मराठी टेलिव्हिजनसाठी अभिमानाचा क्षण!
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘कमळी’ नं असाच इतिहास रचला आहे. मालिकेचा कबड्डी विशेष प्रोमो नुकताच थेट अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या भव्य टाइम्स स्क्वेअरवर प्रदर्शित झाला. यामुळे ‘कमळी’ ही टाइम्स स्क्वेअरवर झळकणारी पहिली मराठी मालिका ठरली असून, मराठी संस्कृती, खेळ आणि परंपरा जगभर पोहोचवण्याचा मोठा मान मिळाला आहे.
मालिकेत दाखवलेला महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ कबड्डी ताकद, चातुर्य आणि संघभावना या सर्व गुणांचा संगम दाखवतो. या खास एपिसोडमध्ये टीम कमळी (विजया बाबर) आणि टीम अनिका (केतकी कुलकर्णी) यांच्यातील रोमांचक सामना पाहायला मिळणार असून, फक्त क्रीडात्मक थरार नव्हे तर पात्रांची जिद्द, धैर्य आणि टीम स्पिरिट यांचेही दर्शन घडणार आहे.
मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री विजया बाबर भावूक होत म्हणाली,
“कमळी माझ्यासाठी फक्त एक भूमिका नाही, तर आयुष्य बदलून टाकणारा प्रवास आहे. एका गावाकडच्या साध्या मुलीची स्वप्नं, संघर्ष आणि पुढे जाण्याची जिद्द मी जगते आहे. आज हीच गोष्ट टाइम्स स्क्वेअरवर झळकतेय, हे स्वप्नवत आहे. ही फक्त माझीच नाही, तर हजारो मराठी मुलींची कहाणी आहे.”
तिने पुढे सांगितले,
“जग जिंकण्याची सुरुवात आपल्या मातीतून होते, याचा पुरावा आज मिळाला.”
या मालिकेचं वैशिष्ट्य म्हणजे संस्कृती, खेळ आणि प्रेरणादायी कथानकाचा सुंदर संगम. निर्माते आणि कलाकारांच्या अथक मेहनतीमुळे ‘कमळी’ जागतिक पातळीवर झळकली आहे. टाइम्स स्क्वेअरवर झळकलेली तिची झलक दाखवते की मराठी मनोरंजन आता जागतिक पातळीवरही आपली ताकद दाखवत आहे.
प्रेक्षक दररोज रात्री 9 वाजता झी मराठीवर ‘कमळी’ चे नवे भाग पाहू शकतात आणि कथानकासोबत कबड्डीच्या उत्साही रंगांची मजा लुटू शकतात. या यशाने मराठी संस्कृती व पारंपरिक खेळांची आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख दृढ केली आहे.