कोकण… मराठी चित्रपट आणि वेब सीरिजसाठी जणू न संपणारा खजिनाच. निसर्गसौंदर्याच्या पार्श्वभूमीवर उलगडणाऱ्या कथा, श्रद्धा आणि अंधश्रद्धेची सरमिसळ, आणि मानवी लोभाचे विविध पदर हे सगळं ‘देवखेळ’मध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळतं.
ZEE5 वरील सात भागांची ही मराठी वेब सीरिज देवताळी गावात घडते. होळीच्या सुमारास दरवर्षी मृत्यू होतात आणि या मृत्यूंमागे शंकरासुर नावाच्या राक्षसाचा हात असल्याची गावकऱ्यांची ठाम श्रद्धा आहे. नियम मोडणाऱ्याला शिक्षा अटळ अशीच गावातली समजूत. मात्र यावेळी एक ‘चांगला माणूस’ मारला जातो आणि सगळं गणित बिघडतं.
याच गावात बदली होऊन आलेला पोलीस निरीक्षक विश्वास सरंजामे (अंकुश चौधरी) या प्रकरणाचा छडा लावायचा प्रयत्न करतो. शांत पोस्टिंग, थंड बीअर आणि सुरमई रवा फ्रायच्या अपेक्षेने आलेला विश्वास अंधश्रद्धा, फसवणूक आणि मानवी क्रौर्यात अडकतो.
मालिकेची संकल्पना दमदार असली तरी तिची पटकथा मात्र सतत स्टीरिओटाईप्समध्ये अडकलेली दिसते. गल्लीपासून सुरू होणारी सत्ता, घरगुती हिंसाचार, दारूडा नवरा, दुर्लक्षित महिला हे सगळे परिचित ट्रॅक प्रभावी ठरू शकले असते, पण अनेक प्रसंग केवळ ‘अॅड-ऑन’सारखे वाटतात.
अंकुश चौधरीने साकारलेला विश्वास हा मालिकेचा कणा आहे. सतत चिडलेला, उद्धट, बॉसलाही धारेवर धरणारा हा अधिकारी कथेला ऊर्जा देतो. तो शांत असताना ठीकठाक वाटतो, पण जेव्हा संयम सुटतो, तेव्हा तो अधिक प्रभावी ठरतो. वडिलांच्या भूमिकेत अरुण नलावडे यांनी केलेलं काम मात्र अत्यंत आपुलकीचं आणि नैसर्गिक आहे.
प्राजक्ता माळीची सरिका ही भूमिका कमी वेळातही लक्षात राहते. तिचा एक प्रसंग जिथे संवादांपेक्षा डोळे जास्त बोलतात प्रभावी ठरतो. यतिन कार्येकर आणि वीणा जामकर यांच्याकडे क्षमता असूनही त्यांचा वापर पुरेसा झालेला नाही, ही खंत जाणवते.
मालिकेचा वेग सुरुवातीपासूनच असमतोल आहे. पहिला भागच घाईत उरकलेला वाटतो, तर पुढे गूढ उलगडत असलं तरी सस्पेन्स अपेक्षेइतका घट्ट राहत नाही. पार्श्वसंगीत, विशेषतः ‘शंखनाद’, शेवटच्या भागात जास्त गोंगाट करतो; परिणाम मात्र कमीच होतो.
वेब सीरिज : देवखेळ (Devkhel WebSeries)
ओटीटी: मराठी झी ५ अॅप
दिग्दर्शक: चंद्रकांत गायकवाड
लेखक: निखिल पालांडे, गौरव रेळेकर,चंद्रकांत गायकवाड
कलाकार : अंकुश चौधरी, प्राजक्ता माळी,
यतीन कार्येकर, अरुण नलावडे, मंगेश देसाई, वीणा जामकर
छायांकन : विनायक जाधव
संकलन : सुदर्शन सातपुते
दर्जा: तीन स्टार