कधी कधी अशा घटना घडतात की, त्यावर विश्वास बसत नाही, पण त्या सत्य असतात. आपल्या उत्कृष्ट चित्रपटांद्वारे स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी पुन्हा एक पाऊल पुढे टाकले आहे. ‘शिवराज अष्टक’ नंतर आता संत साहित्याचा अमूल्य ठेवा प्रत्येक घरापर्यंत पोहोचावा, यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. नुकतीच त्यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे, ज्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मा. योगी आदित्यनाथ यांच्यासोबतच्या त्यांच्या भेटीचे फोटो आहेत. या पोस्टने चाहत्यांचे विशेष लक्ष वेधले आहे.
सोमवारी लखनऊ येथे दिग्पाल लांजेकर यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. या भेटीत योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे विशेष आत्मीयतेने स्वागत केले. यावेळी लांजेकर यांनी आपल्या आगामी ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी मुख्यमंत्री यांना निमंत्रित केले. इतिहास, कला, आणि संस्कृती या विषयांवर दोघांमध्ये मनमोकळ्या चर्चा झाल्या. या विशेष प्रसंगी अभिनेता अजय पूरकर आणि आळंदीच्या संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ देखील उपस्थित होते.
“योगी आदित्यनाथ हे एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व असून त्यांची भेट हा अविस्मरणीय क्षण होता. त्यांच्यासोबत वेळ घालवणे आनंददायी आणि सन्मानजनक होते,” अशी भावना दिग्पाल लांजेकर यांनी व्यक्त केली. नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय यांचा परस्परांशी असलेला गूढ आणि ऐतिहासिक संबंध, तसेच या संप्रदायांमध्ये संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांचे योगदान यावरही विस्तृत चर्चा झाली. “त्यांचा संत साहित्य आणि धर्म-संस्कृती यावरील गाढा अभ्यास थक्क करणारा होता,” असे सांगून लांजेकर यांनी या भेटीसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाविषयी माहिती घेतली आणि चित्रपटाला आपले शुभाशिर्वाद दिले. हा चित्रपट १८ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.