कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘इंद्रायणी’ ने आपल्या यशस्वी प्रवासात 600 भागांचा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. या आनंदाच्या क्षणी मालिकेच्या सेटवर कलाकारांसह संपूर्ण कॅमेऱ्यामागील टीम एकत्र आली आणि केक कापत हा खास दिवस साजरा करण्यात आला. आठवणींना उजाळा देत, हसत-खेळत आणि काही क्षण भावूक होत सेटवरील वातावरण भारावून गेलं होतं. प्रेक्षकांच्या अखंड प्रेमामुळे आणि टीमच्या अथक मेहनतीमुळे ‘इंद्रायणी’ आजही तितक्याच ताकदीने प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान टिकवून आहे.
या खास क्षणाविषयी मालिकेत इंदूची भूमिका साकारणारी अभिनेत्री कांची शिंदे म्हणाली,
“‘इंद्रायणी’चे 600 भाग पूर्ण होणं म्हणजे माझ्यासाठी फक्त एक आकडा नाही, तर आयुष्यातला एक सुंदर आणि समृद्ध प्रवास आहे. इंदूची भूमिका जगताना मी स्वतःही खूप काही शिकले. जेव्हा मला ही मालिका ऑफर झाली, तेव्हा मनात अनेक प्रश्न होते — मी हे पात्र कसं साकारेन, प्रेक्षक मला स्वीकारतील का? पण विठुरायाच्या कृपेने प्रेक्षकांनी मला आपलंस केलं.”
ती पुढे म्हणाली,
“नाशिकमध्ये शूट करताना तिन्ही ऋतू अतिशय एक्स्ट्रीम असतात. त्या प्रत्येक परिस्थितीशी झुंज देत आज 600 भाग पूर्ण झाले, याचा प्रचंड आनंद आहे. ही शाबासकी फक्त कलाकारांची नाही, तर कॅमेऱ्यामागे दिवस-रात्र मेहनत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आहे. म्हणूनच या आनंदाच्या क्षणी आम्ही कॅमेऱ्यामागील टीममधील सगळ्यांना कॅडबरी देऊन त्यांचं मनापासून कौतुक केलं. हा प्रवास आम्हा सगळ्यांचा एकत्रित प्रयत्न आहे.”
दरम्यान, सध्या ‘इंद्रायणी’ मालिकेची कथा अत्यंत थरारक वळणावर आली आहे. इंदू-अधोक्षजसमोर मोहितराव शाळेच्या भागीदारीचा वाद थेट पंचायत निर्णयापर्यंत नेण्याचं उघड आव्हान देतो. अधोक्षज परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करतो, मात्र पुढच्याच दिवशी पोलिस त्याच्या दारात येतात आणि एका गंभीर आरोपाखाली त्याला अटक करण्यासाठी सज्ज होतात.
या धक्कादायक घडामोडीनंतर सत्याचा शोध सुरू होतो. इंद्रायणी ठामपणे अधोक्षजच्या बाजूने उभी राहते. काही अनपेक्षित कबुल्या सगळ्यांनाच थक्क करतात, तरीही इंदूच्या मनात खरा दोषी वेगळाच असल्याचा संशय कायम राहतो. अधोक्षज निर्दोष आहे हे सिद्ध करण्याचा इंद्रायणीचा प्रयत्न आणि खऱ्या गुन्हेगाराचा शोध, यामुळे पुढील भाग अधिकच रंजक होणार आहेत.
इतकंच नव्हे, तर आनंदाच्या आड काहींचे गुप्त हेतू अजूनही लपलेलेच आहेत. इंद्रायणी-श्रीकला यांच्यातील सूक्ष्म तणाव कथेला अधिक गूढ आणि उत्कंठावर्धक बनवत आहे. इंद्रायणी अधोक्षजला निर्दोष कसं सिद्ध करणार? पुढे कथा कोणतं नवं वळण घेणार? हे सगळं पाहण्यासाठी ‘इंद्रायणी’ चे आगामी भाग नक्की पहा — सोमवार ते शनिवार, रात्री ७ वाजता, फक्त कलर्स मराठीवर.