…आणि अशी सापडली ‘नाळ २’ची चिमी!

२०१८ साली नागराज मंजुळे यांच्या ‘नाळ’ या सिनेमाने कमालीचे यश मिळवले. या सिनेमातील आई आणि मुलाची अतिशय भावनिक आणि जिव्हाळ्याची गोष्ट प्रत्येकाच्याच मनाला भावली. सिनेमाचा शेवट काही प्रश्न अनुत्तरित ठेऊनच झाला होता. आता या सर्व प्रश्नांची उत्तर घेऊन उभा ठाकला आहे ‘नाळ 2’. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. नागराज पोपटराव मंजुळे निर्मित ‘नाळ भाग २’ दिवाळीच्या मुहूर्तावर सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

नाळ २ च्या ट्रेलरने, चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांची वाहवा आधीच मिळवली आहे. अनेक नवीन कलाकार या भागात आपल्याला सिनेमात दिसणार आहे. या सर्व कलाकारांमध्ये एक अतिशय गोड चेहरा प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. तो चेहरा म्हणजे चिमुकली ‘चिमी’. नाळच्या पहिल्या भागात ‘चैतन्य’ अर्थात श्रीनिवासने आपल्या अभिनयाने सगळ्यांची मने जिंकून घेतली होती. आता नाळ २ मध्ये ‘चिमी’ सगळ्यांचेच लक्ष आकर्षून घेते आहे. चिमी म्हणजेच अभिनेत्री त्रिशा ठोसर.

नाळ २ मधील ‘डराव डराव’ गाणे प्रदर्शित झाले आणि या गाण्यातील ही चिमुकली कोण असा सगळ्यांना प्रश्न पडला. तिचा तो तोरा बघून अनेक जण तिचे चाहते झाले. एवढ्या लहानग्या, गोंडस, निरागस त्रिशाची निवड ‘चिमी’च्या व्यक्तिरेखेसाठी कशी झाली, हे जाणून घेण्यासाठी अनेक प्रेक्षक उत्सुक आहेत.

त्रिशाच्या निवडीबद्दल चित्रपटाचे दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यंकट्टी यांनी सांगितले, ”मी, नागराज मंजुळे आणि आमची टीम चित्रपटासाठी कलाकारांची निवड करतो. ज्यावेळी ‘चिमी’ची व्यक्तिरेखा लिहिली गेली आणि तिचा शोध सुरु झाला त्यावेळी आम्ही वयाची मर्यादा ठेवली नाही. आमच्या डोक्यात एकच होते ती मुलगी जितकी लहान असेल तितके उत्तम. त्या दृष्टीने आमचे शोधकार्य सुरु होते. अनेक ऑडिशन्स आल्या. आमचे एक होते की, शक्यतो नवा चेहरा असावा. कारण आधी काम केलेले बालकलाकार तसे अनुभवी असतात आणि आम्हाला नैसर्गिक अभिनय हवा होता.”

पुढे सुधाकर यांनी सांगितले, “पुढे त्रिशा आम्हाला सापडली. आमच्या टीमने तिची ॲाडिशन घेतली. आमच्या टीममधून काही जण दोन दिवस तिच्या घरी दिवसभर जायचे आणि तिचे ऑडिशन घ्यायचे. ती कशी वावरते, बोलते या सगळ्याचे निरीक्षण केले. त्यावेळी ती फक्त साडेतीन वर्षांची होती. त्रिशा अतिशय गुणी मुलगी आहे. लहान असूनही कधी तिने त्रास दिला नाही. आम्हाला कधी कधी वाटायचे दिवसभर चित्रीकरण ही करू शकेल ना ? परंतु त्रिशा नेहमीच उत्साही असायची. संवादाचे ‘गिव्ह अँड टेक’ही तिने पटकन आत्मसात केले. तिचे पाठांतर अतिशय उत्तम आहे. सेटवर त्रिशा सगळ्यांचीच लाडकी होती. आम्ही तिचा चौथा वाढदिवसही सेटवर साजरा केला होता.”

दरम्यान नाळ २ या चित्रपटात श्रीनिवास पोकळे, त्रिशा ठोसर, भार्गव जगताप, नागराज मंजुळे, देविका दफ्तरदार, दीप्ती देवी आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा दिवाळीच्या दरम्यान नुकताच प्रदर्शित झाला आहे.

Spread the love

Related posts

आदर्श सून साकारत मिळवली लोकप्रियता, अभिनयसोबतच राजकारणात देखील तयार केली ओळख जाणून घ्या स्मृती ईराणी यांचा प्रवास

सईच्या घरी आली नवी पाहुणी! नव्या गाडीचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

डंकी सिनेमातील ‘निकले थे कभी हम घर से’ गाणे प्रदर्शित, सोनू निगमच्या आवाजातून जाणवते देशाबद्दलची तडफड

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More