Jaran Movie Review : अंधश्रद्धा की मानसिक गुंतागुंत? ‘जारण’ देतो भयाचा एक वेगळाच अनुभव

हृदयाचा ठाव घेणाऱ्या कथा सांगण्यात हृषिकेश गुप्ते यांचा हातखंडा आहे. लेखक म्हणून मराठी साहित्यविश्वात ठसा उमटवल्यानंतर त्यांनी आता चित्रपटसृष्टीत एक वेगळी वाट पकडली आहे. त्यांचा नवा सिनेमा ‘जारण’ हा केवळ भयपट नाही, तर मानसिकतेच्या खोल पातळीवर भिडणारा एक अनुभव आहे.

हृषिकेश गुप्ते यांचा ‘जारण’ हा तिसरा दिग्दर्शकीय प्रयत्न आहे. पण यावेळी त्यांनी प्रेक्षकांना दचकवण्याऐवजी त्यांच्या मनोवस्थांमध्ये शिरकाव केला आहे.

भय म्हणजे काय? अंधार, विचित्र आवाज, की नकळत खोलवर रुजलेली आठवण?

‘जारण’ या चित्रपटात हा प्रश्न गूढ पद्धतीनं उलगडत जातो. बालवयात एका काळ्या जादूच्या घटनेनं प्रभावित झालेली राधा (अमृता सुभाष) आणि तिचं मनोविकाराचं जग – या दोहोंमधून हा सिनेमा आकार घेतो.

गंगुटी (अनिता दाते) नावाची स्त्री राधाच्या बालपणात ‘जारण’ नावाची काळी विद्या वापरते. ही घटना तिच्या मनात खोलवर घर करते. आयुष्य पुढे सरकते, पण मनाच्या कोपऱ्यात कुठे तरी ती घटना दबलेली राहते. एक अपघात, एक विस्मरण, आणि अचानक तेच जुने सावट तिच्या आयुष्यात पुन्हा परतते.

श्रद्धा आणि अंधश्रद्धेतील सीमारेषा पुसून टाकणारा हा सिनेमा खरंतर एका स्त्रीच्या अंतर्मनाचा प्रवास आहे.

राधाच्या भावविश्वात – वास्तव आणि आभास यांच्यात – सुरु होतो एक अदृश्य खेळ. अमृता सुभाष या भूमिकेत इतक्या नैसर्गिक वाटतात, की तिच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या लहानसहान भावना सुद्धा मनाला चटका लावतात. तिचं हे पात्र दिवास्वप्नं आणि सत्य यांचं गूढ मिश्रण आहे.

अनिता दातेनं साकारलेली गंगुटी ही ‘रियल’ वाटते – एक अशी स्त्री जी लोककथांत ऐकू येते, पण प्रत्यक्षात भेटली तर हादरवून सोडते. किशोर कदम यांचा मानसोपचारतज्ज्ञ डॉ. कुलकर्णी ही व्यक्तिरेखा सुद्धा प्रेक्षकांना समतोल देऊन जाते.

सिनेमाच्या दिग्दर्शनात सूक्ष्म संकेत, सिम्बॉलिक दृश्यं, आणि हलकं पण प्रभावी पार्श्वसंगीत यांचा सुरेख मेळ आहे. अभिजीत देशपांडे यांच्या संकलनामुळे सिनेमाचा संथपणा शेवटी वेग पकडतो.

काही जागी कथा थोडी विस्कळीत वाटते, काही पात्रं लवकर गायब होतात, पण हे सगळं एक मुद्दाम निर्माण केलेलं गूढ आहे. प्रेक्षकांना सर्व समजेल असं सादरीकरण नाही, पण ज्यांना मनोविश्लेषणात्मक कथा आवडतात, त्यांच्यासाठी ‘जारण’ एक अनोखा अनुभव ठरतो.

शेवटी एक प्रश्न उरतो – ‘खरंच आपण अंधश्रद्धांपासून मुक्त झालो आहोत का?’ ‘जारण’ हा सिनेमा तोच प्रश्न प्रेक्षकांसमोर गुंतागुंतीच्या पद्धतीनं मांडतो.

‘जारण’ हा भयपट नसून मनभयपट आहे – डोक्याला सतावणारा, विचारांमध्ये गुंतवणारा आणि आभासांच्या गुंत्यात अडकवणारा. अमृता सुभाष आणि अनिता दाते यांचा अभिनय पाहण्यासाठी, आणि हृषिकेश गुप्ते यांचं वेगळं सिनेमॅटिक दर्शन अनुभवण्यासाठी ‘जारण’ नक्की बघा.

सिनेमा : जारण (Jaran Movie Review)
निर्मिती : अमोल भगत, नितीन कुलकर्णी
लेखक, दिग्दर्शक : हृषिकेश गुप्ते
कलाकार : अमृता सुभाष, अनिता दाते, किशोर कदम, ज्योती मालशे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, सीमा देशमुख
दर्जा : तीन स्टार

Stay tuned to Masala Manoranjan Website for the latest updates, Bollywood Updates, breaking news, box office reports, movie reviews, television, OTT, OTT News, Hollywood, and regional cinema, including South Indian films.

Spread the love

Related posts

११ वर्षांनंतर पुन्हा एकदा अंकुश ,स्वप्नील आणि सईची मैत्री झळकणार मोठ्या पडद्यावर

‘बाई गं’ मराठी मनोरंजनविश्वातील “हा” सुपरस्टार एकाच चित्रपटात दिसणार सहा अभिनेत्रींसोबत

होय महाराजा: कॉमेडीचा बहर, क्राईम चा कहर!

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More