Kalgitura Review: कलगीतुरा : दुःख राखणाऱ्यांचं दुःख!

Kalgitura Play Review In Marathi

कलगीतुरा… हरवलेल्या लयीचा गवसलेला वारा! असं या नाटकाचं शीर्षक. नरिमन पॉईंट येथील ‘एनसीपीए’ अर्थात नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्टस् च्या रंगमंचावर ‘प्रतिबिंब’ मराठी नाट्यमहोत्सवाच्या निमित्तानं शुभारंभाचा प्रयोग नुकताच पार पडला. नाटक.. हे प्रयोगशील माध्यम आहे. प्रयोगापरत्वे नाटक खऱ्या अर्थानं बसतं जातं; भक्कम होतं आणि मग ते नाटक गच्च बांधलं जात. त्यामुळे पहिल्या वाहिल्या प्रयोगात थेट नाटकाची समिक्षा करणं संयुक्तिक ठरणार नाही. पण, हे नाटक नेमकं काय आहे? आणि हे नाटक यापुढे प्रेक्षकांनी पाहणं का महत्वाचं आहे? याचा ओहापोह इकडे जरुर करावासा वाटतो. ज्यांना ‘कलगीतुरा’ म्हणजे नेमकं काय? हे माहिती नाही. त्या वाचकांसाठी केलेलं हे विश्लेषण म्हणा. आणि ज्यांना ‘कलगीतुरा’ माहिती आहे; त्यांच्यासाठी ही उजळणी म्हणा! लेखक दत्ता पाटील आणि दिग्दर्शक सचिन शिंदे यांनी हा ‘कलगीतुरा’ चा फड उभारला आहे.

तुरा एकटा, कलगी गेली कैलासाच्या दारी हो
शक्ती गेली पंचत्वाशी, कोण शिवाला तरी हो
शक्तीहिन तो पुरुष, ज्याची सोडून जाते नरी हो
म्हणे सखाराम शान तुऱ्याची, कलगीविना अधुरी हो

दोन गटांमधील शाब्दिक भांडण, विचारविनिमय, संवाद, विवाद, सवाल-जवाब म्हणजे हा ‘कलगीतुरा’. एक गट ‘कलगी’ आणि दुसरा गट ‘तुरा’; एकमेकांना पूरक असणारे असे हे… एकाविना दुसरा अपुरा! दोन गटांमध्ये, पक्ष.. संघटनांमध्ये असलेल्या वादाचे, भांडणाचे संबोधन करण्यासाठी आपण अनेकदा ‘कलगीतुरा रंगला’ असा वाक्यप्रचार करतो. पण, नेमका हा ‘कलगीतुरा’ काय असतो? हे आपल्यापैकी अनेकांना स्पष्टपणे माहिती नसेल. याचं प्रश्नाचं उत्तर देण्याचं काम लेखक दत्ता पाटील आणि दिग्दर्शक सचिन शिंदे त्यांच्या ‘कलगीतुरा’ हे नाटक करतं. ‘कलगीतुरा’ म्हणजे काय? याचं सर्वसाधारण उत्तर म्हणजे; ही एक लोककला परंपरा आहे.

महाराष्ट्रातील विविध प्रांताच्या बोलीभाषांमधून, लहेजातून लिहिलेल्या शाहिरी लावण्यांचा, विशेषतः अध्यात्मिक लावण्यांचा प्रकार आहे. गावागावांतून बहुजन शेतकरी बांधव कलगीतुऱ्याच्या माध्यमातून कूटप्रश्न यात एकमेकांना विचारात. त्याच्या उत्तरातून प्रेक्षकांचं गावकऱ्यांचा प्रबोधन होतं. ही मातीतील लोककला आजच्या घडीला लोप पावण्याच्या मार्गावर असताना ती पुन्हा जिवंत करण्याचं आणि या लोककलेचे महत्व हे नाटक समजून सांगण्याचा प्रयत्न करत. ‘कलगी’ म्हणजे शक्ती आणि तुरा म्हणजे ‘शिव’; मग शिव श्रेष्ठ की शक्ती श्रेष्ठ.. असा हा झगडा आणि त्यातून होणारं समाजप्रबोधन. ही लोककला असल्या कारणानं ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केली जाते. पण, १९९०-९१ च्या दूरदर्शन क्रांतीने या लोककलेच्या पहिला मोडता घालण्याचा प्रारंभ झाला. हाच धागा पडकून लेखक दत्ता पाटील याने कौटुंबिक नाट्यकथानक रचलं आहे.

जीवनमूल्य हरवले की लोक अस्वस्थ होतात आणि हेच मूल्य जपण्याचे काम पूर्वी लोककलेतून होत असे. लोककला जगण्याचे मूल्य शिकवतात. आता ही परंपरा लोप पावत असल्यामुळे त्यासोबत जीवनमूल्य नष्ट होत आहेत. प्रामुख्याने १९९० नंतर लयास गेलेली ‘कलगीतुरा’ पुन्हा उभारण्यासाठी एकत्र येणारे २००० च्या दशकातील तरुणांची ही गोष्ट आहे. आपल्या मातीतील कला मातीतुन उखरून काढून त्याला साज चढवण्यासाठी केलेला प्रपंच या नाटकात आहे. तोड विस्कटून सांगायचं तर; कलगीतुरामध्ये… लावणी, सवाल- जवाब, वगनाट्य आदींचा पाया असतो.. याच लोककलेचे जतन केलं गेलं पाहिजे; आणि त्याची तोंड ओळख शहरातील पांढरपेशा लोकांना झाली पाहिजे.. म्हणून हा फड त्यांनी रंगवला असावा.

मध्यंतरी ‘महाराष्ट्र शाहीर’ हा सिनेमा मोठ्या प्रदर्शित झाला आहे. यात शाहीर साबळे आणि त्यांची पत्नी अर्थात गीतकार भानुमती यांचा जीवनप्रवास दिग्दर्शक केदार शिंदे यानं दाखवला आहे. सिनेमा चरित्रपट असला तरी; शाहिरी बाजाची त्या परंपरेची ओळख प्रेक्षकांना सिनेमातून नक्कीच झाली. शाहीर साबळे यांच्या शाहिरीचा एक प्रवास होता.. तो पुढे मुंबईपर्यंत आला. पण, असे अनेक शाहीर आहेत.. जे त्यांच्या त्यांच्या गावात, मोहोल्यात शाहिरीच्या माध्यमातून.. लोककलेच्या माध्यमातून समजप्रबोधन करण्याचे अतुलनीय काम केलं आहे किंवा करत आहेत. त्यांचं दुःख नेमकं काय आहे? हे सांगण्याचा प्रयत्न हे नाटक करत.

‘दुःख राखणाऱ्यांचे दुःख काय असते?’ या प्रश्नाचे उत्तर हे नाटक देते. गावात कोणी तिन्हीसांज्याला वारलं किंवा कोणत्या नातेवाईकला येण्यास उशीर होणार असेल; तर रात्री मैताला अग्नी दिली जात नसते. पहाटे उजाडल्यावर अंत्यसंस्कार केले जात. अशावेळी संपूर्ण रात्र.. जागरण करुन त्या दुःखाची राखण करण्याचं काम हे कलगीतुरावाले लोककलावंत करत असतं. लावणी व लोकसंगीताच्या माध्यमातून ती रात्र जागरण करुन.. त्या दुःखाची ते राखण करत. पण, आता जे दुःख राखतात त्यांचं दुःख कोण राखणार? असा सवाल हे नाटक प्रेक्षकांना विचारु पाहतं. कथानकात; महाराष्ट्रातील उमराणे खेड्यात फार पूर्वीपासून कलगीतुरा नावाची लोककला चालत आलेली होती. कलगीतुरा ही लयास गेलेली परंपरा पुन्हा जिवंत करण्यासाठी आसुसलेल्या आणि भौतिकदृष्ट्या समाधानी असलेल्या; मात्र तरीही अस्वस्थ असलेल्या ग्रामीण भागातील माणसांची गोष्ट अधोरेखित करतो.

ते अशी लोकपरंपरा प्रवाहित करायला का आसुसले आहेत? याच्या कारणांचा आपल्या नेणिवेतून शोध घेण्याचा प्रयत्न हे नाटक करतं. नाटकाची मांडणी विषयानुरूप संगितिकी आहे.. हे संगीतनाटक नाही. पण, या नाटकात सांगीतिक बाज आणि मांडणी अत्यंत महत्वाची आणि पूरक आहे. ऋषीकेश शेलार या तरुण संगीतकाराने सिनेमाचे संगीत दिलं आहे. जो नाटकात स्वतः कामही करतो आणि लावण्या गातो देखील. विशेष म्हणजे नाटकातील सर्व कलाकार नाशिकमधीलच आहेत. यातील काही कलाकार तर पहिल्यांदाच नाटकात काम करत आहेत. हेमंत महाजन, विक्रम नन्नावरे, निलेश सूर्यवंशी, वैभवी चव्हाण, समृद्धी गांगुर्डे या कलाकारांनी उमदा काम केलं आहे. राम वाणी, अरुण इंगळे, हृषीकेश शेलार, राजेंद्र उगले, कृष्णा शिरसाठ, प्रवीण जाधव, शुभम लांडगे, किरण रावबच्चे, कविता देसाई आणि हृषीकेश पाटील आदी सर्वच कलाकारांची काम लक्षवेधी आहेत.

आधुनिकीकरणाच्या झंझावाताने सातशे वर्षे जुनी असलेली कलगीतुरा ही लोकप्रिय परंपरा कशी नामशेष झाली हे नाटकात दाखवताना.. रचलेलं प्रसंग सामाजिक बदल आणि तत्कालीन परिस्थितीची साक्ष देण्यात यशस्वी झाली आहेत. गावातील काही तरुणांना या परंपरेचे पुनरुज्जीवन करावे असे का वाटत असते? नेमके त्याचवेळी ही लोककला ज्ञात असलेल्या ज्येष्ठ कलावंताचे दुर्दैवी निधन होते? त्यामुळे जुन्या लावण्या मिळवणे; जुनी वाद्ये शिकणे ही बाब त्या युवकांसाठी अवघड बाब बनते. त्यातून ही तरुण मंडळी मार्ग कसा काढतात आणि दुःखद प्रसंगी सांत्वन करण्याच्या पारंपरिक प्रथेचे कसे पुनरुज्जीवन करतात हे इतंभूत दाखवण्याचा प्रयत्न लेखक-दिग्दर्शकाने केला आहे.

पृथ्वी मंडल कैसे झाले घ्या तुम्ही ऐकून ।
मेरू मंदार सात समुद्र आधी अवसान।।

नदी, पर्वत, धुर्व, स्वर्ग कोना पासून ।
कि ती लांबी, रुंदी याची संख्या सांगन ।।

सप्त समुद्र, मेरू, पर्वत, पृथ्वी मध्यान।
मेरू भवती दीप सांगतो जमाव झाडून।।

जणू दीपाची संख्या सांगतो लक्ष योजन।
बतीस शिखर मेरू वरती देवाच ठान ।।

या आणि सारख्या इतर अनेक काव्यरचना, गण, गौळण, सखी.. लावण्या नाटकात आपल्या कथानकाच्या प्रवासात कानी पडतात. ही लोकपरंपरा किती मोलाची आणि शब्दसुरांनी नटलेली आहे. याचा दृष्टांत ते आपल्याला देऊन जातात. केवळ नाटकाचे कथानकच नव्हे तर नाटकातील सांगीतिक प्रवास संगीतकार, पार्श्वसंगीतकार आणि सादारकर्ते कलाकार मंडळींनी उत्कृष्टपणे मंचावर उभा केला आहे. लावण्यांमध्ये पौराणिक बोधकथा, लोककथा गुंफल्या जायच्या. डफ, तुणतुण्याच्या आणि खणखणीत गायकीतून लोकांना जमतील तशी कळतनकळत जगण्याची मूल्यं आपल्याला नाटकातून समजून घेण्यास मदत होते.

अपरात्री गावशिवारातल्या कुणाचं निधन झालं, तर त्याच्या कुटुंबाला सारी रात्र साथ द्यायला तिथं जायची आणि रात्रभर मंद उजेडात कलगीतुऱ्याची कवनं समूहसुरात गात राहायची कलगीतुरा लोप पावल्यानं मानवी जगण्याचं अनोखं मूल्य अधोरेखित करणारी ही दुःख राखण्याचं दुःख समजून घेता येते. हे केवळ पारंपरिक लोककलेच्या भोवतालचं करमणूकप्रधान नाटक नसून, समकालातील ग्रामीण जगण्याच्या प्रश्नांनाही जाऊन भिडतं. मानवी जगण्याच्या देशी मूल्यांचा आपल्याच नेणिवेतून शोध घ्यायलाही भाग पाडतं. ‘हंडाभर चांदण्या’, ‘तो राजहंस एक’, ‘दगड आणि माती’ अशी महत्त्वाची नाटकं देणाऱ्या दत्ता पाटील यांचं हे आणखी एक महत्त्वाचं नाटक आहे. नाटकात शाहिराने दिलेला आलाप.. कानात नाटकानंतरही भिनत राहतो. मनात घर करतो.

 

नाटक : कलगीतुरा
निर्मिती : एनसीपीए
लेखक : दत्ता पाटील
दिग्दर्शक : सचिन शिंदे
कलाकार : हेमंत महाजन, विक्रम नन्नावरे, निलेश सुर्यवंशी, राम वाणी, अरुण इंगळे, हृषिकेश शेलार, राजेंद्र उगले, कृष्णा शिरसाठ, प्रवीण जाधव, शुभम लांडगे, किरण राववच्चे, वैभवी चव्हाण, समृद्धी गांगुर्डे, कविता देसाई आणि हृषिकेश पाटील
पार्श्वसंगीत : रोहित सरोदे
संगीतकार : हृषिकेश शेलार
प्रकाशयोजना : प्रणव सपकाळे
प्रकाशयोजना साहाय्यक : भूषण चौधरी
नेपथ्य : चेतन बर्वे
नेपथ्यनिर्माण : मच्छिंद्र शिंदे, प्रोप्रायटर आर्टिसन
रंगभूषा : ललित कुलकर्णी
वेशभूषा : कविता देसाई
निर्मितीसाहाय्य : लक्ष्मण कोकणे
दिग्दर्शनसाहाय्य : राहुल गायकवाड
एनसीपीएकरिता निर्माती : राजेश्री शिंदे

Spread the love

Related posts

Mr. & Mrs. Mahi Movie Review : भावनिक यशाचा षटकार!

होय महाराजा: कॉमेडीचा बहर, क्राईम चा कहर!

Swatantra Veer Savarkar Review: इतिहासाचा एकपात्रीपट!

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More