुट्टीत रायगड, राजगड आणि इतर काही किल्ल्यांवर सहलीला जायचो. तिथे फराळ करायचो फक्त परिवारातील नाही तर कॉलनी मधले सगळे या सहलीमध्ये सामील असायचे. पण आता कामामुळे हे सर्व शक्य होत नाही. मला आठवते, २०१७ साली दिवाळीत मी कुटुंबासोबत अमेरिकेत होतो आणि आम्ही न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर बसून फराळ केला होता. मग ब्रॉडवेत नाटक पाहिले होते. या वर्षी माझी दिवाळी मुंबईमध्ये साजरी होणार आहे. या दिवाळीत आई बाबा घरी येणार आहेत. या वर्षीची दिवाळी खूप खास आहे, कारण माझ्या मुलीची ही पहिलीच दिवाळी आहे. मला चकल्या आवडतात आणि माझी आई माझ्यासाठी खास त्या बनवते. मला सख्खी बहीण नाही पण माझ्या मावस बहिणी माझ्या सख्ख्या बहिणींसारख्याच आहेत. भाऊबीजेच्या दिवशी आमच्या कडे मटणाचा बेत असतो. आम्ही सर्व झणझणीत मटणावर ताव मारत आमचा सण साजरा करतो.
‘सारं काही तिच्यासाठी’ मधील उमा म्हणजेच अभिनेत्री खुशबू तावडे तिच्या दिवाळीबद्दल सांगते, “माझी जवळची आणि अविस्मरणीय दिवाळीची आठवण म्हणजे माझ्या मुलाचा राघवचा जन्म. धनत्रयोदशीच्या दिवशी २०२१ मध्ये त्याचा जन्म झाला. ती माझ्यासाठी सगळ्यात सुंदर भेट होती. यावर्षी ही खूप उत्साह आहे. माझी नवीन मालिका सुरु झाली. गेल्या वर्षी दिवाळीत राघव लहान होता म्हणून फराळ करायला वेळ नाही मिळाला. पण यावर्षी त्याला कळायला लागले आहे, तर मी खास त्याच्यासाठी त्याला आवडणारे लाडू, शंकरपाळे बनवले आहेत. माझ्या मालिकेच्या सेटवर देखील माझा एक नवीन परिवार आहे. आमच्याकडे लक्ष्मीपूजन फक्त घरी नाही तर आमच्या दुकानात देखील होते. भाऊबीज म्हणजे भावंडंच गेट टूगेदर असते. त्या दिवशी भाऊजी आणि वाहिन्यांना आमच्यामध्ये नो एन्ट्री असते.”
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मधील नेत्रा अर्थात अभिनेत्री तितिक्षा तावडे तिच्या दिवाळीबद्दल सांगते, “माझी ही दिवाळी खूप खास आहे. कारण मी आणि माझी बहीण खुशबू तावडे आम्ही डोंबिवलीमध्ये दिवाळी पहाट साजरी करणार आहोत. जिथे आम्ही लहानपणी मित्र परिवारासोबत जायचो तिथे या दिवाळीमध्ये आम्ही खास पाहुणे म्हणून जाणार आहोत. माझे आई- बाबाही तिथे असणार आहेत. ही दिवाळी माझ्यासाठी अविस्मरणीय असणार आहे. लहानपणी मी, ताई, आई आणि बाबा रात्री उशिरापर्यंत बसून एकत्र फराळ बनवायचो. मी धाकटी आणि सर्वात लाडकी असल्यामुळे मला करंजीला आकार देणे, चकल्या पाडणे ह्या गोष्टीं करायला मिळायच्या. दिवाळीनंतर भाऊबीजची ही खूप उत्सुकता असते. कारण मी आणि खुशबू रक्षाबंधन आणि भाऊबीज दोन्ही सण साजरे करतो. त्या व्यतिरिक्त आम्ही सर्व भावंडं भेटतो आणि भाऊबीज साजरी करतो.”
‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेतील अर्जुन म्हणजेच अभिनेता रोहित परशुराम त्याच्या दिवाळीबद्दल सांगतो, “ही दिवाळी आमच्या पूर्ण परिवारसाठी खासच आहे कारण माझ्या घरी माझ्या मुलीच्या रुईच्या रूपात खरोखरच लक्ष्मीचे आगमन झाले आहे. तिच्या येण्याने आमचे घर आनंदाने भरून गेले आहे. तिच्या गोड हसण्याने आम्ही सर्वच जणू फुलून जातो. यावेळी पूर्ण दिवाळ सण माझ्या लाडक्या कन्येच्या अवतीभवती असणार आहे. सगळ्यांना माझ्याकडून दिवाळीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. “