Housefull 5 Movie Review : गोंधळ, ग्लॅमर आणि गुंतागुंतीचं गुपित!

‘हाउसफुल 5’ हा चित्रपट म्हणजे एका विनोदी मालिकेचा पुढचा भाग… पण तो पाहून मनात विचार येतो – हे अजूनही का सुरू आहे? हाउसफुल 4 नंतरही लोकांनी तिकीटं काढली, हसलो नाही तरी पॉपकॉर्न संपवला. त्याचा फायदा घेऊन आता पाचवा भाग आलाय, पण यावेळी दिग्दर्शकांनी फॉर्म्युला थोडा बदललाय – थोडंसं मिस्ट्री आणि भरपूर मिसफिट विनोद.

चित्रपटाची सुरुवात होते एका बड्या बिझनेसमनच्या मृत्यूनं. त्यानं मागं सोडलाय तब्बल 69 बिलियन पाउंड्सचा वारसा (हो, एवढाच आकडा आहे, आणि त्याच्यावरच संपूर्ण विनोद उभा आहे). पण वारसदार कोण? एक नाही, तर तीन जॉलीज पुढे येतात – अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, आणि रितेश देशमुख. आणि सगळ्यांचं एकच मिशन – “मीच तो खरा जॉली!”

इथेच सुरू होतो एक गोंधळाचा खेळ, जो हसवतो की त्रास देतो, ते प्रेक्षकांनी ठरवायचं. या गोंधळात एक खून होतो आणि मग कथेत एन्ट्री होते दोन सस्पेंड पोलिसांची – जॅकी श्रॉफ आणि संजय दत्त. शेवटी नाना पाटेकर यांचं पात्र, इंटरपोल अधिकारी, येतं आणि सगळा उलगडा करतो… पण तोपर्यंत आपणही थोडे गोंधळलेलोच असतो.

चित्रपटात विनोद आहेतच, पण ते डोकं धरायला लावणारे. संवाद फक्त डबल मीनिंगवर आधारलेले, आणि ज्या ठिकाणी आपल्याला खळखळून हसू येईल, तिथे आपण नुसते चेहऱ्यावर हात ठेवतो. सौंदर्य आहे, पण अभिनय कुठे? पाच अभिनेत्री – जॅकलीन, सोनम, नरगिस, सौंदर्या, आणि चित्रांगदा – फक्त फ्रेम भरण्यासाठी वापरल्या गेल्या आहेत. त्यांचं एकही डायलॉग लक्षात राहत नाही, पण त्यांचे लूक मात्र तुम्हाला लक्षात राहतात.

अक्षय कुमार पहिल्या काही सीनमध्ये उत्साही वाटतो, पण नंतर त्याचं लक्ष उडालेलं जाणवतं. अभिषेक बच्चन पूर्ण वेळ थोडा गोंधळलेला दिसतो, आणि रितेश देशमुखला पाहून वाटतं, त्यालाही हे समजलेलं आहे की इथे काही विशेष घडणार नाहीये. जॅकी श्रॉफचा मस्त मूड आहे, आणि संजय दत्तचं टॅलेंट वापरायचं विसरून गेलेत. नाना पाटेकर शेवटी थोडा भार सांभाळतात, पण चित्रपट तेवढ्यावर वाचू शकत नाही.

‘हाउसफुल 5’ चा सेट भव्य आहे, कपडे झगमगीत आहेत, आणि काही दृश्यं तर फिल्मफेअर अॅवॉर्डसाठी सजलेली वाटतात. पण कथा? स्क्रीनप्ले? विनोद? त्या सगळ्या गोष्टी हरवलेल्या आहेत. ‘लाल परी’ हे एकच गाणं लक्षात राहतं, बाकी संगीत विसरण्यासाठीच आहे.

संपूर्ण चित्रपट पाहताना असं वाटतं की हा सिनेमा डोळ्यांसाठी डिझाइन केला गेलाय, मनासाठी नव्हे. आणि ते ‘विशिष्ट’ 69 बिलियनचं गुपित, तेही हळूहळू कंटाळा आणणारं होतं – खासकरून जेव्हा प्रत्येक संवादात त्याचा वापर फक्त हसू आणण्यासाठी केला जातो.

एकंदरीत सांगायचं तर – ‘हाउसफुल 5’ हा चित्रपट पाहताना काही वेळा तुम्ही हसाल, पण बहुतांश वेळा तुमचा चेहरा “हे काय आहे?” अशा भावात असेल. जर तुम्ही हाऊसफुल मालिकेचे कट्टर फॅन असाल, तर एकदा पाहून होईल.

सिनेमा : हाउसफुल ५ (Housefull 5 Movie Review)
निर्माते : साजिद नाडियाडवाला, वर्दा नाडियाडवाला, फिरुजी खान
दिग्दर्शक : तरुण मंसुखानी
कथा : साजिद नाडियाडवाला
कलाकार : अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, जॅकलीन फर्नांडिस, सोनम बाजवा, नरगिस फाखरी, चित्रांगदा सिंग, सौंदर्या शर्मा जॉनी लिव्हर, श्रेयस तळपदे, चंकी पांडे, फरदीन खान
विशेष भूमिका: नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ, संजय दत्त
दर्जा : दोन स्टार

Stay tuned to Masala Manoranjan Website for the latest updates, Bollywood Updates, breaking news, box office reports, movie reviews, television, OTT, OTT News, Hollywood, and regional cinema, including South Indian films.

Spread the love

Related posts

Thug Life Movie Review : कमल हासनचा थग लुक दमदार, पण मणिरत्नमची जादू हरवली

Chhaava: A Cinematic Tribute to Chhatrapati Sambhaji Maharaj

Mr. & Mrs. Mahi Movie Review : भावनिक यशाचा षटकार!

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More