१९९० च्या दशकात घडणारी ‘बाई तुझ्यापायी’ ही मालिका आयली (Ayali) या २०२३ मधील तमिळ शोवर आधारित आहे. निपुण अविनाश धर्माधिकारी दिग्दर्शित आणि निखिल खैरेंनी लिहिलेल्या या मालिकेत साजिरी जोशी, क्षिती जोग, सिद्धेश धुरी आणि शिवराज वैचल प्रमुख भूमिकेत आहेत. ही मालिका ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी Zee5 वर प्रदर्शित झाली असून सध्या OTT प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळते.
पहिल्या काही भागांतच ‘बाई तुझ्यापायी’ सामाजिक संदेश हलक्या हाताने पोहोचवते. पण शेवटच्या भागांत कथानक किंचित अविश्वसनीय वाटतं. तरीही मालिकेचं उद्दिष्ट स्पष्ट आहे – शिक्षण, विवेक आणि स्त्रीस्वातंत्र्य यांची गरज अधोरेखित करणे.
जसजशी कथा पुढे सरकते, अहिल्याची लढाई केवळ समाजाशी नाही, तर घरातल्यांशीही होते. लक्ष्मी आणि आबा यांच्यातील संवाद भावनिक आहेत – एकीकडे आईचं भय, तर दुसरीकडे वडिलांचं प्रेम आणि काळजी जाणवते.
साजिरी जोशीने अहिल्याचं पात्र मनापासून साकारलं आहे. तिच्या नजरेतली प्रगल्भता आणि असहायतेची झलक मनाला भिडते. क्षिती जोगने आईच्या भूमिकेत ताकदीचा परफॉर्मन्स दिला आहे. सिद्धेश धुरी ‘आधुनिक शेतकरी’ असूनही घरातल्या बदलाशी झगडताना दिसतो – तो संघर्ष अत्यंत वास्तव वाटतो.
विभावरी देशपांडे प्रगत विचारांची शिक्षिका मंगला म्हणून उठून दिसते, तर अनिल मोरेने साकारलेला शिक्षक गोपाळ पाहून चीड येते. गौतमी काचीची सरस्वती आणि रमा नदगौडांची पुजारीण म्हणून भूमिका कथेला खोली देतात. पार्श्वसंगीत, सिनेमॅटोग्राफी आणि कलाकारांचे अभिनय या सगळ्यांनी एक सोज्वळ वातावरण तयार केलं आहे.
‘बाई तुझ्यापायी’ पाहताना मनाच्या खोलवर काहीतरी हलतं. स्त्रियांच्या शरीरावर, त्यांच्या नैसर्गिक प्रक्रियेवर समाजाने लादलेल्या बंधनांची ही गोष्ट प्रत्येक प्रेक्षकाला विचार करायला लावते. शतके उलटली तरी काही ठिकाणी स्त्रीला ‘अशुद्धतेच्या’ चौकटीत पाहणं थांबलं नाही — हाच विचार या मालिकेत प्रभावीपणे उलगडतो.
‘बाई तुझ्यापायी’ ही मालिका कुटुंबासोबत पाहण्याजोगी आहे. ही कथा मनोरंजनासोबतच विचार देणारी आहे — स्त्रीचं आयुष्य ‘पाळी’नंतर थांबत नाही, तर तिथूनच तिचा खरा प्रवास सुरू होतो, हे या मालिकेनं दाखवून दिलं आहे.
वेब सीरिज : बाई तुझ्यापायी
दिग्दर्शक : निपुण धर्माधिकारी
कलाकार : साजिरी जोशी, क्षिती जोग, शिवराज वायचळ, विभावरी देशपांडे,
दर्जा : साडेतीन स्टार