हिंदू संस्कृतीत चैत्र महिन्यातील नवरात्रोत्सवाला विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून, म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या उत्सवाची मंगल सुरुवात होते. या पवित्र नवरात्रोत्सवाचा जागर करण्यासाठी शेलार मामा फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. अभिनेता सुशांत शेलार आणि त्यांची पत्नी सौ. साक्षी सुशांत शेलार यांच्या उपस्थितीत लोअर परळ येथे १९ मार्च ते २७ मार्च दरम्यान ‘कुलस्वामिनी भैरी भवानी’ चैत्र नवरात्रोत्सव मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरा होत आहे.
माननीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेने आणि खासदार श्री. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, शेलार मामा फाऊंडेशनचे अध्यक्ष सुशांत अरुण शेलार यांच्या संकल्पनेतून हा भव्य उत्सव साकारत आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह मनोरंजन क्षेत्रातील सौरभ गोखले, मेघन जाधव, विघ्नेश जोशी, अक्षय मुडावदकर, डॉ. निखिल राजशिर्के, तेजस्विनी पंडित, रेश्मा शिंदे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात सक्रिय असलेले शेलार मामा फाऊंडेशन दरवर्षी लोअर परळमध्ये हा चैत्र नवरात्रोत्सव आयोजित करते. हिंदू धर्मातील परंपरा आणि संस्कृती जतन करत हा समृद्ध वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश या उपक्रमामागे असल्याचे अभिनेता सुशांत शेलार यांनी सांगितले.
लोअर परळमधील कोकण वैभवजवळ, तालचेकरवाडी शाळेसमोर, उड्डाणपुलाखाली १९ मार्च ते २७ मार्चदरम्यान हा उत्सव रंगणार आहे. या काळात अभिषेक, शृंगार पूजा, मंडळ पूजा, पाठ वाचन, नवचंडी होमहवन, भजन, ललिता सहस्त्रनाम, कुंकू अर्चन, देवीचा गोंधळ, जागरण, महिला पुजाऱ्यांकडून पठण, श्रीराम नवमी उत्सव आणि विसर्जन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांद्वारे चैत्र नवरात्रीचा जागर करण्यात येणार आहे.