२०२३ हे वर्ष बॉलिवूडच्या किंग खानसाठी खूपच उत्तम ठरले आहे. मधले काही वर्षे सिनेमामधून गायब असलेला शाहरुख यावर्षीच्या सुरुवातीलाच ‘पठाण’ घेऊन आला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धमाका केला आणि कमाईचे विविध रेकॉर्ड केले. शाहरुख खान संपला असे म्हणणाऱ्या सर्वच टीकाकारांना त्याने चांगलेच सणसणीत उत्तर दिले. त्यानंतर त्याचा दुसरा सिनेमा आला ‘जवान’. या सिनेमाने देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता शाहरुख २०२३ चा शेवट देखील स्वतःच्या नावावर करण्यासाठी घेऊन येतोय ‘डंकी’.
काही दिवसांपूर्वीच सिनेमाचा टिझर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर डंकीबद्दल असलेली उत्सुकता शिगेला पोहचली. आता या सिनेमातील पहिले गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. नुकतेच सिनेमातील ‘लुट पुट गया’ हे गाणे रिलीज झाले आहे. हे गाणे शाहरुख (हार्डी) आणि तापसी पन्नू (मनु) या दोघांवर चित्रित झालेले एक रोमॅंटिक गाणे आहे. अतिशय सुंदर असे हे गाणे रिलीज झाल्या झाल्या हिट झाले. या गाण्याला ‘डंकी ड्रॉप २’ असे म्हटले गेले आहे.
‘डंकी’ सिनेमातील ‘डंकी ड्रॉप २’ अर्थात ‘लुट पुट गया’ या गाण्यातून हार्डीचा मनुवरील प्रेमाचा सुरु होणार प्रवास उलगडताना दिसला आहे. कारण मनू त्याला संपूर्ण जगाच्या विरोधात जाऊन पाठिंबा देते. यासाठीच हार्डीच्या मनात मनूबद्दल प्रेम निर्माण होते आणि तो मनूच्या प्रेमात पडतो. नुकताच डंकी सिनेमाचे दिग्दर्शक असलेल्या राजकुमार हिरानी यांचा नुकताच वाढदिवस झाला. याच दिवसाचे औचित्य साधत ‘डंकी’मधील पहिले गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. दरम्यान ‘लुट पुट गया’ हे गाणे प्रीतमने संगीतबद्ध केले असून, स्वानंद किरकिरे आणि आयपी सिंह यांनी शब्दबद्ध केले आहे. तर सध्याच्या घडीचा लोकप्रिय गायक अरिजित सिंहने हे गाणे गायले आहे. तसेच गणेश आचार्य यांनी गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले आहे.
राजकुमार हिरानी यांच्या ‘संजू’ या सिनेमानंतर ते डंकी सिनेमा घेऊन येत आहे. शाहरुखचा हा बहुप्रतीक्षित ‘डंकी’ चित्रपट २१ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात शाहरुख खान, तापसी पन्नू यांच्यासोबत विक्की कौशल देखील दिसणार आहे. ‘डंकी’ हा चित्रपट अवैध स्थलांतर या महत्वाच्या आणि गंभीर मुद्द्यावर भाष्य करणारा आहे. या सिनेमामुळे २०२३ चा शेवट देखील धमाकेदार होणार आहे हे नक्की.