८ दशकांचा भव्य प्रवास आणि तब्बल १२ हजारांहून अधिक गाणी—ही केवळ आकडेवारी नाही, तर भारतीय संगीतविश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या आशा भोसले यांच्या अतुलनीय कारकिर्दीची कहाणी आहे. आपल्या सुरांनी लाखो रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आशा ताईंनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणाऱ्या गायिका म्हणून आपलं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं.
८ सप्टेंबर १९३३ रोजी एका प्रतिष्ठित मंगेशकर कुटुंबात जन्मलेल्या आशा भोसले यांनी ८०० हून अधिक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध भाषांमध्ये आणि विविध शैलींमध्ये गाण्यांचा खजिना उभा केला. त्यांच्या योगदानासाठी त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्मविभूषण सारख्या सर्वोच्च सन्मानांनी गौरविण्यात आलं आहे.
लहान वयातच कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर घेत आशा ताईंनी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं. वडील दीनानाथ मंगेशकर यांच्याकडून त्यांना शास्त्रीय संगीताची भक्कम पायाभरणी मिळाली. मोठी बहीण लता मंगेशकर यांच्याप्रमाणेच आशा यांनाही गायकीचा वारसा लाभला, पण स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. १९४८ मध्ये ‘चुनरिया’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली.
गझल, पॉप, भजन अशा विविध प्रकारांमध्ये सहजतेने गाणाऱ्या आशा ताईंची खास ओळख मात्र वेस्टर्न आणि सेन्सुअल गाण्यांमुळे निर्माण झाली. झीनत अमानपासून उर्मिला मातोंडकरपर्यंत अनेक अभिनेत्रींना त्यांनी आपल्या आवाजाने अधिकच मोहक बनवलं. सुरुवातीच्या काळात त्यांनी शमशाद बेगम, गीता दत्त आणि लता मंगेशकर यांच्यासोबत ड्युएट गाणी गायली.
१९५७ मध्ये संगीतकार ओ. पी. नैयर यांच्यासोबत ‘तुमसा नहीं देखा’ आणि ‘नया दौर’ या चित्रपटांमुळे त्यांना मोठं यश मिळालं. त्यानंतर ‘हावडा ब्रिज’, ‘चलती का नाम गाड़ी’ आणि ‘लाजवंती’ या चित्रपटांतील गाण्यांनी त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. ६०-७० च्या दशकात ओ. पी. नैयर यांच्यासोबत त्यांनी दिलेल्या सुपरहिट गाण्यांनी संगीतविश्वात जादू निर्माण केली.
‘दम मारो दम’, ‘पिया तू अब तो आजा’, ‘दिल चीज क्या है’, ‘ये मेरा दिल’ आणि ‘चुरा लिया है तुमने’ ही त्यांची गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. ६० च्या दशकाच्या शेवटी त्या सर्वाधिक लोकप्रिय गायिकांपैकी एक बनल्या होत्या. ९० च्या दशकापर्यंत लता आणि आशा या दोन्ही बहिणींनी प्लेबॅक सिंगिंगवर अक्षरशः राज्य केलं.
वैयक्तिक आयुष्यातही त्यांचा प्रवास तितकाच चढ-उतारांनी भरलेला होता. १६ व्या वर्षी त्यांनी गणपतराव भोसले यांच्याशी विवाह केला, मात्र पुढे त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर १९८० मध्ये त्यांनी संगीतकार आर. डी. बर्मन यांच्याशी लग्न केलं. या जोडीने ‘हरे रामा हरे कृष्णा’, ‘जवानी दीवानी’ आणि ‘हम किसी से कम नहीं’सारख्या चित्रपटांमधून अजरामर संगीत दिलं.
७ फिल्मफेअर पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार (२०००) आणि पद्मविभूषण (२००८) असे अनेक मानाचे पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. पण त्यांचं व्यक्तिमत्त्व केवळ गायिकेपुरतंच मर्यादित नाही.
आशा भोसले या एक यशस्वी उद्योजकही आहेत. त्यांना स्वयंपाकाची विशेष आवड असून, “मी गायिका नसते तर शेफ झाले असते,” असं त्यांनी अनेकदा सांगितलं आहे. ‘Asha’s’ या नावाने त्यांनी आंतरराष्ट्रीय रेस्टॉरंट चेन सुरू केली, ज्याची सुरुवात २००२ मध्ये दुबईतील WAFI सिटी मॉलमधून झाली. आज या रेस्टॉरंट्सचे आउटलेट्स मध्यपूर्व आणि यूकेमध्येही आहेत.
गायन, व्यवसाय आणि रिअॅलिटी शोमधील उपस्थिती—प्रत्येक क्षेत्रात आपली वेगळी छाप सोडणाऱ्या आशा भोसले यांचा प्रवास म्हणजे खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे.
=====
हे देखील वाचा : जिंगल्सपासून जाहिरातविश्वापर्यंत… आशा भोसले यांनी बदलले भारतीय अॅड इंडस्ट्रीचे सूर
=====