‘दशावतार’ चित्रपटातील हृदयस्पर्शी ‘रंगपूजा’ भैरवी रसिकांच्या भेटीस

मराठी सिनेसृष्टीत चर्चेत असलेल्या ‘दशावतार’ या बहुप्रतीक्षित चित्रपटातील हृदयस्पर्शी ‘रंगपूजा’ भैरवी रसिकांच्या भेटीस आली आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशातील अनमोल ठेवा असलेल्या दशावतार परंपरेचं दर्शन मोठ्या पडद्यावर घडवणाऱ्या या चित्रपटातील हे गाणं प्रेक्षकांच्या मनाला भिडतं.

या भैरवीतून एका कलावंताची रंगभूमीवरील साधना, भक्ती आणि कलेवरील नितांत प्रेम याचं भावपूर्ण चित्रण केलं आहे. हे गीत म्हणजे प्रत्येक कलावंताच्या प्रवासाला दिलेलं एक हृदयस्पर्शी अभिवादन आहे. विशेष म्हणजे गीतकार गुरु ठाकूर, गायक अजय गोगावले आणि संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र हे त्रिकूट या गाण्यात पहिल्यांदाच एकत्र आले असून, नायक बाबुली मेस्त्रीच्या आयुष्याचं मर्म यातून उलगडलं आहे.

गुरु ठाकूर यांच्या अर्थपूर्ण शब्दांना अजय गोगावलेंचा आर्त आवाज आणि ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांच्या सुमधुर सुरावटींनी एक वेगळीच जादू निर्माण केली आहे.

अजय गोगावले म्हणाले – “दशावतार नाटकांमधली ‘रंगपूजा’ जितकी महत्त्वाची, तितकीच या चित्रपटातील भैरवीदेखील आहे. ही भैरवी गाताना मला वेगळंच समाधान मिळालं. त्यामुळे मीही या चित्रपटाचा भाग होऊ शकलो, याचा खूप आनंद आहे.”

संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी सांगितलं – “अजयसोबत काम करण्याची मनापासून इच्छा होती आणि ती ‘दशावतार’मुळे पूर्ण झाली. माझ्या संगीतप्रवासातील हा अविस्मरणीय क्षण आहे.”

गीतकार गुरु ठाकूर म्हणाले – “कलावंताच्या आयुष्यावरील हा सिनेमा आहे. गाणं लिहिताना अजयचा आवाज लाभेल याची खात्रीच होती. ‘रंगपूजा’चं रेकॉर्डिंग ऐकताना आम्ही अक्षरशः हळवे झालो.”

झी स्टुडिओज प्रस्तुत, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित ‘दशावतार’ या चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केलं आहे. दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर, विजय केंकरे, रवी काळे यांसारखे दिग्गज कलाकार या चित्रपटात झळकणार आहेत.

‘दशावतार’ येत्या १२ सप्टेंबरला जगभर प्रदर्शित होणार असून, अजय गोगावलेच्या आवाजातील ‘रंगपूजा’ ही भैरवी या सिनेमाचा भावपूर्ण कळसाध्याय ठरणार आहे.

Spread the love

Related posts

मनवा-श्लोकच्या नात्याची झलक, प्रेक्षकांना भुरळ घालणारा टीझर प्रदर्शित!

‘वडापाव’ चित्रपटाचं टायटल ट्रॅक प्रदर्शित – प्रेक्षकांच्या मनाला भिडणारं मुंबईचं गाणं

मल्टीस्टारर ‘थप्पा’ – वैदेही परशुरामी, रिंकू राजगुरू आणि दमदार स्टारकास्टसह बिग बजेट मराठी सिनेमा

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More