‘चला हवा येऊ द्या’… या नावातच हास्य, साद आणि आपलेपणाचं गारूड आहे. झी मराठीवरील या लोकप्रिय कार्यक्रमाने जवळपास दहा वर्षं प्रेक्षकांच्या मनात हश्याचं साम्राज्य उभं केलं. मार्च २०२४ मध्ये जेव्हा या कार्यक्रमाने विश्रांती घेतली, तेव्हा चाहत्यांच्या डोळ्यांत पाणी होतं आणि कलाकारही भावुक झाले होते. पण आता, वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर, हे हास्यविनोद करणारे क्षण पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
२०१४ मध्ये ‘लय भारी’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी या शोची सुरुवात झाली होती. १८ ऑगस्ट २०१४ रोजी प्रेक्षकांनी पहिल्यांदा ‘चला हवा येऊ द्या’ पाहिलं आणि तेव्हापासून हा कार्यक्रम त्यांच्या आठवड्याचा अविभाज्य भाग बनला. शेवटचा भाग १७ मार्च २०२४ ला प्रसारित झाला आणि या दशकभराच्या प्रवासात एकूण ११३७ एपिसोड्स आणि ९ सीझन्स पूर्ण झाले.
या प्रवासात डॉ. निलेश साबळे, सागर कारंडे, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, स्नेहल शिदम यांसारख्या कलाकारांनी ‘चला हवा येऊ द्या’ला एक वेगळी उंची दिली.
आता या कार्यक्रमाचा नवीन सीझन लवकरच सुरू होणार आहे. झी मराठीने नुकताच या नव्या पर्वाचा टीझर प्रदर्शित केला असून त्यात सांगण्यात आलं आहे –
“१० वर्षं, ११३७ एपिसोड्स आणि ९ सीझन्सनंतर कॉमेडीचं वादळ पुन्हा येतंय…”
यावेळी मात्र कार्यक्रमात थोडा बदल होणार आहे. कॉमेडीचा नवा डॉन शोधण्यासाठी ऑडिशन्स घेण्यात येणार आहेत. या ऑडिशन्स कधी व कुठे होणार याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली, तरी टीझरमध्ये श्रेया बुगडे आणि कुशल बद्रिके यांची झलक पाहायला मिळते.
टीझर प्रदर्शित होताच चाहत्यांनी सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “चला हवा येऊ द्या”च्या जुन्या टीमला पुन्हा एकत्र आणण्याची मागणी जोर धरत आहे.
“निलेश साबळेचं हास्याचं टायमिंग आणि जुनी टीम म्हणजे मस्त कॉम्बिनेशन”,
“एक नंबर शो आहे, लवकर परत आणा”
अशा अनेक भावना नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
सध्या तरी टीझरमुळे वातावरण तापलं आहे. आता हे ‘वादळ’ नेमकं कधी वाहणार, आणि त्यात कोण नवीन हास्यतारे चमकणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.