नेम, फेम आणि मनी बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या सर्वच कलाकारांना या गोष्टी भरभरून मिळतात आणि याचसाठी अनेक लोकं या क्षेत्राकडे आकर्षित होतात. तर अनेकांमध्ये खरंच प्रतिभा असते आणि म्हणूनच ते या क्षेत्रात येऊन आपले नशीब अजमावतात. या क्षेत्रात करियर करण्याच्या उद्देशाने अनेक लोकं मुंबईमध्ये येतात. अशाच एका गर्दीत आली होती कंगना रणौत. पुढे कसे जायचे?, कामासाठी कोणाला भेटायचे? कुठे राहायचे?, काय खायचे? आदी अनेक प्रश्न तिच्यासमोर आ वासरून उभे होते. मात्र तरीही तिचा उद्देश एकच होता, चित्रपटांमध्ये काम करत अभिनेत्री व्हायचे. मोठ्या मेहनतीने आणि अजोड कष्टाने तिने तिचे करियर घडवले आणि टॉपच्या अभिनेत्रींमध्ये स्थान मिळवले. अभिनयासोबतच आपल्या वक्तव्यांमुळे आणि वादांमुळे कंगना सतत गाजत असते. आज याच कंगनाचा ३६ वा वाढदिवस. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया तिच्याबद्दल अधिक माहिती. (Kangana Ranaut)
पहाडी भागातील म्हणजेच हिमाचल प्रदेशातील भमला येथे कंगनाचा जन्म झाला. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये कंगनाचे संगोपन झाल्यामुळे आपले बालपण फार सुखात आणि आनंदात गेले असेही तिने एका मुलाखतीमध्ये सांगितले. कंगना अत्यंत साध्या कुटुंबातील मुलगी. त्यामुळे चित्रपटसृष्टीमध्ये सुरुवातीच्या दिवसांमध्ये हे साधेपण तिच्या वागण्याबोलण्यातून झळकत होते. किंबहुना आजही जाणवते.
कंगना आज जरी टॉपची आणि प्रतिभासंपन्न अशी प्रसिद्ध अभिनेत्री असली तरी तिने या क्षेत्रात अजिबात जाऊ नये असेच तिच्या वडिलांना अमरदीप रणौत यांना नेहमी वाटायचे. त्यांची इच्छा होती की कंगनाने डॉक्टर व्हावे. त्यांनी तिला चंदीगडच्या डीएव्ही स्कूलमध्ये प्रवेश मिळवून दिला, पण कंगनाला वैद्यकीय पुस्तकांपेक्षा पेज ३ ची मासिकं जास्त आवडायची. ती शाळेच्या कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असे. तिला रॅम्पवर चालण्याची आवड होती. शाळेतील फ्रेशर्स पार्टी असो किंवा सॅंडॉफ पार्टी ती रॅम्पवर चालायची. शालेय जीवनापासून तिला मॉडेलिंगची आवड आहे.
माध्यमातील वृत्तानुसार, कंगना जेव्हा शाळेत होती तेव्हापासूनच मॉडेलिंगमध्ये तिची आवड वाढू लागली. ती १२ वी नापास झाली आणि तिने शाळेत जाणे बंद केले आणि ती पीजीमध्ये राहू लागली. ही बाब तिचे वडील अमरदीप यांना कळताच त्यांनी कंगनाला मारहाण केली. तेव्हाच कंगनाने तिच्या वडिलांना तिला अभिनयात रस असून, याच क्षेत्रात करियर करायचे असल्याचे सांगितले. ते ऐकून तिच्या वडिलांनी रागाने तिला घर सोडण्यास सांगितले. त्यामुळे तिला घरून आर्थिक मदत मिळाली नाही. पुढे ती दिल्लीला गेली. जेव्हा कंगनाने घर सोडले तेव्हा ती अवघ्या 16 वर्षांची होती. कंगना रणौतने आपल्या मॉडेलिंग करिअरची सुरुवात दिल्लीत केली. हे दिवस खूप कठीण होते. कंगनाने स्वतः सांगितले होते की, अनेकदा तिला फक्त ब्रेड किंवा भाकरी आणि लोणचं खाऊन दिवस काढावे लागले होते’. दिल्लीनंतर, कंगना आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मुंबईत आली होती.
यानंतर अनेक वर्ष कंगनाचे वडील तिच्याशी बोलले नाहीत. कंगनाने ‘गँगस्टर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट देखील तिला नशिबानेच मिळाला. असे सांगितले जाते की, अनुराग बसूने कंगनाला एका कॅफेमध्ये कॉफी पिताना पाहिले. तिला वेटरमार्फत कंगनाला एक पेपर पाठवला, ज्यावर तिला अभिनयात रस आहे की नाही हे लिहिले होते. तिथे तिला ऑडिशनची ऑफर देण्यात आली. ऑडिशन पास केल्यानंतर तिला हा सिनेमा मिळाला. पुढे या सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पदार्पणाच्या पुरस्कार देण्यात आला.
त्यानंतर कंगनाची गाडीने वेग घेतला आणि तिला मधुर भंडारकर यांच्या फॅशन सिनेमासाठी विचारणा झाली. या सिनेमात तिने सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका केली होती. सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला आणि कंगनाला सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. या सिनेमातील तिचा अभिनय अतिशय प्रभावी आणि सजीव होता. त्यामुळे पुढे तिचा प्रवास सुकर झाला आणि तिच्याकडे अनेक चांगले सिनेमे आले.
तिला बॉलिवूडमध्ये आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. ती आज ज्या स्थानावर आहे त्यामागे अनेक वर्षांची मेहनत आहे. तिने तिच्या आता पर्यंतच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. तिची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना भावली आहे.
कंगना रनौतने सर्वोत्कृष्ट अभिनेत्री प्रकारात चार राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. 2008 मध्ये आलेल्या ‘फॅशन’ सिनेमासाठी कंगनाने प्रथम सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला होता. त्यानंतर 2014 मध्ये आलेल्या क्वीन चित्रपटातील दमदार अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर 2015 मध्ये तिला ‘तनू वेड्स मनू रिटर्न्स’ साठी २०२२ साली तिला मनकर्णिका सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. कला आणि चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी कंगनाला भारत सरकारने पद्मश्री हा देशातील चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरिक सन्मान देऊनही गौरवले आहे.
एकपेक्षा एक हिट चित्रपट देणारी कंगना तिच्या बॉलिवूड कारकिर्दीपेक्षा जास्त वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. सामाजिक, राजकीय सर्वच विषयावर ती तिचे मत व्यक्त करते आणि अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडते. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे काही वेळा कंगनाला टीकेचा सामना करावा लागला असून, काही प्रकरणं तर न्यायालयातही गेली आहेत.
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर कंगनाने संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीवर गंभीर आरोप केले होते. यात तिने गीतकार जावेद अख्तर यांच्यावर काही आरोप केले होते. कंगनाच्या आरोपांनंतर जावेद अख्तर यांनी तिच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या वादात कंगना रणौतने अभिनेत्री स्वरा भास्कर आणि तापसी पन्नू यांना बी- ग्रेड अभिनेत्री असे म्हटले होते.
कंगना रणौतचा ‘मणिकर्णिका’ हा चित्रपट बराच गाजला होता. मात्र यावर अभिनेत्री आलिया भट्टने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. यावरून भडकलेल्या तिने आलियाला करण जोहरच्या हातातली ‘कठपुतली’ म्हटले होते. तर तिने नेत्या ममता बॅनर्जी यांच्याबद्दल देखील एक व्यक्तव्य केले होते. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीनंतर तिने ममता बॅनर्जी यांच्याबद्दल ट्वीट करत लिहिले होते की, “माझी चूक झाली…तो रावण नाही…रावण एक महान राजा होता…त्याने जगातील सर्वात श्रीमंत देश बनवला…पण ही रक्तपिपासू राक्षसीण आहे.’ या ट्वीटवरून कंगनाला मोठ्या टीकेचा सामना करावा लागला होता.
एकदा तर कंगनाने थेट देशाच्या स्वातंत्र्यवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते ती म्हणाली होती की, “देशाला १९४७ साली मिळालेलं स्वातंत्र्य, हे भीक म्हणून मिळाले होते, मात्र २०१४ साली देशाला खरे स्वातंत्र्य मिळाले’.