मराठी सिनेसृष्टीत सध्या एकच नाव चर्चेत आहे – ‘जारण’. हृदयस्पर्शी कथा, वास्तवदर्शी मांडणी आणि दमदार अभिनयाच्या जोरावर या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. केवळ १२ दिवसांत ३.५ कोटी रुपयांचा गल्ला जमवत ‘जारण’ने बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या आठवड्यातील विकेंडमध्ये एकट्या तीन दिवसांत १.६५ कोटींची कमाई झाली असून, तो अलिकडच्या काळातील उल्लेखनीय आकडा मानला जातो.
चित्रपटाचे यश ‘वर्ड ऑफ माऊथ’ने अधिक गडद केलं असून, अमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्या सशक्त अभिनयाने कथा एका भावनिक उंचीवर नेली आहे. त्यांचा अभिनय पाहून प्रेक्षक भारावून गेले असून, सोशल मीडियावर दोघींच्या परफॉर्मन्सची आणि कथानकाची खूपच चर्चा सुरू आहे.
चित्रपटाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे थिएटर्समध्ये शोज वाढवले जात आहेत, आणि प्रत्येक शोमध्ये प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळतो आहे. कथानकातील प्रामाणिकपणा, भावनिक खोलपणा आणि सादरीकरणातील ताकद यामुळे ‘जारण’ सर्व वयोगटातील प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे.
दिग्दर्शक हृषिकेश गुप्ते या यशाबद्दल म्हणतात,
“‘जारण’सारखा विषय मांडताना प्रेक्षकांकडून मिळालेला प्रतिसाद हा अमूल्य आहे. कथा आणि सादरीकरणाचं जे कौतुक होतंय, ते आमच्या संपूर्ण टीमसाठी प्रेरणादायी आहे.”
अनिस बाझमी प्रोडक्शन्स प्रस्तुत, ए अँड एन सिनेमाज एलएलपी यांच्या सहयोगाने आणि ए३ इव्हेंट्स अँड मिडिया सर्व्हिसेस निर्मित ‘जारण’चे लेखन आणि दिग्दर्शन हृषिकेश गुप्ते यांनी केलं आहे. अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी निर्मिती केली असून, मनन दानिया सहनिर्माते आहेत.
या चित्रपटात अमृता सुभाष आणि अनिता दाते प्रमुख भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबत किशोर कदम, ज्योती माळशे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी, आणि सीमा देशमुख यांच्या अभिनयाने चित्रपट अधिक प्रभावी बनला आहे.